पाकिस्तानचे चार तुकडे होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019   
Total Views |


 


आपल्या ताटात जेवढं वाढून ठेवलं आहे ते अगोदर खायचं सोडून आम्हाला काश्मीर पाहिजे, सांगत उसनं अवसान आणायची सवय पाकिस्तानला जडली आहे. पाकिस्तानमध्ये असलेले गिलगिट-बाल्टिस्तान, बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, सिंध प्रांत व फेडरली अ‍ॅडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया (फाटा) यांसारख्या प्रदेशांमध्ये शांतता प्रस्थापित करता आली नाही.


जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान इमरान खान यांनी संसदीय समितीची बैठक बोलावून घेत पाकिस्तानसमोर सर्व पर्याय खुले असल्याची भारताला पोकळ धमकी दिली. पाकचे वजीर-ए-आझम यांनीच तुकडा टाकल्यानंतर त्यांची पिलावळ तो तुकडा मिळवण्यासाठी भू-भू करणारच! पाक सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी तर वजीर-ए-आझम व इतर सदस्यांना युद्धासाठी पाकिस्तानने सज्ज राहण्याचे आवाहन केले. एवढी गरळ कमी होती, तेच पाकिस्तानी लष्कराने भारताच्या निर्णयावर आगपाखड करत काश्मीरच्या जनतेला त्यांच्या संघर्षात मदत करण्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ, असे हास्यास्पद विधान केले. भारताचा काश्मीरबाबतचा निर्णय पाक व लष्कराच्या जिव्हारी लागला असला तरी, त्यांना इतिहासाचा, खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेचा व अंतर्गत असंतोषाचा विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण होतो. पाकिस्तानच्या वजीर-ए-आझम व त्यांच्या पिलावळींना तेथील जनताच मनावर घेत नाही, त्यामुळे आपण फक्त हसत राहायचं. आता कालचेच उदाहरण घ्या, पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये अखंड भारताची पोस्टर्स झळकविण्यात आली. एक नाही, दोन नाही तर शेकडो पोस्टर्स पाकिस्तानच्या राजधानीत झळकली. त्यामुळे वजीर-ए-आझम आणि पिलावळींना आणखीनच मिरच्या झोंबल्या असतील. पाकिस्तानला अंतर्गत सुरक्षा व शांतता ठेवता येत नाही. स्वतःच्या ताब्यात असलेल्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असताना, देशाची तिजोरी खडखडाट करत असताना, महागाई नागरिकांना असह्य होत असताना, दहशतवादाची लागण झाली असताना पाकिस्तान उगीच उंटाचा मुका घ्यायची भाषा करत आहे. आपल्या ताटात जेवढं वाढून ठेवलं आहे ते अगोदर खायचं सोडून आम्हाला काश्मीर पाहिजे, सांगत उसनं अवसान आणायची सवय पाकिस्तानला जडली आहे. पाकिस्तानमध्ये असलेले गिलगिट-बाल्टिस्तान, बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, सिंध प्रांत व फेडरली अ‍ॅडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया (फाटा) यांसारख्या प्रदेशांमध्ये शांतता प्रस्थापित करता आली नाही.

 

पाकिस्तानी लष्कराला आणि आयएसआयच्या छळाला कंटाळून बलुचिस्तान व इतर प्रांत पाकिस्तानपासून फारकत मागत आहेत. वजीर-ए-आझम आपल्या घरात एवढ्या अडचणी असताना त्या सोडवण्यापेक्षा दुसर्‍याच्या घरात डोकावतात. त्यावेळी त्यांच्यावर ’ना घर का ना घाट का’ अशी वेळ येऊ नये म्हणजे झालं. कारण, कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानच्या नागरिकांनी भारतात सामील होण्याची मागणी केली. गिलगिट-बाल्टिस्तानचे कार्यकर्ते सेंगे एच. सेरिंग यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत आम्हाला भारताच्या संसदेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी केली. ही मागणी फक्त गिलगिट-बाल्टिस्तानपुरती मर्यादित नसून बलुचिस्तान, सिंध प्रांत, पाकव्याप्त काश्मीर व फेडरली अ‍ॅडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया (फाटा) यांनीही केली आहे. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानपासून हे सर्वच भाग वेगळे होण्याची भाषा करत आले. मागणी करून ते थांबले नाहीत, तर त्यासाठी अनेक मार्गांनी आंदोलने केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाचा फारसा उल्लेख नसला तरी पाकिस्तानापासून वेगळी होण्याची खदखद संबंधित प्रांतातील नागरिकांमध्ये उकळ्या घेत आहे. हा ज्वालामुखी कधी भडकेल सांगता येत नाही आणि या नागरिकांचा भडकलेला ज्वालामुखी पंजाब प्रांतातील पाकिस्तानला चालणार नाही. यामागे भौगोलिक आणि आर्थिक कारणे दडलेली आहेत. पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी बलुचिस्तान या प्रदेशाने ४४ टक्के भूमी व्यापली असून पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले ग्वादार बंदर बलुचिस्तानमध्येच आहे. तसेच नैसर्गिक वायू, तेल, तांबे, सोने अशी साधनसंपत्ती याच प्रदेशात आढळून येते. त्यामुळे जर हा प्रांत पाकिस्तानपासून वेगळा झाला तर पाकड्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही. सिंध प्रांताविषयी हेच सांगता येईल, कारण पाकिस्तानला मिळणार्‍या एकूण करापैकी ७० कर फक्त एकट्या सिंध प्रांतातून येतो आणि या दोन प्रांताची पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असल्याचे सांगत वेगळी होण्याची मागणी कित्येक वर्षांपासून सुरू आहे. याशिवाय पाकव्याप्त काश्मीर, फाटा यामध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे पाकिस्तानने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळी आली आहे; अन्यथा त्यांच्याकडे तेलही गेले आणि तूपही गेले म्हणण्याखेरीज बोंबा मारायला काहीही उरणार नाही.

 
@@AUTHORINFO_V1@@