कोल्हापूर,सातारा आणि सांगली झाले 'पुर'मय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |



जिल्ह्यांतील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले

 

कोल्हापूर : सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. कृष्णा आणि कोयना नदीला आलेल्या पुराने सातारा आणि सांगली तर पंचगंगेच्या पाण्याने कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. नदीलगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून, हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

 

कोल्हापूरमधील अनेक ठिकाणी पाणीच पाणी

 

सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी ५० फूट ९ इंचांवर पोहोचली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. कोल्हापूर शहराच्याजवळ पुणे-बंगळुरु महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आल्याने महामार्गाच्या एका बाजूनेच सध्या वाहनांची ये-जा सुरु आहे. पुण्याहून कोल्हापूर-बेळगाव आणि बंगळुरुकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

 

सातारा सांगलीमध्ये कृष्णा-कोयनाचा कहर

 

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये या पुराचा मोठा तडाखा बसला आहे. कृष्णा-कोयनेला आलेल्या पुराने नागरिकांची कोंडी झाली आहे. पुणे, कोल्हापूर मार्ग बंद झाला असून जिल्ह्य़ातील नदीकाठी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती पथकाला पाचारण करण्यात आले आहे. नदीकाठी असलेल्या विविध उपनगरांत पुराचे पाणी शिरले आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पांजरपुथ या ठिकाणी गेल्या २४ तासात विक्रमी म्हणजे ४३० मिलीमीटर पाऊस झाला आहे. चांदोली धरणातून ३४ हजार २०० क्युसेक्सचा विसर्ग वारणा पात्रात होत आहे. तसेच कोयना धरणातूनही विसर्ग मोठय़ा प्रमाणात होत असल्याने वारणा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@