
सोनल प्रॉडक्शन निर्मित 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाचा शतकपूर्तीचा प्रयोग येत्या १५ ऑगस्टला ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक बहीणभावाच्या भावनिक नात्यावर आधारलेले आहे. त्यामुळे हा योगायोग म्हणावा की रक्षाबंधनच्याच दिवशी नाटकाचा १०० वा प्रयोग सादर होणार आहे. त्यानिमित्ताने पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या संयोजनाने प्रेक्षकांमधील काही भाग्यवान बहीणभावांना सोन्याची राखी जिंकण्याची संधी या नाटकाच्या निमित्ताने मिळणार आहे.
तुमचा तुमच्या बहीण/भावाबरोबरचा एखादा फोटो घ्या. त्या मागे तुमची एखादी स्पेशल आठवण आणि तुमची नावं लिहा.१५ ऑगस्टला तिकिट काढून प्रयोगाला या. प्रयोगाआधी बाहेर ठेवलेल्या ड्रॉप बॉक्स मध्ये फोटो सबमिट करा. प्रयोगानंतर 3 बहीण-भावाच्या जोड्यांना सोन्याची राखी भेट देण्यात येईल. pic.twitter.com/zK0bN9MHBa
— Umesh Kamat (@kamat_umesh) August 6, 2019
अद्वैत दादरकर दिग्दर्शित 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकात उमेश कामत, ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांनी सोन्याची राखी जिंकण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
लेखक कल्याणी पाठारे यांनी लिहिलेले 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक बहीण-भावातील अतूट नात्याविषयी भाष्य करते. अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर एक छाप पाडली आहे. नाटकाचा हा १०० वा यशस्वी प्रयोग त्याचेच फळ आहे, असे म्हणावे लागेल.