कापूसशिल्पाचा अनंत शिल्पकार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019   
Total Views |



कापसाची ओळख म्हणजे समईच्या वातीचा धागा, तुपाच्या निरांजनातील ज्योत ते रुग्णांच्या चिकित्सेसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा बोळा, अशीच आपल्याला माहिती आहे. मात्र, याच कापसाच्या माध्यमातून कोणी जर आकर्षक शिल्प तयार करत असेल तर... होय, कापसाचे शिल्प आणि तेही मजबूत आणि टिकाऊ असे. ही किमया गेल्या ३२ वर्षांपासून नाशिकमध्ये स्थित असलेले आणि मूळचे पालघर जिल्ह्यातील जव्हारचे रहिवासी अनंत नारायण खैरनार साधत आहेत.


अनंत नारायण खैरनार यांचे बालपण हे सामान्य, मात्र संस्कारक्षम कुटुंबात गेले आणि त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर कधीही कोणतेही बंधन न लादल्याने त्यांना निर्माणकर्ता होण्यास संधी मिळाली, हे खैरनार आवर्जून नमूद करतात. त्यांच्या वडिलांचा शिवणकामाचा व्यवसाय होता. त्यांना बघत ते लहानाचे मोठे झाले. त्यामुळे त्यांच्या कापूस शिल्पावर वडिलांच्या कार्याचा प्रभाव दिसून येतो. १९८७ साली महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्यांच्या मित्रांनी त्यांच्याकडे गणेशोत्सवाच्या आरासमध्ये काही वेगळेपण असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली व खैरनार यांची चित्रकला उत्तम असल्याने गणपतीची आरास हटके करण्याची जबाबदारी खैरनार यांच्यावर सोपविण्यात आली. इथेच खैरनार यांच्या डोक्यात आजवर जी साकारली गेली नाही, अशी कोणती आरास आपण करावी आणि कशी करावी याचे विचारचक्र सुरू झाले. यातच, जे करायचे ते नवीनच करायचे, असा चंग खैरनार यांनी मनाशी बांधला. आजवर केवळ कोणत्याही धातूपासून मूर्ती बनते, हे ज्ञात होतेच. मात्र, सर्व उपलब्ध घटकांचा विचार करत असताना आजवर कापसापासून कोणीच मूर्ती बनविलेली नाही, हे खैरनार यांच्या लक्षात आले आणि इथेच कापूसशिल्प साकारण्याची रचना खैरनार यांच्या मनात निर्माण झाली. त्यांनी हा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मित्रांशी सल्लामसलत केली व सर्वांना मदतीला घेऊन विविध काड्या, रद्दी, कमीत कमी कापूस यांच्या साहाय्याने त्यांनी कापसाचा गणपती साकारला आणि या मूर्तीच्या रचनेसोबतच खैरनार यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. कोणतेही प्रशिक्षण नसताना आणि केवळ चित्रकला चांगली आहे, असे इतर लोक म्हणत, याच एकमेव भांडवलावर केवळ मित्रांच्या सांगण्यावरून खैरनार यांनी पहिलीवहिली गणपतीची कापसाची मूर्ती साकारली आणि ही मूर्ती लोकप्रिय ठरली. त्यामुळे कलाकाराला अत्यंत आवश्यक असणारी पहिली कौतुकाची थाप खैरनार यांना या मूर्तीमुळे भगूर येथील स्वा. सावरकर वाड्यात मिळाली.

 

ज्या वाड्यात स्वा. सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीचा नवा मार्ग दिला, त्याच वाड्यात खैरनार यांनी नेहमीच्या चाकोरीबद्ध घटकांना दूर करत कापसापासून गणपतीची मूर्ती साकारली. हे सांगताना आणि याच मूर्तीच्या निर्मितीतून माझ्या कलेचा श्रीगणेशा झाला, हे नमूद करताना खैरनार यांचा ऊर अभिमानाने भरून येतो, हे विशेष! सन १९८७ ते ९० या काळात सिन्नर एमआयडीसीमध्ये सलग तीन पाळ्यांमध्ये उदरनिर्वाहासाठी त्यांनी नोकरी केली. मात्र, ही नोकरी करत असतानादेखील त्यांचे मन हे चित्रकला आणि कापूसशिल्प यांच्या कलाकृतीत कायमच गुंतलेले असे. याच दरम्यान स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना १९९० मध्ये खैरनार हे याच परीक्षांच्या माध्यमातून आयुर्विमा महामंडळामध्ये नोकरीस लागले. सलग तीन पाळ्यांमध्ये काम करत घेतलेले कष्ट आणि त्यातून वेळ काढत केलेला अभ्यास आणि जपलेले आपले कलामन असा त्रिवेणी संगम खैरनार यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहावयास मिळतो. एलआयसीच्या माध्यमातून चोपडा येथे सेवा बजावत असताना खैरनार यांच्या कलेने नाशिकची वेस ओलांडत आता खानदेशच्या अंगणात प्रवेश केला होता आणि १९९० ते १९९५ या काळात खानदेशातील चोपडासह इतर गावांतील गणेशोत्सव हे खैरनार यांच्या कापूसशिल्पाने कायमच चर्चेत आले. असे पंचवार्षिक कापूसशिल्पाचे खैरनार यांचे कार्यक्रम सुरू होते. मात्र, याला केवळ वार्षिक स्वरूप होते. आता मात्र, आपल्याकडेच हे काम दरवर्षी का येते, ही कला, गणपती आणि आपण यात काय नाते आहे, हा प्रश्न खैरनार यांच्यातील कलाकाराला पडत होता.

 

अशातच चोपडा येथील एका कुटुंबात असणारी कृष्णाची प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पडून भंग पावली. तेव्हा, त्या कुटुंबाने खैरनार यांना कापसाची १ फूटापर्यंतची कृष्णाची मूर्ती बनवून देण्याची विनंती केली. त्याला खैरनार यांनी होकार दिला. मात्र, आजवर केवळ मोठ्या मूर्ती बनविणारे हात आता १ फुटाची मूर्ती आणि त्यात केवळ अडीच सेंमीचा चेहरा कसा बनविणार, हे आव्हान खैरनार यांच्यासमोर उभे ठाकले. आणि शिल्पकार स्तब्ध झाला. कारण, मूलत: कापसाचा स्वभाव हा आकुंचन पावण्याचा नाही तर प्रसरण पावण्याचा आहे. त्यामुळे कृष्णाचे छोटे रूप, त्याचे नाक, ओठ कसे घडवायचे हा यक्षप्रश्न उभा ठाकला. तेव्हा रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केलेल्या खैरनार यांच्यातील रसायनशास्त्रातील विद्यार्थी जागा झाला आणि त्यांनी आपल्या खोलीत रात्री विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली. जळीस्थळी विचार करताना, अपयशामुळे आलेल्या वैफल्याच्या भावनेवर मात करत विविध रसायनांचे संयोग घडवून आणत असताना एका ब्राह्ममुहूर्तावर खैरनार यांना असे रसायन सापडले जे की, कापसाला आकार देऊन कालांतराने हवेत सामावून जाईल आणि कापसाचे मूळ स्वरूप तसेच ठेवेल. येथेच स्तब्ध झालेला शिल्पकार पुन्हा जागृत झाला आणि या शिल्पकाराने मूर्तीकलेचे स्वयंअध्ययन करत आपल्यातील त्रुटी दूर केल्या. याचा शोध लागल्यानंतर कृष्णमूर्ती साकारली गेली. त्यानंतर हीच कृष्णमूर्ती खैरनार यांच्या कापूसशिल्पाची खरी पथदर्शक ठरली. यानंतर खैरनार यांनी म. गांधी, स्वा. सावरकर, सुभाषचंद्र बोस, लेडी डायना, कुसुमाग्रज, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, विविध कंपन्यांच्या ट्रॉफी, ताजमहल, लोगो, विविध आकारांतील गणेशमूर्ती अशी सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कापूसशिल्पे खैरनार यांनी साकारली आहेत. आजवर त्यांना १९९७ मध्ये लिम्का बुक ऑफ अ‍ॅवॉर्ड, १९९९ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंटरनॅशनल ज्युनिअर चेंबर यांसह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भविष्यात कापूस शिल्पकलेचा प्रसार करणे आणि नवीन कलाकार घडविणे हा त्यांचा मानस आहे. देव्हाऱ्यात वातीच्या स्वरूपात स्वतः जळत प्रकाश देणारा कापूस हा देवाची मूर्तीदेखील घडवू शकतो, अशी कला जगात एकमेव पद्धतीने सादर करणाऱ्या अनंत खैरनार यांच्या भावी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@