पुन्हा 'रिमोट कंट्रोल'?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |


 


लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. ३ जुलै रोजी त्यांनी राजीनामा सोपविल्यानंतर महिन्याभराहून अधिक काळ लोटला; मात्र अद्याप तरी काँग्रेसला­ नवा अध्यक्ष मिळालेला नाही. नवा काँग्रेस अध्यक्ष कोण होणार, याबाबत अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, यांपैकी एकाही नेत्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालणे, हे अद्याप काँग्रेसला जमलेले नाही. सरचिटणीस प्रियांका गांधी यांचेही नाव अनेक नेत्यांनी पुढे केले. मात्र, अध्यक्षपदासाठी गांधी घराण्यातील नावास राहुल गांधी यांचा विरोध असल्याने त्याही यापासून दूरच आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण, हा प्रश्न अधांतरी असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एखादा तरुण चेहराच काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान व्हावा, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली. अमरिंदर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने एखाद्या जुन्याजाणत्या नेत्यांऐवजी तरुण नेत्याच्या हाती काँग्रेसच्या नेतृत्वपदाच्या चाव्या देण्यास पसंती का दर्शवली, असा प्रश्न साहजिकच पडतो. राहुल गांधी हे तरुण नेते आहेत. जुन्याजाणत्या नेत्याला अध्यक्षपद दिले, तर ते आपल्या अनुभवानुसारच प्रत्येक निर्णय घेणार. त्यामुळे तरुण नेते आणि जुनेजाणते व्यवस्थित जुळवून घेणार का, याबाबत साहजिकच शंका निर्माण होते. हे जाणूनच अमरिंदर यांनी एखादा तरुण नेता काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अमरिंदर यांच्याप्रमाणे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही या मुद्द्याला नुकतीच फोडणी दिली. राजस्थानातील काँग्रेस नेते सचिन पायलट किंवा मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया या दोन नेत्यांपैकी कुणा एकाकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे, असे ते म्हणाले. तरुण नेतृत्वाकडेच अध्यक्षपद देण्याकडे देवरा यांचे प्रयत्न का, हे वेगळे सांगण्याचे गरज नाही. उरला प्रश्न अध्यक्षपदासाठी तरुण चेहऱ्याचा तर काँग्रेसने नाण्याची दुसरी बाजूही विचारात घेणे गरजेचे आहे. पंतप्रधानपद इतर नेत्यांना दिल्यानंतरही अनेक महत्त्वाचे निर्णय गांधी घराण्यातील व्यक्तींना विश्वासात घेतल्याशिवाय होत नसल्याने काँग्रेसचे सरकार 'रिमोट कंट्रोल'द्वारे चालत असल्याची टीका व्हायची. त्यामुळे आता अध्यक्षपदी मर्जीतील तरुण चेहरा विराजमान झाल्यानंतर पुन्हा तो 'रिमोट कंट्रोल' होणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

 

गोंधळ संपता संपेना...

 

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आत्तापर्यंत ७२ वर्षांच्या कार्यकाळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी) पक्षाचीच सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली. जवळपास ६० वर्षे या पक्षाच्या हातात देशाच्या सत्तेच्या चाव्या राहिल्या. स्वातंत्र्यानंतर भारतावर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाची स्थापना १८८५ साली मुंबईत झाली. व्योमेशचंद्र बॅनर्जी या ब्रिटिश सेवानिवृत्त अधिकाऱ्याने काँग्रेसची स्थापना केली. १८८५-९३ या आठ वर्षांच्या काळात काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा जेमतेम वर्षभराचाच ठरविण्यात आला होता. दरवर्षी काँग्रेसच्या अध्यक्षपदी एक नवा चेहरा विराजमान होता. यासाठी कोणतीही निवडणूक होत नसे. कार्यकारिणी सदस्यांमार्फतच एका चेहऱ्याची यासाठी निवड करण्यात येते. मात्र, आठ वर्षांनंतर कार्यकारिणीने यात बदल करत अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीकडे राहण्याची परंपरा सुरु झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात १९१९ साली मोतीलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तब्बल नऊ वर्षे त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हाती काँग्रेसचे अध्यक्षपद आले. १९२८ ते १९५४ पर्यंत म्हणजेच जवळपास २६ वर्षे त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी अशा अनेक गांधी घराण्यातील नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. अशा प्रकारे नेहरु-गांधी घराण्यातील किती व्यक्तींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळली, हा नवीन मुद्दा नाही. मात्र, जवळपास १३४ वर्षे जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसला नव्या अध्यक्षपदाची निवड करण्यात होणारा विलंब हा मुद्दा फार गंभीर विषय म्हणावा लागेल. १३४ वर्षांच्या काळात काँग्रेसने आत्तापर्यंत ६० हून अधिक अध्यक्ष पाहिले आहेत. या अध्यक्षांनी उत्तम नेतृत्व करत काँग्रेस पक्षाच्या हाती जवळपास ६० वर्षे सत्तेच्या चाव्या ठेवल्या. मात्र, सध्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेली वाटचाल पाहता, काँग्रेसची अवस्था काहीशी गोंधळल्यासारखीच असल्याचे दिसते. महिना उलटून गेला तरी पक्षाला नवा अध्यक्ष न मिळणे हे पक्षाच्या भवितव्यासाठी चांगले संकेत नसून याबाबत काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आधीच पक्षाची अवस्था इतकी खिळखिळी आणि बिकट झाली असताना, अध्यक्षांविना हा पक्ष किती काळ तग धरु शकेल, ते आगामी काळात पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 
- रामचंद्र नाईक 
 
  
@@AUTHORINFO_V1@@