काश्मिरप्रश्नाबाबत अमित शहा यांच्याकडून उच्चस्तरीय बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी एका उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मिरातील विद्यमान स्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांच्यासह इतर सुरक्षा संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत उपस्थित होते. काश्मीर स्थितीचा आढावा घेण्यासोबतच, तेथील परिस्थिती शांत करण्यासाठी आतापर्यंत कोणती पावले उचलण्यात आली, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. तथापि, बैठकीत नेमके कोणते विषय चर्चेत होते, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

 

सीआरपीएफ आणि अन्य केंद्रीय दलांच्या सुमारे २७ हजार जवानांची काश्मीर खोऱ्यात तैनाती करण्यात आल्यापासून स्थानिक राजकीय पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० आणि ३५ ए संपुष्टात आणण्यासाठीच केंद्र सरकारने सुरक्षा वाढवली असल्याचा आरोप येथील राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. याच अनुषंगाने अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

 

सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानीच ही बैठक होणार असून, या बैठकीत काश्मीरबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या बैठकीतही अजित डोवाल आणि सुरक्षा यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. काश्मीरसंदर्भात काहीतरी मोठा निर्णय घेण्यासाठीच ही बैठक बोलावली आहे, याबाबत चर्चा रंगली आहे.

@@AUTHORINFO_V1@@