पेरावे तसे उगवते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2019   
Total Views |



नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) मदतीसाठी याचना केल्याचे वृत्त आहे. यावेळी मात्र, आयएमएफने पाकबाबत कठोर भूमिका घेत आधीच आर्थिकदृष्ट्या विविध समस्यांचा सामना करत असलेल्या पाकला यापुढील काळात आर्थिक मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे वृत्त आहे.


आपण जे आणि जसे कर्म करतो तसेच फळ आपणास प्राप्त होत असते, हा विचार उद्धृत करणारी म्हण आपल्या मराठी मायबोलीत 'पेरावे तसे उगवते' या रूपाने वापरली जाते. सध्या याची प्रचिती आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या बाबतीत दिसून येत आहे. पाकिस्तानने कायमच दहशतवादाला प्रोत्साहन देत भारतात अशांतता पसरविण्याचे काम केले. तेथील नेतृत्वाने भारताबद्दल पाकच्या जनमानसातदेखील आक्रोश निर्माण होईल असाच भारताचा प्रचार केला. दहशतवादाला प्रोत्साहन देताना आपल्या राष्ट्राचा विकास करण्याकडे, आपल्या देशातील नागरिकांना नागरी सुविधा प्रदान करण्याकडे, आपला आर्थिक विकास साधण्याकडे पाकचे कायमच दुर्लक्ष झाले किंवा त्यांनी डोळ्यांवर झापड लावत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असे म्हणावे लागेल. त्याची परिणती म्हणूनच आज पाकिस्तानला विविध समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे.

 

नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) मदतीसाठी याचना केल्याचे वृत्त आहे. यावेळी मात्र, आयएमएफने पाकबाबत कठोर भूमिका घेत आधीच आर्थिकदृष्ट्या विविध समस्यांचा सामना करत असलेल्या पाकला यापुढील काळात आर्थिक मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे वृत्त आहे. तसेच, पाकिस्तानने कायमच आमच्याकडे कर्जाची मागणी करून देशाचा आर्थिक डोलारा सांभाळण्यापेक्षा आपल्या देशातील कर प्रणालीद्वारे आपला महसूल वाढवावा, अशी सूचना केली आहे. मात्र, ज्या देशात रोजगाराचा प्रश्न आहे, देशातील नागरिक नियमितपणे आर्थिक बाबींचा सामना करत आहे अशा आणि ज्या देशाने आजवर नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हवे तेवढे योगदान दिलेले नाही, अशा देशातील लोक उत्पनाची समस्या असताना कर कोठून भरणार, हा सवाल यानिमिताने पुढे येत आहे. आज पाकला आर्थिक समस्यांचा सामना करवा लागण्यासाठी केवळ त्या देशात असणारा दहशतवादच कारणीभूत असल्याचे वारंवार समोर आले आहे. यापूर्वी पाक पुरस्कृत दहशतवाद लक्षात घेता आणि त्याचे भीषण परिणाम स्वतः भोगल्यावर महासत्ता असलेल्या अमेरिकेनेदेखील पाकवर आर्थिक निर्बंध लादल्याची घटना घडली आहे. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी पाकची कोंडी केल्यावर त्यांची मनधरणी करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान अमेरिका दार्ैयावर गेले असता या बाबींचा ऊहापोह करण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकची बिघडलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर यावी यासाठी आयएमएफने पाकिस्तानला सहा अब्ज डॉलर्सची मदत केली होती. मात्र, ऊस गोड लागला की तो मुळापासूनच खायचा अशी मनोवृत्ती पाकची असावी. त्यांनी पुन्हा आयएमएफकडे आर्थिक मदतीची याचना केली असता आयएमएफचे व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड लिपटॉन यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतल्याचे वृत्त आहे. तर, भारतात दहशतवाद माजवताना आणि जगासमोर आपले गार्हाणे मांडताना काश्मीर स्वतंत्र व्हावा किंवा तो पाकिस्तानचा भाग आहे असे सांगत पाकने कायमच काश्मीर मुद्दा उचलून धरला आहे. एका देशाचा अविभाज्य अंग असलेला प्रदेश अशांत करण्याचे बीज पाकने रोवले आहे. त्याचे फळ आज पाकला बलुचिस्तानच्या रूपाने समोर येत आहे.

 

आपल्या अमेरिका दौऱ्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे अमेरिकेत स्थित अनिवासी भारतीयांना संबोधित करत देशाची बाजू विशद केली. त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न खान यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यावेळी केला. मात्र, यावेळी खान यांना यावेळी बलुच समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी उपस्थित समर्थकांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी केल्याची घटना घडली. पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेल्या 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, जागतिक बँकेच्या मसुदा अहवालामध्ये पाकिस्तानचे आर्थिक व्यवस्थापन सर्व ३१ मुद्द्यावर घसरले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेवरुन पाकने जागतिक स्तरावर आपली विश्वसनीयता गमावली असल्याचे दिसून येते, तसेच आर्थिक आणि सामाजिक समस्या आज पाकसमोर उभ्या ठाकल्याचेही दिसते. भारतीय उपखंड आणि भारत अशांत कसा राहील, यासाठी केवळ विविध देशांसमोर कमरेत वाकत आणि द्वेषाची परराष्ट्र नीती ठरविण्याचे बीज पाकने पेरले आहे. त्यामुळे त्यास रसाळ गोमटी फळे तरी कशी आणि कोठून येणार. त्यामुळे पेरावे तसे उगवते या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय सध्या पाकबाबत घडत असलेल्या आंतराष्ट्रीय घटनांवरून दिसून येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@