पवारांच्या 'सभ्य'पणाची गोष्ट !

    31-Aug-2019
Total Views |




मोठ्यांचा आदर करा म्हणजे तोंडाला कुलूप लावा असंच शाळेनं शिकवलय. मोठ्यांच्या विरोधात सवाल केलात म्हणजे तुम्ही उद्धट ठरता. बरं स्वत: पवारांनी ज्यावेळेस राजू शेट्टींची भरसभेत जात काढली त्यावेळेस त्यांचा सुसंस्कृतपणा कुठे गेला होता ? प. महाराष्ट्रातल्या एका महिला नेत्याविरोधात भरसभेत 'खोलात' जाताना सुसंस्कृतपणा माळावर चरायला गेला होता का ?

 

श्रीरामपूरमध्ये पवारांसोबत जे घडलं किंवा जी काही वर्तवणूक त्यांनी केली त्यावर कालपासून काही पोस्ट पडतायत. त्यात बहुतांश पोस्ट या पवारांबद्दल सहानुभूती व्यक्त करणाऱ्या आहेत. काही 'काळ' कसा फिरून त्यांच्या पाठी लागला असं दाखवणाऱ्याही आहेत. काही ज्येष्ठ म्हणवणाऱ्या पत्रकारांनी ज्या पत्रकाराने प्रश्न विचारला त्यावर सवाल उपस्थित करणाऱ्या पोस्ट टाकल्यात. हे पत्रकार बहुतांश ते आहेत जे पवारांच्या कर्तृत्वाने भारावून आणि दबून गेल्यासारखे दिसतात. हरकत नाही, पण मुळ मुद्दा असा की विचारला गेलेला प्रश्न चूक होता का? विचारणाऱ्याची पद्धत चुकीची होती का ? किंवा पवारांना प्रश्नच विचारला जाऊ नये का पवारांच्या दुर्दैवाने या तीनही प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहेत. माझ्या माहितीनुसार प्रश्न विचारणारे पत्रकार हे न्यूज १८ लोकमतचे हरीश दिमोटे होते. मी व्यक्तीश: त्यांना ओळखत नाही. पण पवारांचा कालचा व्हिडीओ पूर्ण बघितला. मला ना हरीशचा प्रश्न चुकीचा वाटला, ना त्यांची पद्धत. खरंतर एवढ्या सामान्य प्रश्नावर पवार ज्या पद्धतीने रिअॅक्टझाले ते पाहून आश्चर्य वाटलं. नातेवाईकावर प्रश्न विचारणं एवढंच चूक असेल, तर मग राजकारणात नातेवाईक करता कशाला किंवा नातेवाईकांनाच सगळी पदं देता कशाला ?

 

शरद पवार, पवारांची मुलगी सुप्रिया, सुप्रियाचे चुलतभाऊ अजित पवार, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार, त्याचा चुलतभाऊ रोहीत पवार, त्याची चुलती सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सुनेत्रांचे भाऊ पद्मसिंह पाटील, त्यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील असा गोतावळा राजकारणात आणि एकमेकांच्या नात्यागोत्यात आहे. एक-एक धागा शोधत गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रावर यातल्याच काही मोजक्या टोळक्याची आलटून पालटून सत्ता असल्याचे वास्तव दिसून येईल. म्हणजे सत्तेचे सगळे सवते सुभे तुम्ही उभे करणार आणि त्यावर कुणी सवाल केला तर थयथयाटही करणार ? बहुतांश वेळा ज्येष्ठ पत्रकार हे 'योग्य' प्रश्न विचारा, मूर्खासारखे बोलू नका अशी भूमिका घेतात. टीव्हीवाल्यांबद्दल हा आकस थोडा जास्त आहे. त्यांच्यादृष्टीनं योग्य प्रश्न म्हणजे साहेबांना फुलटॉस टाकणे आणि त्यावर त्यांनी छक्का मारणे. आपण फिदीफिदी हसत बसणे, आपणच साहेबाचे कसे फेव्हरेट आहोत हे दाखवणे आणि मग एकदिवस साहेबानं भरसभेत, तुमच्याच व्यासपीठावर येऊन तुमचे कपडे उतरेपर्यंत निंदानालस्ती करणे आणि मग तुम्ही एवढुसं तोंड पाडून बसणे. परत निर्लज्जासारखं त्यांच्यासोबतच सेल्फी काढणं आणि वर प्रश्न विचारणाऱ्यालाच दोष देणे. हरीशचं कौतुक यासाठी की त्यांनी प्रश्नही रास्त विचारला आणि त्याचा टोनही, पद्धतही संयमित ठेवली. त्यामुळे पवारांनी फक्त हरिशचीच नाही तर स्वत:च्या वर्तवणूकीबद्दल सार्वजनिक माफी मागायला हवी.

 

पत्रकारांचं काम आहे प्रश्न विचारणे. प्रश्न चूक किंवा बरोबर असा नसतोच. कारण, बहुतांश वेळेस चुकीच्या प्रश्नावरच चांगल्या बातम्या मिळाल्याचं दिसतं आणि बरोबरच प्रश्न विचारायचा तर मग तो प्रश्न कसा आणि त्यावर उत्तर तरी वेगळं काय मिळणार ? फक्त प्रश्नांचा टोनअपमान करणारा नसावा अगदी उद्या दाऊद इब्राहीम जरी भेटला तरी त्यालाही प्रश्नाची ही शिस्त पाळलीच पाहिजे. काल पवारांना ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला त्यात असा काही अपमानजनक टोनहोता का ? उलट ते सभ्यतेची भाषा करताना असभ्य वर्तन करत होते. प्रश्न विचारणाऱ्याला बाहेर काढण्याची भाषा वापरत होते. काहींनी लिहिलंय की पवारांचा आदर ठेवायला हवा. ते एक सुसंस्कृत नेते आहेत. बिलकूल सहमत. पण म्हणजे पवारांना प्रश्नच विचारायचा नाही किंवा मग त्यांना हवं तसे प्रश्न विचारणं असा त्याचा अर्थ होतो का ? याचा दोष आपल्या शिक्षणाचा आहे. मोठ्यांचा आदर करा म्हणजे तोंडाला कुलूप लावा असंच शाळेनं शिकवलय. मोठ्यांच्या विरोधात सवाल केलात म्हणजे तुम्ही उद्धट ठरता. बरं स्वत: पवारांनी ज्यावेळेस राजू शेट्टींची भरसभेत जात काढली त्यावेळेस त्यांचा सुसंस्कृतपणा कुठे गेला होता ? प. महाराष्ट्रातल्या एका महिला नेत्याविरोधात भरसभेत 'खोलात' जाताना सुसंस्कृतपणा माळावर चरायला गेला होता का ? लांब कशाला एवढे सगळे लोक त्या भाजपमध्ये गेले तर पवार कुणावरही एका शब्दानं नाही बोलले पण त्यांना नेमकं चित्रा वाघांवरच कसं बोलावं वाटलं ? तेही त्यांच्या टिपिकल बारीक पण कान कापणाऱ्या स्टाईलने ? पवार हे अतिशय धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी आहेत असं त्यांच्याबद्दल लिहिलं सांगितलं जातं. खरं तर पवार जे काही करतात तसं इतर कुणी केलं की त्याला कपटीच म्हटलं जातं पण इथं पवारांच्या सोयीचं बोलण्याची पद्धत आहे म्हणून ते धूर्त, चाणाक्ष एवढच. कालच्या प्रसंगातही बघा पवार नातेवाईकांचा प्रश्न येईपर्यंत किती मिश्किल पद्धतीनं हसत खेळत मजा घेत उत्तर देत होते आणि नेमका झोंबणारा प्रश्न आला की कसा काय तीळपापड झाला ?

 

शरद पवारांचा व्यासंग खूप मोठा आहे, त्यांचा कामाचा आवाका प्रचंड आहे त्यामुळे तिनपाट पत्रकार त्यांना काय विचारणार असही काही वाचण्यात आलं. बरं कुणाच्या कामाचा आवाका कमी होता ? यशवंतराव चव्हाणांचा की वसंतदादा पाटलांचा की आता फडणवीसांचा ? त्यांच्यात त्या क्षमता आहेत म्हणूनच तर ते तिथं आहेत ना, किंवा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर तो आवाका आणावाच लागतो ना ? नाही आणला तर मग एवढी वर्षे राजकारणात रिलेव्हंट राहाता येईल का ? पवारांचं काम, त्यांचं राजकीय कर्तृत्व कुणीही नाकारत नाही पण म्हणून त्यांच्यावर सवाल नको किंवा त्यांची चिकित्साच नको असं कसं होईल ? बरं ते यशस्वी राजकारणी आहेत तर मग सध्या महाराष्ट्रात जी जातीय बजबजपुरी माजलीय, काही लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात तेही त्यांच्याच पारड्यात जाईल ना ? गेली ५० वर्षे पवार राजकीय जीवनात आहेत आणि हे केवढं मोठं कर्तृत्व असल्याचं पवारांबद्दल नेहमी लिहिलं जातं. कालपासून पुन्हा त्याची आठवण करून दिली जातेय आणि मी म्हणतो हेच तर आपण उभ्या केलेल्या राजकीय व्यवस्थेचं अपयश आहे ना ? नाही तर ते अमेरिकेवाले, ओबामासारख्या व्यासंगी, एकदम फिट, जगाचा आवाका असणाऱ्यालाही दोन टर्म देऊन घरी बसवलं. आपण खूप हुशार आणि ते मूर्खच असतील ?

 

- माणिक मुंढे

( लेखक टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचे पत्रकार असून त्यांच्या या मताशी चॅनलचा काहीही संबंध नाही )