राष्ट्रवादीची पक्षफुटी आणि पवारांचे 'अरण्यरुदन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2019   
Total Views |



शरद पवार यांनी कधीच तत्त्वाचे राजकारण केले नाही. त्यांनी नेहमीच सोयीचे आणि फायद्याचे राजकारण केले. 'इलेक्टिव्ह मेरीट' असलेल्या त्या त्या भागातील, जिल्ह्यातील बलाढ्य नेत्याला गळाशी लावायचे आणि त्याला सत्तेचे आमिष दाखवत आपल्या छत्राखाली ठेवायचे, हेच पवारांच्या राजकारणाचे सूत्र राहिले आहे. आता त्यांच्या पडत्या वेळी मात्र जिल्हाजिल्ह्यातील हेच राजकीय संस्थानिक 'सरशी तिथे पारशी' या तत्त्वाप्रमाणे सत्तेकडे सरकू लागले आहेत.


सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या वेगाने ठिकऱ्या उडतायत, देशाच्या राजकीय इतिहासात तेवढ्या वेगाने खचितच अन्य एखादा राजकीय पक्ष फुटला असेल. मुळात 'पक्ष फोडणे' हा प्रकारच महाराष्ट्रात शरद पवारांनी रूढ केला. पण, आज नियतीचा काव्यगत न्याय असा की, शरद पवारांनाच त्यांच्या राजकीय आयुष्याच्या तिन्हीसांजेला या आमदार आणि नेत्यांच्या फोडाफोडीचा जबर फटका बसलेला दिसतो. गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादीच्या तब्बल दहाहून अधिक नेतेमंडळांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे, तर अन्य किमान दहाहून अधिक नेते हातातले 'घड्याळ' कोणत्याही क्षणी काढून फेकायच्या तयारीतच आहेत. त्यामुळेच की काय, श्रीरामपुरात शुक्रवारी पवारांचे अरण्यरुदन साऱ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले. एवढा ज्येष्ठ व 'जाणता' म्हणवला जाणारा नेता अस्वस्थ आणि असहाय्य झालेला बघणे, हे विचलित करणारे असले तरी ही अवस्था पवारांच्याच आजवरच्या राजकारणाची परिणीती म्हणावी लागेल. काही दिवसांपूर्वीपर्यंत, "मी याआधी सहाचे साठ करून दाखवले आहेत," असे शरद पवार छातीठोकपणे सांगत होते. राज्यातील जिल्ह्यांत नव्हे, तर प्रत्येक तालुक्यात किमान दोन गट स्थापन करणे व त्यांना आपापसांत झुंजवत ठेवणे, ही त्यांची पारंपरिक रणनीती. आता तीच रणनीती त्यांच्यावर बुमरँगप्रमाणे उलटली आहे. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार जितक्या आत्मविश्वासाने आपल्या पक्षाची ख्यालीखुशाली सांगत होते, तो त्यांचा आत्मविश्वास आता कुठे तरी संपल्याचे सध्यातरी दिसते. कारण, राज्यात फक्त सत्ताधारी भाजपमध्येच आत्मविश्वास दिसत असून त्यांचे राजकीय 'अच्छे दिन' सुरू आहेत. राष्ट्रवादीसहित विरोधकांचे मात्र 'बुरे दिन' सुरू झाले असून आता त्यांचा पक्ष संपवूनच ते संपतात की काय, अशी धास्ती आता त्यांनाच वाटू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी 'घड्याळ' सोडून हाती 'शिवबंधन' बांधले. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, त्यांचे आमदार पुत्र वैभव पिचड, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक आणि सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले अशा दिग्गजांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीतील महत्त्वाचे पण सध्या अडगळीत पडलेले 'बलदंड' ओबीसी नेते छगन भुजबळ हे कुटुंबीय आणि अन्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत 'घरवापसी' करणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवाय आपल्यासोबत सहा आमदार फोडण्याचे नियोजन हा एकेकाळचा आक्रमक नेता आखत आहे. दुसरे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या परिवाराबाबतही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे हे कोणत्याही क्षणी 'शिवबंधन' बांधून घेण्याच्या तयारीत आहेत. तीच परिस्थिती कोकणातील दुसरे नेते भास्कर जाधव यांची. त्यांनीही त्यांचे जुने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षांतराचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, नवी मुंबईचे कर्तेधर्ते गणेश नाईक कोणत्याही क्षणी पक्ष सोडतील, असे समजते. मात्र, शरद पवार यांनी अजूनही आशा सोडलेली नाही. ते या वयातही प्रचंड धावपळ करत आहेत. पण, पक्षाला खड्डाच एवढा मोठा पडायला लागलाय की नक्की बुजवणार कुठे, असा प्रश्न त्यांनाही पडला आहे. त्यामुळेच असेल कदाचित, शुक्रवारी श्रीरामपुरात पत्रकार परिषदेत पवारांचा संयम जाहीररित्या सुटला. असे चित्र यापूर्वी पवारांच्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत कधीही दिसले नव्हते. पवारांच्या त्या पत्रकारावरील रागात मोठा अर्थ दडला आहे.

 

महिन्याभरापूर्वी तब्येत बरी नसतानाही पवारांनी मुंबईत हर्षवर्धन पाटलांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास हजेरी लावली. चित्रा वाघ पक्षाबाहेर जाताच रुपाली चाकणकर यांची तातडीने महिला प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली गेली. कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांचे उदाहरण देऊन पक्ष सोडण्यासाठी सत्ताधारी दबाव आणत असल्याचाही आरोप पवारांनी केला. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या पुतण्याशी संपर्क सुरू केला. पुण्यात युवक राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उपस्थित युवा कार्यकर्त्यांना शपथ घ्यायला लावली. शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व कालपरवा पक्षात दाखल झालेल्या खा. अमोल कोल्हेंकडे दिले. साताऱ्यात राजमाता कल्पनाराजे भोसलेंचीही पवारांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली आणि कल्पनाराजे, दमयंतीराजे किंवा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना जावळीतून उभे करण्याची त्यांनी रणनीतीही आखली. त्यानंतर थेट सांगलीत जयंत पाटील यांच्याकडे यापुढे राज्याचे नेतृत्व असेल, याची खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांना पवारांनी दिली. एवढे करूनही गेल्या पाच वर्षांतील निवडणुकांमध्ये राज्यात भाजप ३४ टक्के, शिवसेना १९ टक्के, काँग्रेस २० टक्के आणि राष्ट्रवादी १८ टक्के हीच मतांची टक्केवारी राहिली आहे. मुळात शरद पवार यांनी कधीच तत्त्वाचे राजकारण केले नाही. त्यांनी नेहमीच सोयीचे आणि फायद्याचे राजकारण केले. 'इलेक्टिव्ह मेरीट' असलेल्या त्या त्या भागातील, जिल्ह्यातील बलाढ्य नेत्याला गळाशी लावायचे आणि त्याला सत्तेचे आमिष दाखवत आपल्या छत्राखाली ठेवायचे, हेच पवारांच्या राजकारणाचे सूत्र राहिले आहे. या राजकारणाचा पवार आणि कंपनीला खूप फायदाही झाला. परंतु, आता पडत्या वेळी मात्र त्यांना याच राजकारणाचा तोटा सहन करावा लागत आहे. जिल्हाजिल्ह्यातील राजकीय संस्थानिक आता 'सरशी तिथे पारशी' या तत्त्वाप्रमाणे सत्तेकडे सरकू लागले आहेत. लोकशाहीत मुळात एका मर्यादेपलीकडे एखाद्या नेत्याची ताकद वाढणे घातक ठरते. पवारांनी तर प्रत्येक जिल्ह्यात अशा राजकारण्यांना बळ दिले. पवारांच्या पक्षाची पाळेमुळे खोलवर न गेल्याचा फटकाही त्यांना बसतो आहे. त्याचबरोबर शरद पवार या व्यक्तिमत्त्वाबाबत जी आपुलकी आणि आदराची भावना आहे, ती भावना त्या तुलनेत पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याबाबत पक्षात नाही. हेही राष्ट्रवादीच्या फुटीमागचे एक महत्त्वाचे कारण सांगितले जाते. सत्ता हाती असताना, अजितदादांचा बेदरकार आणि आक्रमक स्वभाव सगळ्यांनी सहन केला. पण, आता पडत्या काळात मात्र पक्षांतर्गत विरोधकांकडून अजित पवार यांच्या या स्वभावाचेही कारण पुढे केले जात आहे. सध्या काँग्रेसचीही पडझड सुरू असली तरी राष्ट्रवादीच्या तुलनेत त्यांची स्थिती तुलनेने बरीच म्हणायला हवी. थोडक्यात, सध्या 'सबकुछ भाजप' अशीच स्थिती राज्यात आहे.

 

कानडी 'सोशल इंजिनिअरिंग'

 

महाराष्ट्राबरोबरच शेजारील कर्नाटकमध्येही भाजपने विरोधकांची धूळधाण उडवत येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये भाजपने प्रथमच तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण केली असून त्यात जातीय आणि प्रादेशिक समतोलही बऱ्यापैकी सांभाळलेला दिसतो. उत्तर कर्नाटकला दोन उपमुख्यमंत्रिपदे देऊन पक्षाने उत्तर भागातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिघांपैकी लक्ष्मण सवदी हे लिंगायत, डॉ. अश्वथ नारायण हे वोक्कलिग आणि गोविंद कारजोळ हे दलित अशा सोशल इंजिनिअरिंगचा कानडी प्रयोगही बऱ्यापैकी साकारला आहे. यापैकी लक्ष्मण सवदी यांची नुकतीच महाराष्ट्राच्या निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्तीही झाली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींविरोधात बंड करू पाहणाऱ्या ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती व भालचंद्र जारकीहोळी यांची मनधरणी करतानाच, "बंडाचा झेंडा फडकावलात तर तुमची गय केली जाणार नाही," असा सज्जड इशाराच भाजप पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. आपापसातील संघर्षात सत्ता गेली तरी काँग्रेस आणि निजद अजूनही सुधरायला तयार नाहीत. कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच कारणीभूत आहेत, असा थेट आरोप माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केला आहे. "आमचा क्रमांक एकचा शत्रू भाजप नव्हे तर सिद्धरामय्या हेच आहेत," असे त्यांचे म्हणणे आहे. यावर सिद्धरामय्या यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. "सरकार पाडण्याची आपल्याला गरज नव्हती. तुमच्या कर्मामुळेच तुमचा पाडाव झाला. तुम्ही आणि तुमचे पुत्र काय आहात हे कानडी जनता ओळखून आहे," अशा शब्दांत त्यांनी आगपाखड केली आहे. त्यात 'सिद्धरामय्या विरुद्ध डी. के. शिवकुमार' हा संघर्षही वाढत चालला आहे. विरोधी पक्षनेतेपद व काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद कोणाला द्यायचे, या मुद्द्यावर सिद्धरामय्या विरोधक एकवटले आहेत. या पदापासून त्यांना दूर ठेवण्याचा डाव असला तरी आजवर विरोधकांना पुरून उरणारे सिद्धरामय्या यावेळीही पक्षात आपले वर्चस्व राखणार अशी लक्षणे दिसत आहेत. कारण, गर्भगळीत काँग्रेसकडे नेतृत्वाची वानवा आहे. खासदार नलिनकुमार कटिल यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना १५० जागांचे लक्ष्य देण्यात आले आहे. जर मध्यावधी निवडणुका झाल्या, तर १५० जागांवर कसा विजय मिळवता येईल, याचा अभ्यास करण्याची सूचना त्यांना पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@