सवाल काश्मीरचा नसून ‘खुर्ची’चा आहे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2019   
Total Views |



पाकिस्तानचे अस्तित्व संपू नये, असे ज्यांना वाटते, ते युद्धाचा विरोध करतील. महाशक्ती पाकिस्तानचे अस्तित्व ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. चीन, अमेरिका, इंग्लड, फ्रान्स यांना पाकिस्तानचे अस्तित्व हवे आहे. प्रत्येक देशाची त्यात भूसामरिक आणि राजकीय नीती आहे. ते पाकिस्तानला युद्ध करू देणार नाहीत. काश्मीरच्या प्रश्नावर शाब्दिक युद्ध पाकिस्तान सोडणार नाही. शाब्दिक युद्धात फक्त शब्दच गोळ्या असतात, क्षेपणास्त्रे असतात, त्यांचा उपयोग तेवढ्यापुरता असतो. मी काश्मीरच्या प्रश्नाबाबत काहीतरी करणारच, ही भूमिका इमरान खानला घेतल्याशिवाय त्याची खुर्ची टिकून राहणार नाही. सवाल काश्मीरचा नसून इमरानच्या खुर्चीचा आहे, हेच खरे!


माझ्या एका डॉक्टर मित्राने माझ्या दाताचे काम करीत असतानाच मला प्रश्न विचारला, “काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानचा एवढा थयथयाट का चालू आहे?” दाताचे काम चालू असताना तोंड बंद ठेवावे लागते. त्यामुळे लगेचच प्रश्नाचे उत्तर देणे मला शक्य नव्हते. हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तसे त्याला भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले आहे. लडाख येथे विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करताना ते म्हणाले, “ज्या काश्मीरसाठी तुम्ही रडत आहात, ते काश्मीर तुमचे होतेच कधीजे तुमचे नव्हतेच मग त्यावर तुमचा हक्क कसापीओके आणि गिलगीट बाल्टिस्तानवर पाकिस्तानने अनधिकृतपणे कब्जा केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असून अत्याचारही वाढले आहेत. त्याकडे पाकिस्तानने लक्ष द्यायला हवे. १९९४ मध्ये आमच्या देशाच्या संसदेने एक प्रस्ताव मंजूर केला असून त्यात भारताची स्थिती आणि भूमिका स्पष्ट केली आहे.” काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे. घटनेचे ‘३७० कलम’ तात्पुरते होते. ते ताप्तुरते म्हणता म्हणता ७० वर्षे राहिले. ते कधी ना कधी तरी रद्द करून काश्मीरला उर्वरीत भारतातील राज्याप्रमाणे समान दर्जा देणे आवश्यक होते. ते काम पंतप्रधान मोदी यांनी केले. काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकला. काश्मीरचे विभाजन केले आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश घोषित करुन टाकला.


यात पाकिस्तानचे काय गेले? म्हटले तर काही गेले नाही. कारण, राजनाथ म्हणतात, त्याप्रमाणे काश्मीर पाकिस्तानचा भाग कधी होता? तो तर भारताचाच भाग होता. त्यामुळे पाकिस्तानला थयथयाट करण्याचे काही कारण नाही. राजकीय शहाणपण आणि सुसंगतता धरुन चालेल, तर तो पाकिस्तान कसला? नेहमी तिरकी चाल चालणे हे पाकिस्तानचे वैशिष्ट्य. त्यामुळे आता पाकिस्तानने भारताविरुद्ध आगपाखड करणे स्वाभाविक आहे. पाकिस्तानची निर्मिती १९४७ साली झाली. त्यापूर्वी पाकिस्तान नावाचा देश नव्हता. पाकिस्तान भारताचाच भाग होता. तेव्हा पाकिस्तानने काश्मीरची मागणी केली. ‘काश्मीरशिवाय पाकिस्तान अपूर्ण आहे,’ आपण म्हणू शकतो सिंधूशिवाय भारत अपूर्ण आहे. काश्मीर जिंकण्यासाठी १९४८ साली, १९६५ साली आणि पुन्हा १९७१ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. या तिन्ही युद्धात त्याचा पराभव झाला. १९७१ च्या युद्धात पूर्व पाकिस्तान, पाकिस्तानमधून फुटून निघाला आणि त्याचा बांगलादेश झाला. काश्मीर राहिले बाजूला, अर्धा पाकिस्तान गमावला ही पाकिस्तानची स्थिती झाली. आता काश्मीरच्या प्रश्नावरून शेवटचे युद्ध करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान तशा वल्गना करीत असतात. पाकिस्तानमध्ये सध्या सरकारच्यावतीने काश्मीर विषयावर जनप्रदर्शने आयोजित केली जात आहेत. इस्लामाबादच्या एका सभेत पंतप्रधान इमरान खान म्हणतात, “आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत काश्मिरी जनतेच्या बाजूने राहणार आहोत. नरेंद्र मोदी यांचे शासन नाझी जर्मनीच्या थर्ड रिचसारखे आहे. (म्हणजे हे शासन हिटलरी शासन आहे.)



पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद म्हणतात की, “ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दोन्ही देशात सर्वंकष युद्ध होईल आणि ते शेवटचे युद्ध असेल. काश्मीरच्या विनाशास नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.” या रशिदविषयी पाकिस्तानात म्हटले जाते की, या महाशयांची भविष्यवाणी कधीच खरी होत नाही. त्यांना आपले रेल्वे खातेदेखील नीट सांभाळता येत नाही. त्यांच्या राजीनाम्याची मागणी वेळोवेळी होत असते. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी रशिद महाशय काहीही बडबडत असतात. बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी ‘गझनवी’ क्षेपणास्त्राची चाचणी केली. या क्षेपणास्त्र चाचणीसाठी पाकिस्तानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने कराची विमानतळावरील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे तीन मार्ग बंद केले होते. गेल्या काही दिवसांपासून भारताला वारंवार युद्धाची धमकी देणार्‍या पाकिस्तानने क्षेपणास्त्राची चाचणी करत भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. या गझनवी क्षेपणास्त्राचा पल्ला २५० किलोमीटरचा आहे. अणुबॉम्ब नेण्याची त्याची क्षमता आहे. पाकिस्तानला हा संदेश द्यायचा आहे की, भारताची प्रमुख शहरे अणुबॉम्बच्या कक्षेत येतात. दुसर्‍या भाषेत पाकिस्तानने भारताला एक प्रकारे अणुयुद्धाची धमकी दिलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना पाकिस्तानच्या आर्थिक समस्या दिसत नाहीत. पाकिस्तानची आर्थिक दिवाळखोरी दिसत नाही. पाकिस्तानातील अंतर्गत दहशतवाद दिसत नाही. त्यांना फक्त काश्मीरच दिसत असतो. म्हणून ते रोज न चुकता काश्मीरविषयी काही ना काही बोलत असतात. ते म्हणतात, “काश्मीरच्या मागे सार्‍या देशाने उभे राहिले पाहिजे. मी काश्मीरचा राजदूत म्हणून जगात जाईन. काश्मीरचा विषय मी जगातील राष्ट्रप्रमुखांसमोर मांडेन. मी त्यांना सांगेन की, हे मोदी शासन सामान्य शासन नाही. त्यांची विचारधारा अत्यंत धोकादायक आहे.” इमरान खान असे म्हणतात, “जगाने काश्मीरच्या प्रश्नात भूमिका घेतली पाहिजे. संघर्ष झाल्यास त्याची जबाबदारी जागतिक समुदायावर येईल. पाश्चात्य वृत्तपत्रे भारतावर टीका करीत नाहीत. मी काश्मिरी जनतेला सांगू इच्छितो की, जग कसेही वागले तरी पाकिस्तान मात्र काश्मिरी जनतेच्या मागेच उभा राहील.


प्रश्न असा निर्माण होतो की, पंतप्रधान इमरान खान यांना एवढे चेकाळायला काय झाले? त्याची दोन कारणे आहेत. पहिले कराण इमरान जरी पंतप्रधान असले तरी सत्ता लष्कराच्या हातात असते. पाकिस्तानी लष्कराचे ७० वर्षांपासूनचे स्वप्न काश्मीर जिंकून घेण्याचे आहे. लष्करप्रमुख आयुब खान याने त्यासाठी सत्ता हातात घेतली आणि १९६५ चे युद्ध खेळले. त्यानंतर झिया-उल-हक या लष्करशहाने सत्ता हातात घेतली. त्याने ‘ऑपरेशन टोपाझ’ या नावाने भारताला दहशतीच्या माध्यमातून १०० जखमा करण्याचे धोरण ठेवले. जिहादी तयार केले. जिहादी तयार करणार्‍या लष्करी तोयबा आणि जैशे मोहम्मदसारख्या संघटना उभ्या केल्या. भारताने दहशतीचे वार सहन केले. नरेंद्र मोदी यांनी त्यांना जशाच तसे उत्तर द्यायला सुरुवात केली. पाकिस्तानी लष्कराला हे अनपेक्षित होते.इंडिया डरपोक है, वो रोयेंगे, चिल्लायेगें, लेकिन कुछ नही करगें’ मोदी यांनी दणके द्यायला सुरुवात केली. हे असेच चालू राहिले तर लष्कराची इभ्रत जाते. म्हणून लष्कर, इमरान खानच्या माध्यमातून थयथयाट करीत आहे. इमरान खानला विरोधी पक्षांकडून सतत लाथा खाव्या लागत आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षाचे शहाबाद शरीफ इमरान खानला टोला लगावताना म्हणतात, “काश्मीर विषयावर पाकिस्तानचा भविष्यकाळ इमरान खान विकायला निघाले आहेत.याच पक्षाची मरीय्यम नवाज म्हणते की, “इमरान खान यांना मार्ग सापडत नाही. इमरान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याचे सुचविले, हा एक सापळा आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. शत्रूने आपल्यासाठी कोणते ताट वाढून ठेवले आहे, हे इमरान खान यांना समजत नाही. आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी इमरान खान यांनी देशाचे आणि काश्मीरचे खूप मोठे नुकसान केले आहे.



बेनझीर भुट्टोचा मुलगा बिलावल भुट्टो (पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख) म्हणतो की, “पाकिस्तानने आता पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझ्झफराबाद हिचे रक्षण कसे होईल, याची चिंता केली पाहिजे.” विरोधी दलाचे म्हणणे असे आहे की, “इमरान खान अयोग्य पंतप्रधान असून त्यांना पाकिस्तानची अर्थव्यवस्था नीट करता आली नाही, ती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. लोकांच्या आर्थिक अडीअडचणी दूर करण्याऐवजी काश्मीर प्रश्नावर ते युद्धाची घोषणा करीत आहेत.” शेवटचा प्रश्न असा होतो की, काश्मीरच्या प्रश्नावरून पाकिस्तान युद्ध करील का? त्याचे उत्तर होय आणि नाही, असे दोन्ही असू शकते. लष्कर आणि इमरान खान यांचे डोके फिरल्यास (दोघांचे मेंदू गुडघ्यात असल्यामुळे ते शक्य आहे) युद्ध होईल. युद्ध झाल्यास त्यात प्रचंड प्राणहानी होईल. पण पाकिस्तानचे अस्तित्व संपेल. पाकिस्तानचे अस्तित्व संपू नये, असे ज्यांना वाटते, ते युद्धाचा विरोध करतील. महाशक्ती पाकिस्तानचे अस्तित्व ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. चीन, अमेरिका, इंग्लड, फ्रान्स यांना पाकिस्तानचे अस्तित्व हवे आहे. प्रत्येक देशाची त्यात भूसामरिक आणि राजकीय नीती आहे. ते पाकिस्तानला युद्ध करू देणार नाहीत. काश्मीरच्या प्रश्नावर शाब्दिक युद्ध पाकिस्तान सोडणार नाही. शाब्दिक युद्धात फक्त शब्दच गोळ्या असतात, क्षेपणास्त्रे असतात, त्यांचा उपयोग तेवढ्यापुरता असतो. मी काश्मीरच्या प्रश्नाबाबत काहीतरी करणारच, ही भूमिका इमरान खानला घेतल्याशिवाय त्याची खुर्ची टिकून राहणार नाही. सवाल काश्मीरचा नसून इमरानच्या खुर्चीचा आहे, हेच खरे!

@@AUTHORINFO_V1@@