
श्रीनगर : अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने भाविकांसाठी सुरक्षा अॅडवायझरी जारी केल्याने व सैन्याच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्याने जम्मू- काश्मीरमध्ये खळबळ माजली आहे. राजकीय नेत्यांमध्ये संभ्रमाचे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत सर्व काही आलबेल असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या हालचालीनंतर येथील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पेट्रोलपंपांवर गर्दी केली असून आपापल्या वाहनात इंधन भरून घेतले आहे. तसेच एटीएमवर पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली असून गरजेच्या वस्तू खरेदीसाठी दुकानांमध्येही गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. नेमके काय होणार, याचा कुणालाच काही अंदाज नसल्याने राजकीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी राज्यपालांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.