समाजासाठी झटणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019   
Total Views |



करिअर मार्गदर्शन शिबीर आणि प्रदर्शन, गृहिणींसाठी 'मी सुगरण स्पर्धा', सफाई कामगार महिलांप्रति कृतज्ञता म्हणून त्यांना साडी वाटप, सर्वसामान्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे म्हणून ग्रीन गणेशा स्पर्धा, स्वातंत्र्यदिनी कांजूर मार्ग- भांडुप येथील तीन शाळा, सात स्वयंसेवी संस्था, पतपेढ्या यांची सहभाग असलेली वृक्षदिंडी आदी अभिनव कार्यक्रम संजय नलावडेंच्या नेतृत्वाखाली 'सोबती फाऊंडेशन'च्या माध्यमातून होत असतात.


एका नामांकित वित्तीय संस्थेचे कार्यालय. कार्यालयाच्या दालनात एक राष्ट्रीय स्तरावरील मोठे अधिकारी त्यांच्या अन्य सहकाऱ्यांसह एका मराठी तरुणाची मुलाखत घेत होते. त्या तरुणाचे काम पाहून दालनातील सारे अधिकारी प्रभावित झाले. एवढा हुशार तरुण आपल्या कंपनीत असला पाहिजे याची नजरेतून अधिकाऱ्यांनी संमती दिली. मात्र, पगाराचा आकडा ऐकून अगदी विनम्रतेने त्या तरुणाने नोकरीचा प्रस्ताव नामंजूर केला. या तरुणामुळे कंपनीची वाटचाल चांगली होईल, हे मोठ्या अधिकाऱ्याने जाणले होते. दुसऱ्या दिवशी त्या मोठ्या अधिकाऱ्याने त्याला फोन करून बोलावले आणि त्याच्यासमोर एक वेगळाच प्रस्ताव ठेवला. प्रस्ताव होता कर्मचारी म्हणून काम न करता, एक सहकारी कंपनी म्हणून सेवा देण्याचा. त्या तरुणासमोर उद्योजक म्हणून उभी राहण्याची संधी होती. 'नोकरी की उद्योग' असा यक्षप्रश्न होता. त्या तरुणाने क्षणाचाही विचार न करता उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. गेल्या १५ वर्षांत या तरुणाने वित्तीय क्षेत्राला महत्त्वपूर्ण सेवा देणाऱ्या दोन कंपन्या उभारल्या आहेत. काही कोटी रुपयांची उलाढाल या कंपन्या आज करत आहे. संधीचे सोने करणारे हे उद्योजक आहेत संजय नलावडे...

 

शोभा आणि अनंत या नलावडे दाम्पत्यांच्या पोटी संजयचा जन्म झाला. अनंत नलावडे हे महापालिकेत कर्मचारी म्हणून रुजू झाले आणि अधिकारीपदास पोहोचल्यावर निवृत्त झाले. अनंत नलावडे हे मनमिळावू आणि मवाळ स्वभावाचे, तर शोभा नलावडे या तितक्याच कडक शिस्तीच्या कणखर गृहिणी होत्या. आपल्या चारही मुलांवर त्यांचे बारकाईने लक्ष असे. काहीशी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने हे चारजणांचं कुटुंब भाड्याने राहात होते. त्यामुळे करी रोड, जोगेश्वरी, वांद्रे अशी मुंबई त्यांनी पाहिली. याकारणास्तव संजयचे प्राथमिक शिक्षण करी रोड येथील महानगरपालिकेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण खेरवाडीच्या शाळेत झाले. संजय हा शालेय जीवनात असल्यापासून एक चांगला क्रिकेटपटू होता. फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध होता. १९९२-९३ साली मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयीनस्तरावरील क्रिकेट स्पर्धेत त्याची फलंदाज म्हणून निवड झाली होती. दुर्दैवाने त्यावर्षी झालेल्या जातीय दंगलीमुळे ती स्पर्धा रद्द झाली आणि देश एका उद्योन्मुख फलंदाजाला मुकला. क्रिकेटच्या मैदानावर थांबलेला संजय मग विद्यार्थी चळवळीच्या मैदानावर उतरला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्याने विद्यार्थी चळवळीस वाहून घेतले. शरद पवार मुख्यमंत्री असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कुलगुरुंना घातलेला घेरावच्या वेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून, दि. ७ सप्टेंबर, १९९३ साली अभाविपने काढलेला विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक विराट मोर्चाच्यावेळी ईशान्य मुंबई प्रतिनिधी म्हणून, २० हजार वनवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मुंबई समन्वयक म्हणून प्रत्येक संघर्षात संजय अग्रेसर होता. अभाविपचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम सोमय्या मैदानात पार पडला. यावेळी मैदानाचे व्यवस्थापन संजयने पाहिले होते. अभाविपचे ईशान्य मुंबई मंत्री झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगले उपक्रम त्याने राबविले. एक वर्ष पूर्णवेळ विस्तारक म्हणून त्याने अभाविपचे काम केले. दरम्यान, भांडुपच्या एका महाविद्यालयातून त्याने पदवी प्राप्त केली.

 

संजयला फोटोग्राफीची आवड होती. एका मित्राकडे तो प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला राहिला. फोटोग्राफीचे सारे बारकावे शिकला. अगदी झाडू मारण्यापासून त्याने तिथे कामं केली. फोटोग्राफीच्या आवडीचे व्यवसायात रुपांतर करावे म्हणून त्याने फोटो स्टुडिओ उभारला. आईने दागिने गहाण टाकून त्यासाठी संजयला पैसे दिले होते. मात्र, या व्यवसायात त्याला अपयश आले. स्टुडिओ बंद झाला आणि संजय कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी आणि आईचे दागिने सोडविण्यासाठी एका बँकेसाठी बँकिग कलेक्शनची नोकरी केली. तिथे त्याची कामगिरी सरस ठरली. संजयचे कर्तृत्व पाहून त्याचा बॉस त्याला म्हणाला होता की,"तू जास्त काळ नोकरी नाही करणार, तर स्वत:ची कंपनी सुरू करशील आणि उद्योजक बनशील." संजयच्या मनावर ते वाक्य कोरले होते. तिथे पगारासोबत त्याला घसघशीत 'इन्सेन्टिव्हज' पण मिळाले. यातून त्याने आईचे दागिने सोडविले. कर्ज फेडले. कालांतराने संजयने नोकरी सोडली आणि मित्रासोबत 'इव्हेन्ट मॅनेजमेन्ट' कंपनी सुरू केली. एक मोठा कार्यक्रम यशस्वी केला. मात्र, आयोजकाने पैसे थकविले. परिणामी संजयला ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी संजय परत बँक कलेक्शनच्या नोकरीकडे वळला. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आल्यावर त्याने एक वेगळा व्यवसाय निवडला. रेल्वेच्या होर्डिंग्ज उभारण्याचे. मात्र, या व्यवसायातील प्रस्थापितांनी संजयला अडथळा आणला. हा व्यवसायदेखील ठप्प झाला. पुन्हा संजय नोकरीसाठी एका नामांकित कंपनीमध्ये मुलाखतीसाठी गेला आणि सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे त्या मोठ्या अधिकाऱ्याने संजयला 'असोसिएट्स' म्हणून स्वतंत्र व्यवसाय उभारण्याचा प्रस्ताव दिला. सोबतच कंपनीचे कार्यालयदेखील वापरण्यास दिले. अशाप्रकारे 'असोसिएट्स' म्हणून व्यवसायाची संधी प्राप्त करणारे संजय नलावडे हे पहिलेच होत. संजय नलावडे यांनी 'बक्स इंडिया' आणि 'एएसई कन्सल्टन्सी' अशा दोन कंपन्या सुरू केल्या. उपरोक्त कंपनीसोबतच बँकिंग क्षेत्रातील इतर बँकांसाठीदेखील संकलनाची ते गेली १५ वर्षे सेवा देत आहेत. सध्या १८० ते १९५ कर्मचारी नलावडेंच्या उद्योग समूहात कार्यरत आहेत. काही कोटी रुपयांची उलाढाल ही कंपनी करत आहे.

 

२००८ साली इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचे संचालक सर्जेराव ठोंबरे यांना या युवकाची कर्तबगारी भावली. त्यांनी सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या आपल्या कन्येचा प्रा. प्राजक्ताचा विवाह संजय नलावडे यांच्याशी करून दिला. नलावडेंच्या उद्योजकीय प्रवासात प्राजक्ता नलावडेंचा सिंहाचा वाटा आहे. 'सामाजिक जबाबदारी पार पाडा' ही अभाविपची शिकवण शिरसावंद्य मानून संजय नलावडेंनी 'सोबती फाऊंडेशन'ची उभारणी केली. महिलांचे सक्षमीकरण आणि तरुण वर्ग हे केंद्रबिंदू मानून संस्था कार्यरत आहे. करिअर मार्गदर्शन शिबीर आणि प्रदर्शन, गृहिणींसाठी 'मी सुगरण स्पर्धा', सफाई कामगार महिलांप्रति कृतज्ञता म्हणून त्यांना साडी वाटप, सर्वसामान्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे म्हणून ग्रीन गणेशा स्पर्धा, स्वातंत्र्यदिनी कांजूर मार्ग- भांडुप येथील तीन शाळा, सात स्वयंसेवी संस्था, पतपेढ्या यांची सहभाग असलेली वृक्षदिंडी आदी अभिनव कार्यक्रम संजय नलावडेंच्या नेतृत्वाखाली 'सोबती फाऊंडेशन'च्या माध्यमातून होत असतात. याद्वारे सामान्यजनांचे सामाजिक प्रबोधन होते. लवकरच ते कांजूरमार्ग-भांडुप-नाहूर येथील सामाजिक कार्य करणाऱ्या लहान मोठ्या अशा सर्व सामाजिक संस्थांचा जाहीर सत्कार करणार आहेत. "संस्कृती जपली तर संस्कार घडतात आणि उत्तम संस्कारातून उत्तम नागरिक घडतात, असेच नागरिक देश घडवतात, त्यामुळे देशाला अग्रस्थानी ठेवून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहोत," असे संजय नलावडे म्हणतात. खऱ्या अर्थाने संजय नलावडे समाजासाठी झटणारे उद्योजक आहेत. अशा अनेक संजय नलावडेंची राष्ट्राला अन् महाराष्ट्राला गरज आहे.

@@AUTHORINFO_V1@@