उपेक्षितांचा आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019
Total Views |



समाजाच्या मूळ प्रवाहापासून अजूनही वंचित असलेल्या वनवासी बांधवांना किशोर बोरसे आणि त्याच्या 'स्पोर्ट सपोर्ट फाऊंडेशन'च्या रुपाने एक मोठा आधार मिळाला. तेव्हा किशोरच्या प्रवासाविषयी आणि मदतकार्याविषयी...


आपल्या आयुष्यात 'स्व'च्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. अशा या आयुष्यात कष्ट सोसून यशस्वी होणाऱ्या व्यक्ती आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभ्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वनवासी पाड्यांवरील मुलांसाठी भरीव काम करणारा किशोर बोरसे. किशोरचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील प्रभाकर बोरसे हे 'बॉईज टाऊन' या शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करतात, तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करीत असे. 'बॉईज टाऊन'च्या शालेय कर्मचाऱ्यांच्या निवासी घरात ते सर्व अजूनही राहत आहेत. घरी गरिबी असूनही स्वाभिमानी किशोरने त्याच्या लहानपणापासूनच छोटे-मोठे काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. कर्मवीर भाऊसाहेब विद्यालयात त्याचे प्राथमिक शिक्षण झाले असून भोंसला मिलिटरी महाविद्यालयामध्ये त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. किशोरने 'बीपीएड' केले असून तो 'बॉईज टाऊन' शाळेत सध्या क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पण, किशोरच्या एकूणच सामाजिक कार्याचा शुभारंभ हा त्याच्या गिर्यारोहणाच्या छंदातूनच झाला.

 

किशोरला गिर्यारोहणाची आवड असल्याने तो आजही वेगवेगळ्या दरीडोंगरांमध्ये भटंकती करत असतो. मात्र, येथील वनवासी पाड्यांची, तेथील लोकांची, मुलांची अवस्था बघून किशोर कमालीचा अस्वस्थ झाला आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी कार्य करण्याचे किशोरने निश्चित केले. यासाठी सुरुवातीला त्याला कोणाचीच साथ लाभली नाही. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला प्रोत्साहन दिले. २०१५ साली त्याने आपल्या कार्यास सुरुवात केली. बोरीचा पाडा, फणसवाडी, निरगुडे या पाड्यांवर तेथील वनवासींचे जीवन त्याने जवळून अनुभवले. या वनवासी बांधवांच्या घरात प्रचंड दारिद्—य. अन्न, वस्त्र आणि इतर मूलभूत सुविधांचाही अभाव. शिक्षणाच्या नावाने तर ठणठणाट. त्यामुळे किशोरला वनवासी भागांत काम करताना अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागले. एका घरात पाच-सहा मुले. त्यांचे आई-वडील शेतीची, मजुरीची कामे करतात. त्यामुळे मुलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष. मग या मुलांमध्ये योग्य मार्गदर्शनाअभावी व्यसनाधीनता बळावते. या सगळ्याचा विचार करुन किशोरने प्रथम वनवासी बांधवांना स्वखर्चातून मूलभूत गोष्टी देण्यास सुरुवात केली. कपडे, धान्य या आवश्यक गोष्टी पुरविल्या. आयुष्यात कधी चप्पलाही न घातलेल्या मुलांच्या पायात चप्पल आली, अंगावर पूर्ण कपडे आले. पण, गंभीर प्रश्न होतो तो या मुलांच्या शिक्षणाचा. ही मुले सरकारी शाळेत जातात. मात्र, योग्य सुविधांअभावी त्यांचे पालक त्यांना वनवासी वसतिगृहात ठेवतात. मात्र, तरीही त्यांची फरफट काही केल्या कमी होत नव्हती. मग किशोरने मित्रांना आपल्या कामाची कल्पना देऊन त्यांचीही मदत घेण्याचे ठरवले. त्यानंतर किशोरने समाजमाध्यमातूनही आपल्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. मात्र, अनेकदा त्याला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. तरीही त्याने आपले काम चिकाटीने सुरूच ठेवले. आज त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असून हजारो हातांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. जवळजवळ तीनशेपेक्षा जास्त मुलांसाठी किशोर काम करतो.

 

'स्पोर्ट सपोर्ट फाऊंडेशन' असे त्याच्या संस्थेचे नाव असून अनेकांनी या वनवासी मुलांसाठी मदत पाठविली आहे. किशोर क्रीडा शिक्षक असल्याने तो वनवासी मुलांना मोफत क्रीडा प्रशिक्षण देतो. यातूनच अनेक चांगले खेळाडू किशोरने तयार केले आहेत. अनेक दानशूर लोकांनी या मुलांना खेळणी, खाद्यपदार्थ, शैक्षणिक साहित्य यांची सढळहस्ते मदत केली. किशोरला त्याची पत्नी प्रिया हिचीदेखील उत्तम साथ मिळाली. प्रिया ही उच्चशिक्षित असून ती किशोरबरोबर या वनवासी पाड्यांवर जाऊन तेथील महिला आणि मुलींच्या समस्या निवारण्यावर काम करते. महिला आणि मुलींसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन शिबीर घेतले जाते. शिवाय त्यांचे प्रश्न प्रिया स्वतः ऐकून घेते. आज किशोर आणि प्रियाचा या वनवासी मुलांचा खूप मोठा परिवार आहे. महिलांचे अनेक गंभीर प्रश्न असून गरिबीमुळे त्या वर्षानुवर्ष ते सहन करतात. मासिक पाळीसारख्या विषयावर त्यांना मार्गदर्शनही केले जाते. किशोर म्हणतो, "हे वनवासी बांधव विकासापासून आजही खूप लांब आहेत. पण, या मुलांसाठी काम करताना मी खूप काही शिकलो. तरीही या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी मला आणखीन मेहनत करायची आहे." अशा या ध्येयाने झपाटलेल्या किशोरने आयुष्यात वेगवेगळ्या पावलांवर अनेकदा अपयश पचविले आहे. मात्र, तो कधीही मागे हटला नाही. किशोरच्या या कार्याला 'आई फाऊंडेशन' आणि 'रोटरी क्लब ऑफ नाशिक' यांच्याकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आजही किशोरला आपल्या कामाचा कोणताही गर्व नाही, उलट अत्यंत साधेपणाने तो आपले काम करीत आहे. पण, त्याला अजून खूप काम करायचे असल्याचे तो सांगतो. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तो हे कार्य करीत असून यामध्ये त्याच्या मित्रांची साथ अनमोल आहे. किशोरच्या या सामाजिक कामासाठी अनेकानेक शुभेच्छा!

 

- कविता भोसले

@@AUTHORINFO_V1@@