इराणमध्ये 'हिजाब'चा गहजब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019   
Total Views |


 


२० वर्षांच्या अफसरी नावाच्या युवतीला इराण, तेहरानच्या रिव्ह्यूलशनरी न्यायालयाने २४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कारण, तिने हिजाबविरोधी अभियान चालवले. अफसरी आणि तिची आई राहिला अहमदी या दोघी 'व्हाईट वेन्सडे' या अभियानाच्या प्रमुख आहेत.


सगळ्या गरजा माणसांसाठी की माणूस या गरजांसाठी? जगाच्या पाठीवर विचार केला तर दिसते की, माणसांची विभागणी स्त्री आणि पुरुष या लिंगभेदात केली आहे. तसेच मूलभूत गरजा स्त्री आहे की पुरुष यानुसार ऐच्छिक किंवा सक्तीच्या होत असतात. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 'हिजाब.' 'हिजाब,' 'नकाब', 'बुरखा', 'आबाया' सगळे एकाच माळेचे मणी. मात्र, हे मणी सांभाळावे लागतात ते केवळ स्त्रियांनाच! अर्थात स्त्रीने डोके, तोंड असं पूर्ण शरीर झाकणं हा या असल्या पोषाखामागचा हेतू आहे. सौदी अरेबिया, इराण आणि काही मुस्लीम देशांमध्ये स्त्रियांना हा पोषाख सक्तीचा आहे. सक्ती मग ती चांगल्यासाठी असो की वाईटासाठी, जर ती कुणीतरी कुणावर तरी लादली असेल तर तिच्याविरोधात बंड होणारच होणार.

 

इराणमध्येही हेच घडत आहे. २० वर्षांच्या अफसरी नावाच्या युवतीला इराण, तेहरानच्या रिव्ह्यूलशनरी न्यायालयाने २४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कारण, तिने हिजाबविरोधी अभियान चालवले. अफसरी आणि तिची आई राहिला अहमदी या दोघी 'व्हाईट वेन्सडे' या अभियानाच्या प्रमुख आहेत. या अभियानांतर्गत महिला दर बुधवारी हिजाब न घालता व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करतात. हिजाब न घातलेले जवळजवळ २०० व्हिडिओ या अभियानात इराणी महिलांनी पोस्ट केले. जवळजवळ पाच लाख लोकांनी ते पाहिले. हिजाबचा थेट संबंध कुराण, इस्लामशी लावत हिजाब नाकारणाऱ्या अफसरीला मग ही सजा सुनावली गेली. न्यायाधीशांनी ही सजा सुनावताना सांगितले की, "२४ वर्षांच्या शिक्षेतील १५ वर्षांची शिक्षा ही दोन कारणांसाठी आहे, एक तर हिजाब न घालून समाज भ्रष्ट केला आणि दुसरे हिजाब उतरवून वेश्यावृत्तीला प्रोत्साहन दिले." हिजाब म्हणजे डोके झाकणारे वस्त्र न घातल्यामुळे समाज भ्रष्ट कसा होतो किंवा वेश्यावृत्ती कशी बोकाळते? हा प्रश्न मानवी मूल्यांची पाठराखण करणाऱ्या साऱ्यांनाच पडला आहे. पण, इराणी स्त्रियांसाठी हे नवे नाही. तिथेही मुस्लीम क्रांती पोलीस दल आहे. जे सामान्य वेषात असते. सार्वजनिक ठिकाणी नऊ वर्षांच्या पुढील मुलीच्या डोक्यावर जर हिजाब नसेल तर तिला थांबवले जाते. अर्वाच्य बोलत तिला हिजाब नीट करायला लावला जातो. या पोलिसांकडे टिश्यू पेपरही असतो. कशाला? तर त्यांना वाटले की, समोरच्या महिलेने मेकअप केला आहे आणि तो इस्लामी धर्माविरोधी आहे, तर पोलीस त्या महिलेला टिश्यू पेपर देतात, मेकअप पुसायला लावतात. जर कोणी हिजाब घातलाच नसेल, तर १० दिवस ते एक महिना किंवा मग कितीही दिवसाची शिक्षा तिला फर्मावण्यात येते.

 

इराणमधील स्त्रियांची स्थिती पाहिली की वाईट वाटते. इराणमध्ये १९७९ साली मुस्लीम क्रांती झाली आणि सगळ्यात मोठे नुकसान झाले ते इराणी स्त्रियांचे. अय्यातुल्ला खोमेनी या नेत्याने या मुस्लीम क्रांतीच्या आड महिलांसाठी तथाकथित धर्मबंधयुक्त जगणे सक्तीचे केले. त्यात मुख्य होते की, महिलांनी हिजाब घालणे सक्तीचे आहे. जगभरात 'मी टू' नावाचेच कॅम्पेन सुरू आहे. यात स्त्रियांवरील अत्याचाराला वाचा फोडली जाते, तर यावर खामेनी यांचे म्हणणे, ''हिजाब घाला, म्हणजे तुम्हाला 'मी टू' करावे लागणार नाही." घ्या, आता काय बोलावे? तर हे खोमेनी सध्या इराणमधील महिलांच्या जगण्याबाबत नियमन करत आहेत. या हिजाबसक्तीचे कारण देताना दोन प्रवाह दिसतात. त्यापैकी एक प्रवाह कुराणाचा दाखला देत सांगतो की, प्रेषित मोहम्मद यांनी महिलांनी सांगितले की, महिलांनी नम्रता, सभ्यता दर्शवणारा, आपले शरीर झाकणारा पोषाख घालावा, तर दुसरा प्रवाह सांगतो की, प्रेषित मोहम्मद यांनी हे सगळ्याच मुस्लीम स्त्रियांना सांगितले आहे, असे कुठेही लिहिलेले नाही. मात्र, याच पार्श्वभूमीवर अतिशय धार्मिक असलेल्या मुस्लीम स्त्री-पुरुषांशी चर्चा केल्यावर त्यांचे म्हणणे असते की, "स्त्रीच्या शरीरातील सगळ्यात आकर्षक गोष्ट केस असतात. ते केस जणू सैतानच असतात. त्यामुळे पुरुषांच्या मनात सैतानाची आसक्ती येते. पुरुषांच्या मनात स्त्रीबाबत तसे काही येऊ नये, यासाठी स्त्रीनेच खबरदारी घेत स्वतःच काळजी घ्यावी आणि आपले डोके झाकून घ्यावे." हे पाहून वाटते, सुदैवाने भारत देशाला विशाल सहिष्णूतेची आणि संवेदनशील संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भारतीयांना सर्वच स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे हिजाबचा गजहब आपल्याकडे नाही. मात्र, या सर्व स्वातंत्र्याची आपल्याला कदर आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@