मुंबई : अक्षय कुमारच्या मिशन मंगल हा चित्रपट बॉक्स ऑफिसावर जोरदार कमाई करत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा आणि भारतासाठी अभिमान असणाऱ्या मंगल मोहिमेची लोकांना माहिती मिळावी याकरिता हा निर्णय झाल्याचे कळते. चित्रपटाने आत्तापर्यंत १६८ कोटींची कमाई केली आहे.
१५ ऑगस्ट ला मिशन मंगल हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ति कुल्हारी, शर्मन जोशी, नित्या मेनन, संजय कपूर आणि जीशान अयूब यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. जगन शक्ती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारने राकेश कुमार यांची भूमिका साकारली आहे. देशासाठी प्रेरणादायी ठरलेल्या अंतराळ मोहिमेची महिती या चित्रपटात दाखवली आहे.