'वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ऋषिकेश वाघचे वन्यजीव संशोधनकार्य अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2019
Total Views |

 

वन्यजीव परिषदेत ऋषिकेशने केलेल्या बिबट्याच्या संशोधनकार्याला प्रथम पारितोषिक


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यात पुण्यात पार पडलेल्या 'वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल' मधील वन्यजीव परिषदेत तरुण वन्यजीव संशोधक ऋषिकेश वाघच्या संशोधनकार्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. 'शेतजमिनींमध्ये वावरणाऱ्या बिबट्य़ांचा अधिवास आणि त्यांचे खाद्य' या विषयावर ऋषिकेशने सादरीकरण केले होते. ऋषिकेश हा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने आजवर राज्यातील महत्त्वाच्या वन्यजीव संशोधनकार्यांमध्ये काम केले आहे.

 

 
 

'नेचर वाॅॅक चॅरिटेबल ट्रस्ट', 'फर्ग्युसन महाविद्यालय' आणि 'महाराज्य राज्य वन विभाग वन्यजीव' (पश्चिम) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला वन्यजीव चित्रपट महोत्सव पुण्यात पार पडला. तीन दिवसीय या महोत्सवात वन्यजीव विषय माहितीपट, व्याख्यान आणि परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात तरुण वन्यजीव शोधकर्त्यांना त्यांनी केलेले संशोधनकार्य सादर करण्याची संधी देण्यात आली. त्यासाठी 'नेचरेन्टेशन' ही परिषद आयोजली होती. या परिषदेत ऋषिकेश वाघ याने 'शेतजमिनींमध्ये अधिवास करणाऱ्या बिबट्यांची बदलती आहारशैली' या आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले. या सादरीकरणाला परिषदेत प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळाले आहे. भारतातील प्रसिद्ध छायाचित्रकार धिर्तीमान मुखर्जी यांच्या हस्ते ऋषिकेशला हे पारितोषिक देण्यात आले. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे ट्रस्टी डाॅ. शरद कुंते, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रवींद्र परदेशी आणि पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. सचिन पुणेकर उपस्थित होते.

 
 

ऋषिकेश हा फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जीवशास्त्र पदवीच्या तृतीय वर्षामध्ये शिकत आहे. त्याने परिषदेत सादर केलेले संशोधनाचे काम नाशिकमधील निफाड येथे केले होते. मानवी वस्तीनजीक असलेल्या शेतजमिनींमध्ये अधिवास करणारा बिबट्या गरजेनुसार आपल्या आहारात कसा बदल करतो, यावर त्याने संशोधन केले. यासाठी त्याला प्रसिद्ध वन्यजीव संशोधिका डाॅ. विद्या अत्रेय, संशोधक निकीत सुर्वे आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या डाॅ. अनुक्रिती निगम यांचे मार्गदर्शन मिळाले. याशिवाय ऋषिकेशने मुंबईच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील बिबट्यांच्या संशोधनकार्यात काम केले आहे. कान्हा-पेंच व्याघ्र प्रकल्पात आढळणाऱ्या हरणांच्या जातींवरील संशोधनकार्यातही त्याचा सहभाग होता. तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात वावरणाऱ्या वन्यजीवांच्या अभ्यासाकरिता केलेल्या 'कॅमेरा ट्रॅपिंग' प्रकल्पामध्येही तो सहभागी होता. याशिवाय राजस्थानमधील झालना बिबट्या राखीव वनक्षेत्रात त्याने 'कॅमेरा ट्रॅपिंग' केले आहे.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@