'टाचणी'चा डॉक्टर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2019   
Total Views |

 


डॉक्टर असूनही वन्यजीव संशोधनामधील 'टाचणी'सारख्या ('चतुरा'चा एक प्रकार) दुर्लक्षित घटकांवर अभ्यास करून जगाकरिता नव्या असलेल्या 'टाचणी'च्या प्रजातीचा उलगडा केलेल्या डॉ. दत्तप्रसाद अविनाश सावंत याच्याविषयी...


'चतुर' किंवा 'टाचणी'च्या शेपटीला धागा बांधून त्यांना हवेत उडताना पाहण्याचा आनंद त्यानेदेखील तुमच्या-आमच्यासारखाच बालपणी लुटलाय. पण, त्यावेळी त्याला पुसटशीही कल्पना नव्हती की, भविष्यात आपण जगासमोर 'टाचणी'च्या नव्या प्रजातीचा उलगडा करणार आहोत. तो पेशाने डॉक्टर. रुग्णांच्या सेवेत झटणारा. मात्र, रुग्णालयातील औषधांच्या अंगभर भिनभिनणाऱ्या दर्पाबरोबरच जंगलातल्या मातीच्या गंधात मिसळणारा. रुग्णसेवा करतानाच त्याने आपली वन्यजीवांची आवड जपली, ती फुलवली आणि त्यातील दुर्लक्षित घटकावर संशोधन केले. 'टाचणी'च्या 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' या नव्या प्रजातीचा शोध लावला. सध्या परळच्या 'किंग एडवर्ड स्मारक रुग्णालया'त म्हणजेच 'केईएम रुग्णालया'मध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेला हा ध्येयवेडा म्हणजे डॉ. दत्तप्रसाद सावंत.

 

 
 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील दि. १ जानेवारी, १९९३ सालचा दत्तप्रसादचा जन्म. प्राथमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणही तिथलेच. लहानपणापासूनच तो हुशार, शांत आणि मृदुभाषी. त्याच्यासाठी देवगडच्या घराचे आवार जणू छोटे जंगलच. ऋतुमानानुसार त्या जंगलात बदलणारा निसर्ग त्याला खुणवायचा. घराच्या अंगणात बागडणारी फुलपाखरे त्याला आकर्षित करायची. सुरुवातीला चित्रकलेत रमणाऱ्या दत्तप्रसादाला पुढे छायाचित्रणाची ओढ निर्माण झाली. महाविद्यालयीन वयात हाती कॅमेरा आल्यावर त्याने फुलपाखरांची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. मात्र, ही फुलपाखरे कोणती, त्यांची जात कोणती, त्यांना कसे ओळखावे, यासंबंधी त्याला मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. म्हणून त्यांची ओळख पटविण्यासाठी दत्तप्रसाद ती छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकू लागला. समाजमाध्यमांमुळे त्याची ओळख निरनिराळ्या लोकांबरोबर झाली. त्यातील एक नाव म्हणजे फुलपाखरूतज्ज्ञ संशोधक कृष्णमेघ कुंटे. फुलपाखरांबरोबरच तो 'चतुर' आणि 'टाचण्यां'चेही निरीक्षण करू लागला. वन्यजीवांची ही आवड रुजत असताना शैक्षणिक पातळीवर मात्र वैद्यकीय शिक्षण घेण्याचे त्याच्या मनी पक्के होते. त्यामुळे दत्तप्रसाद बारावीनंतर एमबीबीएसचे शिक्षण घेण्याकरिता मुंबईत आला.

 

सर ज. जी. रुग्णालयाच्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याचे एमबीबीएसचे शिक्षण सुरू झाले. शिक्षणाबरोबरच तो मुंबईत फुलपाखरांच्या शोधार्थ भटकू लागला. दक्षिण मुंबईतील हँगिंग गार्डन त्याने फुलपाखरांच्या मागे पिंजून काढले. या भटकंती दरम्यान काढलेले फोटो तो 'आय फाऊंड बटरफ्लाय' या संकेतस्थळावर टाकू लागला. त्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे फुलपाखरांवरदेखील अभ्यास करता येऊ शकते, ही बाब त्याच्या लक्षात आली. मधल्या काळात २०१७ मध्ये गोव्यामधील 'चतुर' या प्रजातीवर झालेल्या चर्चासत्रात तो सहभागी झाला होता. या बैठकीत घडलेल्या चर्चेअंती त्याला 'चतुर' आणि 'टाचण्यां'मध्ये रस निर्माण झाला. वर्षातील काही काळ जेव्हा फुलपाखरे दिसत नाहीत, तेव्हा तो 'चतुरा'चे छायाचित्र काढू लागला. त्याच्या लक्षात आले की, हे 'चतुर' आणि 'टाचणी' वर्षाचे १२ महिने आढळतात. त्यामुळे दत्तप्रसादने त्यांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. असेच एकदा २०१७ मध्येच सुट्टीच्या काळात दत्तप्रसाद देवगडला गेला असता, विमलेश्वर गावात त्याने एका 'टाचणी'चे छायाचित्र काढले. प्रथमदर्शी त्याला ही 'टाचणी' वेगळी भासली. म्हणून संशोधक शंतनू जोशीच्या मदतीने त्याने या 'टाचणी'चे नमुने बंगळुरू येथील 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स' या संस्थेत तपासणीकरिता पाठवले. 'आकारशास्त्रा'च्या (मार्फोलॉजी) आधारे निरीक्षण केल्यानंतर ही प्रजात तिच्या पोटजातीमधील इतर प्रजातींपेक्षा स्पष्टपणे वेगळी असल्याचे दिसले. त्यामुळे तिच्यावर शोधनिबंध लिहून तो 'जर्नल ऑफ थ्रेअटेन्ड टॅक्सा' या संशोधन पत्रिकेकडे पाठविण्यात आला. अखेरीस दत्तप्रसादने शोधून काढलेली प्रजात जगाकरिता नवीन असल्याच्या शोधावर 'जर्नल ऑफ थ्रेअटेन्ड टॅक्सा'ने शिक्कामोर्तब केले.

 

सध्या तो केईएम रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर पदावर काम करत असून 'प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषधवैद्यकशास्त्र' या विषयात एमडीचे शिक्षण घेत आहे. असे असले, तरी निसर्गाने त्याचा पाठलाग सोडलेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने तो राज्याच्या सागरी जिल्ह्यांमध्ये आढळणाऱ्या पाणथळींचे सर्वेक्षण करत आहे. त्यामध्ये आढळणाऱ्या जैवविविधतेची नोंद तो या कामाअंतर्गत करतोय. 'बक्सा व्याघ्र प्रकल्पा'मध्ये त्याने टिपलेल्या 'कामासिनिया हार्टेर्टी' (हिमालयन रेड नाईट) ही जवळपास हाताच्या पंजाएवढी 'चतुरा'ची जात भारतात १०० वर्षांनी दिसून आली आहे. त्यामध्येही दत्तप्रसादने टिपलेला मादीचा फोटो हा एकमेव आहे. याशिवाय त्याने हँगिंग गार्डनमधील फुलखारांची आणि गोरेगावमधल्या आरे वसाहतीतील तलावामधून नोंदवलेल्या चतुरांच्या प्रजातींची चेकलिस्ट येत्या काळात प्रसिद्ध होणार आहे. अशा ध्येयवेड्या दत्तप्रसादला त्याच्या भविष्यातील वाटचालीकरिता दै. 'मुंबई तरुण भारत' कडून शुभेच्छा !

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@