हिंदू देवदेवतांची विटंबना करणाऱ्या अशी कलिमचा अटकपूर्व जामीन फेटाळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2019
Total Views |



 

अशी कलिम हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता


मुंबई : हिंदू देवदेवतांची अवहेलना आणि विटंबना करणारे ट्विट प्रसारित करणारी लेखिका अशी कलिम हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. हा अर्ज फेटाळल्याने अशी कलिम हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कलिम हिच्या ट्विट्समुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याबद्दल तिच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने आज कलिम हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी केली आणि तो अर्ज फेटाळून लावला.

 

जुलै महिन्यात लेखिका अशी कलिम हिने आपल्या ट्विटर खात्यावरून हिंदू देवदेवतांबाबत असभ्य शब्दांत अनेक ट्विट्स केले होते. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याबद्दल ॲड. चांदनी शाह यांनी गेल्या २२ जुलै रोजी गोरेगाव येथील बांगूरनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. अशी कलिम हिने न्यायालयात गुन्ह्याची लेखी कबुली देत माफी मागितली. चांदनी यांनी स्वतःच आपली बाजू मांडली तर अशी कलिम हिच्यावतीने ॲड. सनी वासकर यांनी युक्तिवाद केला.

 

निकाल देताना न्यायालयाने स्त्री म्हणून आपल्या पक्षकाराचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती ॲड. वासकर यांनी केली. कलिम हिच्या ट्विटसोबत छेडछाड केल्याचीही माहिती त्यांनी न्यायालयास दिली. अशा संवेदनशील प्रकरणात अशी हिचा स्त्री म्हणून नव्हे तर केवळ एक व्यक्ती म्हणून विचार केला जावा, हा ॲड. चांदनी शाह यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानला आणि आपला निर्णय दिला.

 

समाजमाध्यमांवर अशा प्रकारचा वादग्रस्त मजकूर शेअर केल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, समाजात अशांतता पसरू शकते, असे सांगत, न्यायालयाने अशी कलिम हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ), २९५(अ), ५०४ व ५०६ अंतर्गत अशी कलिमला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@