असे घडले क्रिकेटचे 'सर'जी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2019
Total Views |



आर्थिक पाठबळ नसताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पायरी चढण्याचे स्वप्न आपल्या जिद्दीच्या बळावर पूर्ण करणाऱ्या रवींद्र जडेजाच्या संघर्षमय आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


क्रिकेट हा खेळ 'श्रीमंतांचा' मानला जात असला तरी सर्वसामान्य हा खेळ खेळत नाही असा भाग नाही. सर्वसामान्यही हा खेळ मोठ्या आनंदाने खेळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक यशस्वी क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक कमावण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, त्यासाठी क्लबमध्ये जाऊन क्रिकेटचे प्रशिक्षण घेणे सर्वांनाच परवडण्यासारखे नसते. त्यामुळे अनेकांची मोठा क्रिकेटपटू होण्याची स्वप्ने खुलण्याआधीच कोमेजतात. परंतु, याला काहीजण अपवाद ठरतात. काही सर्वसामान्य कुटुंबांमधील मुले आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन क्रिकेट खेळण्याची स्वप्ने बाळगतात आणि ती आपल्या जिद्दीने पूर्णही करतात. केंद्र सरकारतर्फे नुकताच 'अर्जुन पुरस्कार' जाहीर करण्यात आलेला क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा त्यांपैकीच एक. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या जडेजाने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्णही केले. शून्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पायरी चढणाऱ्या क्रिकेटमधील या 'सर'जी यांच्या आयुष्याची कहाणीही तितकीच संघर्षपूर्ण आहे.

 

रवींद्रसिंह अनिरूद्धसिंह जडेजा याचा जन्म दि. ६ डिसेंबर, १९८८ला गुजरातमधील सौराष्ट्र जिल्ह्यातील नवागम येथे त्याचा जन्म झाला. रवींद्र जडेजा याचे वडील अनिरूद्ध जडेजा त्यावेळी एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. घरची परिस्थिती जेमतेम. त्यामुळे रवींद्रने आपले शिक्षण लवकरात लवकर पूर्ण करून नोकरी करावी, अशीच कुटुंबीयांची मानसिकता. आधीपासूनच विविध खेळांमध्ये रूची असणाऱ्या रवींद्र जडेजा याला शिक्षणाची तशी फार आवड नव्हती. शिकण्यात रवींद्रला फारशी रूची नसल्याने त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून भारतीय लष्करी सेवेत नोकरी करण्याकडेच कुटुंबीयांनी जोर दिला होता. त्यादृष्टीने रवींद्रची तयारीही सुरू होती. मात्र, नियतीच्या मनात काय होते, कुणास ठाऊक? अनेक प्रयत्न केल्यानंतरही लष्करी सेवेऐवजी क्रिकेटमध्ये करिअर करण्यातच त्याला रस वाटत होता. तालुकास्तरावर क्रिकेट सामने खेळण्यासाठी रवींद्रने आपल्या मित्रांसोबत सराव सुरू केला. महाविद्यालयातून घरी आल्यावर उन्हातान्हात शेतामध्ये रवींद्र गोलंदाजीचा सराव करत असे. आपल्या मित्रांना क्लबमधील प्रशिक्षण मिळते. मात्र, आपल्याला ते परिस्थितीमुळे मिळू शकत नाही, याची जाणीव वारंवार होत असल्याने अनेकदा मन खचायचे. याबाबत समजूत घालण्यासाठी कोणीही नसले, तरी रवींद्र यातून स्वतःच सावरायचा. तो दिवस-रात्र वेळ मिळेल तसा एकटाच सराव करायचा. क्रिकेटच्या सरावाऐवजी अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांकडून जोर दिला जाई. मात्र, क्रिकेटमध्येच रूची असणाऱ्या रवींद्रचे मन खेळातच अधिक रमायचे. त्यामुळे वारंवार क्रिकेट खेळण्यासाठीच त्याची पावले वळत.

 

डावखुरी फिरकी गोलंदाजी असल्याने रवींद्र जडेजाच्या समावेशासाठी प्रत्येक संघाकडून आवर्जून मागणी केली जायची. आर्थिक परिस्थितीमुळे रवींद्रला क्लबमध्ये जाऊन प्रशिक्षण घेणे शक्य होत नव्हते. क्लबमधील प्रशिक्षण मिळाले नसले तरी स्वबळावरच सराव करत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने तालुकास्तरावरील सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत प्रशिक्षकांवर आपली छाप पाडली. रवींद्र जडेजाचे शालेय शिक्षण सुरूच होते. इतक्या कमी वयातच त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या प्रभावी गोलंदाजीची दखल सौराष्ट्रमधील अनेक प्रशिक्षकांनी घेतली. त्यानंतर अनेक प्रशिक्षकांनी त्याला स्वतःहून प्रशिक्षण देण्याचे ठरवले आणि येथूनच रवींद्रच्या करिअरला कलाटणी मिळाली. क्लबमधील प्रशिक्षकांच्या सल्ल्यानंतर त्याच्या गोलंदाजीचा मारा आणखीन प्रभावित झाला. त्यामुळे तालुक्यानंतर जिल्हा आणि राज्यस्तरावर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न लवकरच साकार झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्णही झाले नव्हते, तेव्हाच रवींद्र जडेजा विविध क्रिकेट सामन्यांमध्ये आपली छाप पाडू लागला होता. डावखुरा गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू असल्याचा फायदाही त्याला झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी त्याला चालून आली. २००६ साली श्रीलंकेत पार पडलेल्या 'अंडर-१९ विश्वचषक क्रिकेट' स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर २००८ साली झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही त्याचा समावेश झाला. येथेही उत्तम कामगिरी केल्याने जडेजाचा नावलौकिक झाला. विश्वचषक स्पर्धेनंतरही त्याने राष्ट्रीय पातळीवरील सामन्यांमध्ये चांगला खेळ केला. तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने त्याच्या गोलंदाजीची दखल घेत त्याला आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. २००९ साली श्रीलंकेविरूद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने पदापर्णातच दमदार कामगिरी करत संघातील आपले स्थान पक्के केले. त्यानंतर जडेजाच्या कामगिरीचा धडाका सुरूच राहिला. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये खेळण्याची जडेजाची क्षमता असून अष्टपैलू खेळाडू म्हणून जडेजाने अव्वल क्रमांकही पटकाविला आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने नुकतीच 'अर्जुन पुरस्कारा'साठी त्याची निवड केली. दै. 'मुंबई तरुण भारत'तर्फे पुढील प्रवासासाठी त्याला शुभेच्छा!

 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@