'वारसा २०१९' स्पर्धेमध्ये लोककलांचा आविष्कार

    26-Aug-2019
Total Views |


 

भारताला लाखो वर्षांचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याच पार्श्वभूमीवर मिरीयाड आर्टस् आयोजित 'वारसा' ही लोककला स्पर्धा नुकतीच मुंबईतील ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडली. ही लोककला स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश लोप पावत जाणाऱ्या लोकनृत्य, लोकसंगीत, लोकनाट्य, लोकसाहित्य हे सर्व लोककला प्रकार रसिक प्रेक्षकांसमोर सादर व्हावे तसेच कलाकारांना आपली लोककला सादर करण्यासाठी एक चांगला मंच मिळावा हा आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी १७ तारखेला ठाण्यात संपन्न झाली. यावर्षीच्या 'वारसा २०१९' स्पर्धेचा विजेतेपदाचा मान 'पोवाडा' हा प्रकार सादर करणाऱ्या गोविंद मरशिवणीकर याला मिळाला.

संस्कृतीचा, कलेचा आणि आपलेपणाचा 'वारसा' असलेल्या या स्पर्धेचे हे सलग तिसरे यशस्वी वर्ष. ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे ललित कला, दृश्य कला, इव्हेंट्स या क्षेत्रात काम करणाऱ्या ४० पेक्षा जास्त लोकांचा हातभार लागला आहे. दरम्यान या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निमित्त साधून नृत्यगौरव पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांचा देखील त्यांच्या कलाक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल आयोजकांकडून सत्कार करण्यात आला.

 

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर यांच्यासह बालगंधर्व, नटरंग, बालक पालक, टाईमपास अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्या मेघना जाधव, आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना भुरळ पाडणाऱ्या गायिका जान्हवी प्रभू-अरोरा,आपल्या उत्कृष्ट अदाकारीने, कोरिओग्राफीने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध डान्स डायरेक्टर, कोरीओग्राफर कृती महेश, मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व गीता निखार्गे, टीव्ही मालिका, चित्रपट जाहिरातींमधून आपल्या परिचयाची असेलली सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत या सर्व प्रसिद्ध कलाकारांनी 'वारसा २०१९' या लोककला स्पर्धेमध्ये यावर्षी उपस्थिती दर्शवली.

'वारसा २०१९' ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या मिरीयाड आर्टस् या संस्थेचे सह-संस्थापक श्रेयस देसाई यांनी या स्पर्धेविषयी बोलताना,"वारसा २०१९ ही स्पर्धा म्हणजे कलावंतांना आपली लोककला सादर करण्यासाठीचा एक मंच आहे. ही संकल्पना काही तरुण मुलांनी साकारली असून लोककलेचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार या स्पर्धेच्या माध्यमातून व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि म्हणून ही स्पर्धा आयोजित करत असताना आम्ही सर्व प्रवाहातील कलाकारांना आवाहन करत आहोत. विद्यार्थी, व्यावसायिक, स्थानिक कलाकार यांनी त्यांची स्वतःची संस्कृती लोककलेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचावी आणि एकप्रकारे आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा सर्वदूर उमटाव्या यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आहे." अशी माहिती दिली.