स्वाईन फ्लू : लक्षणे, उपचार आणि सावधनता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |



'एच१-एन १' या नावानेही ओळखला जाणारा 'स्वाईन फ्लू' म्हणजे अनेक प्रकारच्या 'स्वाईन इन्फ्लुएन्झा' विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गातून होणारा आजार. या आजाराची लक्षणे, उपचार पद्धतींविषयी आज जाणून घेऊया...


अतिशय वेगाने फैलावणारा आजार असून 'एच१-एन१' विषाणूने बाधित व्यक्तीच्या अगदी कमीत-कमी संपर्कामुळेही तो पसरू शकतो. जेव्हा बाधित व्यक्ती खोकते, थुंकते किंवा शिंकते, तेव्हा विषाणूंचे अतिसूक्ष्म थेंब हवेत फेकले जातात. हे थेंब लिफ्टचे बटन, डोअरनॉब्ज, फ्लशनॉब्ज असे जिथे-जिथे पडतात, त्या जागेला आपण स्पर्श केल्यास आपल्यालाही 'एच१-एन१' स्वाईन फ्लूची बाधा होऊ शकते. ताज्या बातम्यांनुसार, सध्या मुंबईमध्ये स्वाईन फ्लूने १९१ बळी घेतले आहेत व यावर्षी राज्यात तब्बल १ हजार, ७७२ जणांना या विषाणूंची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. ही आकडेवारी धोक्याची सूचना देणारी आहे. शहरामध्ये स्वाईन फ्लूच्या प्रकरणांची संख्या भीतीदायकरित्या वाढत आहे आणि ही गोष्ट लक्षात घेता, लोकांनी या संसर्गाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे व खूप उशीर होण्याआधी योग्य ते प्रतिबंधात्मक उपचार मिळविणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या प्राणघातक संसर्गाबद्दल सर्वसामान्य माणसांना पुढे दिलेल्या काही प्राथमिक गोष्टींची माहिती असायला हवी.

 

संसर्गाचा धोका कुणाला जास्त? पुढील गटांसाठी अतिरिक्त काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे:

 

- सहा वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक

- गर्भवती स्त्रिया

- अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती

- डायलिसिसवर असलेल्या व्यक्ती

- रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठीची/वाढविण्यासाठीची औषधे घेणाऱ्या व्यक्ती

- दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती

 

रोगाची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत?

 

'एच१-एन १'ची लक्षणे ही बरीचशी साध्या तापासारखीच असतात. त्यामुळे दोघांमधील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 'स्वाइन फ्लू'ची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

- तीनपेक्षा जास्त दिवस भरपूर ताप येणे.

- बरी न होणारी सर्दी व खोकला.

- खोकताना रक्त पडणे.

- श्वसनास त्रास होणे.

- मळमळणे आणि उलट्या होणे.

- नाक गळणे

- अशक्तपणा आणि थकवा.

 

फ्लूपासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

 

- भरपूर पाणी प्या.

- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

- प्रवास करताना N95 मास्क वापरा (मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध)

- प्रथिनांनी समृद्ध आहार घ्या.

 

तुम्ही फ्लूमधून बरे होत असाल तर पुढील गोष्टी करा

 

- दर दिवशी किमान दोन-तीन लिटर पाणी किंवा द्रवपदार्थ घ्या. (ज्यूस, सूप इत्यादी)

- ढोबळी मिरची, कोबीसारख्या फ्लेवर्ड भाज्या खाणे टाळा.

- तळलेले पदार्थ खाणे टाळा.

- प्रोबायोटिक पदार्थांचा आहारात समावेश करा.

- साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी प्रमाणात खा.

- घरीच बनविलेले अन्न खा.

 

उपचारांची माहिती करून घ्या

 

स्वाईन फ्लूची लक्षणे दिसत असल्यास दुकानात मिळणारी औषधे घेणे टाळा. अशावेळी तुम्ही तातडीने आपल्या जवळच्या डॉक्टरांशी किंवा संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञांशी संपर्क साधायला हवा. अशा व्यक्तीस इंजेक्शन किंवा नोझल स्प्रेद्वारे लस घ्यावी लागेल (तुम्हाला अंड्यांची अ‍ॅलर्जी असल्यास).

 

या रोगावर कशाप्रकारे उपचार केले जातात?

 

ऋतुमानामुळे येणाऱ्या तापावर सर्वसाधारणपणे दिली जाणारी काही अ‍ॅण्टिव्होयरल औषधे 'एच १-एन १' स्वाईन फ्लूवरही परिणामकारक ठरतात. फ्लूची लक्षणे दिसू लागल्यानंतर ४८ तासांच्या आत ही औषधे घेतल्यास त्यांचा चांगला गुण येतो.

- डॉ. कीर्ती सबनीस

(लेखिका मुलुंड व कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोगतज्ज्ञ व एचआयव्ही फिजिशियन आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@