कर्जबाजारी पाकिस्तानचे खायचेही वांदे

    26-Aug-2019
Total Views |



 

 
इस्लामाबाद : भारताशी व्यापारी व आर्थिक संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. आधीच कर्जबाजारी असणाऱ्या इमरान खान सरकारने आता कॉस्ट कटिंग करत सरकारी अधिकाऱ्यांना उपाशी ठेवणारी अजब नियमावली बनवली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' मधील वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने बैठकीत दिले जाणारे चहापान व बिस्कीट बंद केले. त्याबरोबरच खर्चात कपात करण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयांत एकच वृत्तपत्र किंवा मासिक आणले जाईल. हे कमी की काय म्हणून कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या कागदांच्या दोन्हीही बाजूने लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात कोणतेही लष्करी सामान किंवा नवी गाडी खरेदी केली जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. यामध्ये सरकारने बनवलेल्या नियमावलीची संपूर्णतः जबाबदारी ही त्या कार्यालयातील लेखापालाकडे असणार आहे.

 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला ६ कोटींची मदत देणार असल्याचे म्हटले आहे , परंतु यासाठी पाकिस्तानला काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सरकारला आर्थिक खर्चांमधे कपात करत आर्थिक नुकसान कमी करावे लागणार आहे. याबरोबरच आणखीही काही अटी घालण्यात आल्या आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या कर्जात २.२९ अब्ज डॉलर इतकी वाढ झाली आहे. दिवाळखोरीत जाण्यापेक्षा सरकारने नोकरभरतीही थांबविण्याचा निर्णय घेतला. फक्त विकासकामांसाठीच यापुढे नव्याने भरती केली जाणार आहे. नवीन रोजगारनिर्मितीवर मर्यादा आल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील कोंडी झाल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईला गेली आहे. आता या परिस्थितीत पाकिस्तानातल्या सरकारदरबारी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.