घोटाळेबाजांचे दिवस भरले! अजित पवारांसह बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |



मुंबई : राज्याची 'शिखर बँक' अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळेबाजांचे दिवस भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सहकारी बँकेतील कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह अनेक बड्या नेत्यांवर सोमवारी शहरातील माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यात विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह इतर काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर विरोधकांच्या गोटात सोमवारी खळबळ उडाल्याचे समजते.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी येत्या पाच दिवसांत बँकेचे तत्कालीन संचालक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, शेकाप नेते जयंत पाटील, दिलीपराव देशमुख, पांडुरंग फुंडकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह ७६ संचालकांवर गुन्हा नोंदवा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला नुकतेच दिले होते. त्यानुसार सोमवारी अजित पवारांसह बड्या नेत्यांविरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या बँक घोटाळ्यात सकृतदर्शनी या सर्वांविरोधात 'विश्वसनीय पुरावे' आहेत, असे मत न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने याआधीच नोंदविले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर शेकापचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण इत्यादी नेत्यांचा यात समावेश आहे. त्याशिवाय राज्यातील ३४ जिल्हा बँकांचे वरिष्ठ अधिकारीही या घोटाळ्यात सहभागी आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. अजित पवार राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना त्यांनी साखर कारखाने, सूतगिरण्यांना कर्ज देताना रिझर्व्ह बँक आणि बँकेशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केले, असा आरोप आहे.

@@AUTHORINFO_V1@@