चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |


नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक झालेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आज दुपारी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय अटकेच्या विरोधात चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली . त्यानंतर दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयानेही चिदंबरम यांच्या कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालायने आज हा निर्णय दिला. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीची मुदत आज संपणार होती. ३० ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना पुन्हा सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येईल. सीबीआयला चिदंबरम यांची चौकशी करायची असल्याने त्यांना रिमांड देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने यावेळी केली. चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ केली असली तरी त्यांना रोज अर्धा तास आपले कुटुंबीय व वकील यांना भेटण्यासाठी दिले जातील. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर सीबीआय न्यायालयाने चिदंबरम यांना ३० ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. येत्या ४८ तासांत चिदंबरम यांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे.



आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी ईडीने देखील आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पी.चिदंबरम यांनी विदेशात बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांनी या माध्यमातून पैशांचा फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ साली आयएनएक्स मीडियाने ३०५ कोटी रुपयांचे परदेशी भांडवल मिळवले होते. यासाठी आवश्यक असणाऱ्या एफआयपीबीच्या मंजुरीमध्ये अनियमितता आढळून आली होती. सीबीआयने केलेल्या चौकशीमध्ये चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याचा या प्रकरणात हात असल्याचे समोर आले होते. यानंतर कार्ती याला अटक करण्यात आली होती, तर १५ मे, २०१७ रोजी चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
@@AUTHORINFO_V1@@