आठवणींच्या हिंदोळ्यात मनाचे सिंहावलोकन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |



'मनाच्या खोल डोहात एकदा डोकावून तरी पाहा...' बरेचदा ऐकलेले, प्रयोग करुन पाहिलेले हे वाक्य. पण, कित्येकदा मनाची ही खोली गवसतच नाही. डोळे मिटले की फक्त काळाकुट्ट अंधारच विश्व व्यापून टाकतो. नकोशा वाटणाऱ्या आठवणी, भूतकाळच मनात रुंजी घालतो. परंतु, तरीही आयुष्यात एखादी वाट शोधायची असेल, तर आठवणीच्या हिंदोळ्यात उतरुन मनाचे सिंहावलोकन हे करावेच लागेल. तर आणि केवळ तरच आपल्या आणि इतरांच्याही आयुष्यातील काही गणितांची नक्की उकल होईल.


आपण स्वतःकडे मागे वळून पाहताना, एक माणूस म्हणून या जगाकडे पाहत असतो. त्यातून आयुष्यात जगताना भूतकाळात केलेल्या, वर्तमानात करत असलेल्या, भविष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडींचाही आपण विचार करतो. पण, मुळात जगापासून आपल्याला काय शिकायचे असते? ते खरे तर मनोवेधक आहे. आपल्याला या जगाबरोबर कसे वागायचे आहे? जेव्हा गरज भासते, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा सामना कसा करायचा? या सगळ्याच गोष्टी आपल्याला खरे तर या जगातूनच शिकायच्या असतात. या जगातूनच शिकाव्या लागतात. पण, आपल्या भूतकाळात वळून पाहण्यात काय शहाणपणा आहे? जे घडले ते पूर्वी झाले. ते आपण बदलू शकत नाहीच. म्हणजे हातातून निसटून गेलेला काळ आपल्याला पुन्हा पकडता येत नाही, हे आपल्याला कुणी शिकवण्याची गरज नाही. आपण आपल्या अनुभवातूनच हे शिकत असतो. फार कमी वेळा आपल्याला एखादी अशी संधी मिळते की, जिथे आपल्याला एखादी चुकलेली गोष्ट पुन्हा दुरुस्त करता येते. पण, बऱ्याच वेळा गतकाळातल्या चुकांबाबत आपण आयुष्यभर चुकचुकत राहतो. मनात अपराधीपणाची भावना असते की, पण आपण असे वागलो नसतो तर बरे झाले असते. खरेतर निसटून गेलेली वेळ मागे येत नाही, पण आपली विचारांची मालिका मात्र पुढे चालू राहते. म्हणून तर आपण आपल्या आयुष्याकडे थोडे मागे वळून पाहणे आवश्यक आहे.

 

कधी कधी अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात, जिथे दोन क्षण थांबलो तर पुढे आपण बरेच काही योग्य करू शकतो. सिंहावलोकन करताना आपण आपल्या आयुष्यातल्या गत अनुभवांकडे प्रगल्भतेने पाहतो, स्थिरावून पाहतो. प्रत्यक्ष ते प्रसंग घडतात तेव्हा आपल्या मनावर प्रचंड ओझं असतं, आपल्या भावनांचं, आपल्या अनेकविध विचारांचं. पण, नंतर काहीकाळाने आपण जेव्हा याच प्रसंगांकडे वळून पाहतो, तेव्हा मन थोडे हलके झालेले असते. अशा वेळी आपण आपले मन थोडेसे स्थिरावून काय चुकले होते किंवा त्याप्रसंगी आणखी काय करता आले असते, याचा विचार करू लागतो. हे जे अंतर्ज्ञान आपण विकसित करतो, ते खूप बहुमोल आहे. या अंतर्ज्ञानानेच 'वाल्याचा वाल्मिकी' झाला. आयुष्याला एक नवीन वळण मिळते ते या अंतज्ञार्नाच्या क्षमतेमुळे. काही माणसांचे तर संपूर्ण जग बदलले जाते. हे अंतर्ज्ञान काही एखादी जादूची काडी फिरवली म्हणून येणार नाही वा १२-१२ वर्षे कठोर तपस्या केली म्हणूनसुद्धा ते मिळणार नाही. ते आपल्याला आपल्या आयुष्याकडे प्रामाणिकपणे वळून पाहिल्यानंतर मिळते. या वळून पाहण्यात एक खुलेपणा असावा लागतो. विचारांना आतून बदलता येण्याची क्षमता असावी लागते. निर्ढावलेपण मनात असेल, तर आपण त्याच चुकीच्या विचारांच्या परिघात घुटमळत राहणार, पण जीवनाचे सिंहावलोकन करताना मनाची उंची मोठी असावी लागते. मन प्राजंल असायला लागते. सिंहावलोकन करताना मनाचा आढावा घेता येणे आवश्यक आहे, नाहीतर आपण त्याच त्याच पायवाटेवर फिरत राहणार.

 

नवी पायवाट जीवनात शोधायची म्हटले तर ती ओळखायची आपली तयारी असायला पाहिजे. हे सिंहावलोकन करताना ते केवळ भाववाचक असण्यापेक्षा थोडेसे शास्त्रीय असेल तर अधिक महत्त्वाचे. सिंहावलोकन करायचे म्हटले, तर आठवणींच्या कल्लोळात हरवायचे नाही, तर या आठवणींच्या लहरीतून एक एक लहर ओळखायची आणि तिचे विश्लेषण करायचे. कधी कधी या लहरी इतक्या खोल असतात की, आपल्याला त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत राहणे खूप महत्त्वाचे असते. आयुष्यात आपण आपली प्रतिमा जेव्हा जगाच्या आरशातून पाहतो, तेव्हा आपल्याला बरंच काही स्वतःबद्दल शिकता येतं. आपण दुसऱ्यांना त्यांनी किती प्रामाणिक असावे याचे ज्ञान देत असतो, तेव्हा एक क्षण आपण किती प्रामाणिक आहोत याचे अवलोकन कधी करतो का? आपण दुसऱ्यांवर त्यांनी आपला किती अपमान केला वा आपल्याला किती दुखावले याचा पाढा वाचतो, तेव्हा आपण कधी त्यांना दुखावले याचा क्षणिक विचार आपल्या मनात आला तर किती बदल होईल आपल्या आयुष्यात? खरेतर या अशा सिंहावलोकनातच जीवनाचा शांतिपथ दिसू शकतो. आपल्याला व इतरांनासुद्धा...

 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@