अब की बार 'प्लास्टिक प्रहार'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |



स्वच्छ भारत अभियानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या प्लास्टिकवर प्रहार करण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात त्यांनी भारताला प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन सर्वांना केले. केवळ 'मन की बात' या कार्यक्रमातच नव्हे, तर १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतानाही त्यांनी प्लास्टिकमुक्तीसाठी देशभरात एक व्यापक लोकचळवळ राबविण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. येत्या २ ऑक्टोबर रोजी देशभरात प्लास्टिकमुक्त अभियानास सुरुवात होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश असेल. प्लास्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ही सध्या जागतिक समस्या बनली असून यापासून सर्वांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने देशाला प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. दैनंदिन जीवनात सर्वसामान्यांसाठी आवश्यक असणाऱ्या प्लास्टिकवर बंदी आणण्याची वेळ सरकारवर का आली, हेही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्लास्टिकचा शोध 19व्या शतकात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात काही शास्त्रज्ञांनी मिळून लावला. प्लास्टिक हे नाशवंत नाही. त्याचे विघटन होत नाही आणि जवळपास १०० वर्षांहून अधिक काळ ते टिकते. स्वस्तात उपलब्ध होणारा हा टिकाऊ पर्याय जगभरातील नागरिकांच्या पसंतीस उतरला आणि अवघ्या काही काळातच या प्लास्टिकने पृथ्वीवर अतिक्रमण केले. आजच्या घडीला जगभरात ३८० दशलक्षहून अधिक मेट्रिक टन दररोज प्लास्टिकचा केर निघत असून याच्या विल्हेवाटीचे आव्हान जगासमोर आहे. एकट्या भारतात दररोज २६ हजार मेट्रिक टन प्लास्टिकचा कचरा तयार होत आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ टिकणाऱ्या या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे सहजासहजी शक्य होत नसल्यानेच याच्या कमीत कमी वापराचे आवाहन याआधी करण्यात येत होते. मात्र, परिस्थिती सध्या हाताबाहेर जात असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विद्यमान केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय 'बहजुन हिताय बहुजन सुखाय' म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे!

 

टाकाऊपासून टिकाऊ

 

दैनंदिन जीवनातील अनेक टाकाऊ वस्तूंपासून विविध टिकाऊ वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण गेल्या काही वर्षांपासून शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. दैनंदिन जीवनात होणारा प्लास्टिकचा सर्वाधिक वापर पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्यास कारणीभूत ठरत असल्याने याचा वापर कमीत कमी करावा, असे आवाहन करण्यात येते. कचऱ्यात टाकून दिलेल्या या टाकाऊ प्लास्टिकच्या विल्हेवाटीचा प्रश्न आज संपूर्ण जगासमोर कायम आहे. यासाठी विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतरही वाढत्या प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यासाठी विल्हेवाटीच्या योजना अपुऱ्या पडत असल्याने 'टाकाऊपासून टिकाऊ' या पद्धतीने प्लास्टिकच्या विल्हेवाटीवर भर देण्यात येत आहे. ब्राझीलमधील अल्फ्रेडो मोजर यांनी संशोधन करून तयार केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून प्रकाश मिळविण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सुरुवात झाली आहे. बंगळुरू येथील एका महिलेने हे तंत्रज्ञान आत्मसात करत कर्नाटकाच्या विविध जंगलांतील दुर्गम भागांत जाऊन प्लास्टिकच्या बाटल्यांपासून अनेक झोपड्या उजळविण्याचे काम केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आता देश पातळीवर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. प्लास्टिक जवळपास १०० वर्षांहून अधिक काळ टिकते. मात्र, डांबरासोबत त्याचे एकत्रित मिश्रण केल्यास ते पाण्यातही बराच काळ टिकण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान विकसित करत रस्ते अधिकाधिक मजबूत करण्याचे ध्येय ठेवणाऱ्या पद्मश्री राजगोपालन वासुदेवन यांच्या फॉर्म्युल्याचा वापर देशभरात निर्माण होणाऱ्या डांबरी रस्त्यांसाठी करण्यात येणार आहे. टाकाऊ प्लास्टिकपासून टिकाऊ वस्तू बनविण्याच्या योजनांची अंमलबजावणी करत दररोज मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या विल्हेवाटीकडे केंद्र सरकारने लक्ष दिले आहे. रस्ते बनविण्याच्या कामांत प्लास्टिकचा वापर अधिकाधिक झाल्यास त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यास मदत होणार असून पर्यावरणाचे योग्य संतुलन राखण्यास मदत होणार आहे. स्वच्छ भारत अभियानानंतर देशाला प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा एकदा अभिनंदनास पात्र ठरणार, यात शंकाचा नाही.

 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@