चुका उमगू लागल्या, हेही नसे थोडके!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019   
Total Views |



काँग्रेस पक्षातील काही नेत्यांना आपल्या पक्षाचा पराभव नेमका कशामुळे झाला आणि आपल्या पक्षाची विश्वासार्हता का टिकून राहिलेली नाही, याचा उशिरा का होईना शोध लागला आहे. कदाचित पक्षाच्या नेत्यांबद्दल, पक्षाकडून भाजपविरुद्ध ज्या प्रकारचा अपप्रचार केला जात होता, त्याबद्दल तोंड उघडण्याचे धाडस होत नसल्याने या नेत्यांनी आतापर्यंत मौन बाळगणे पसंत केले असावे. पण, आता काँग्रेसचे नेते उघडपणे बोलू लागले आहेत.


काँग्रेस पक्षाला अलीकडील काळात पराभवाचे जे प्रचंड हादरे बसले, त्यामुळे त्या पक्षाची पुरती वाताहत झाली. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतर त्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यास, त्या पक्षास नेहरू घराण्याबाहेरची कोणी योग्य व्यक्ती सापडली नाही. राहुल गांधी यांनी स्वत:, आपल्या परिवाराबाहेरच्या व्यक्तीकडे पक्षाची सूत्रे सोपविण्यात यावीत, असे स्पष्ट करूनही अखेर सोनिया गांधी यांच्याशिवाय अन्य कोणी व्यक्ती त्या पक्षास सापडली नाही. उरलासुरला काँग्रेस पक्ष टिकवून ठेवायचा असेल तर ते काम सोनिया गांधी करू शकतात, हा जबर अंधविश्वास काँग्रेसच्या हुजरेगिरी करणाऱ्या नेत्यांना वाटत असल्याने त्यांनी सोनिया गांधी यांची जी निवड केली, त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. असे असले तरी काही काँग्रेस नेत्यांकडून पक्षाला चार शेलके बोल सुनाविण्याचे जे प्रकार घडत आहेत, ते लक्षात घ्यायला हवेत. काँग्रेस पक्षाने भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांना पाण्यात पाहण्याचे, त्यांनी ज्या अनेक चांगल्या योजना आखल्या त्यांची खिल्ली उडविण्याचे प्रयत्न केवळ २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केले असे नव्हे; तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, त्यानंतर झालेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीही नरेंद्र मोदी यांना त्या पक्षाने लक्ष्य केले होते. मोदी यांच्या विरुद्ध प्रचार करताना असत्याचा आसरा घेऊन जेवढी बदनामी करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न त्या पक्षाने केला. काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहून तर काँग्रेस आणि अन्य अनेक विरोधी पक्ष हुरळून गेले होते. २०१९ मध्ये आता भाजप सत्तेवरून जाणार आणि आपलीच आघाडी सत्तेवरून येणार, अशी स्वप्ने बघून अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्याविरुद्ध आपण जो प्रचार करीत आहोत, त्याचा जनतेवर प्रभाव पडला असल्याचे काँग्रेस आणि अन्य पक्ष समजून चालले होते. पण, जनतेची नाडी विरोधकांना ओळखताच आली नाही. विरोधकांचे गोबेल्स प्रचारतंत्र जनतेने पुरते ओळखले आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. निवडणुकीत जोरदार आपटी खाल्लेले पक्ष पराभवाची कारणे शोधण्यात अजून गर्क आहेत.

 

पण, काँग्रेस पक्षातील काही नेत्यांना आपल्या पक्षाचा पराभव नेमका कशामुळे झाला आणि आपल्या पक्षाची विश्वासार्हता का टिकून राहिलेली नाही, याचा उशिरा का होईना शोध लागला आहे. कदाचित पक्षाच्या नेत्यांबद्दल, पक्षाकडून भाजपविरुद्ध ज्या प्रकारचा अपप्रचार केला जात होता, त्याबद्दल तोंड उघडण्याचे धाडस होत नसल्याने या नेत्यांनी आतापर्यंत मौन बाळगणे पसंत केले असावे. पण, आता काँग्रेसचे नेते उघडपणे बोलू लागले आहेत. काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, भूपिंदरसिंह हुडा आदींनी केंद्राने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून आपले वेगळेपण दाखवून दिले होते. त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाची पंचाईत झाली होती. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सातत्याने नकारात्मक प्रचार करून काही साधणार नाही," अशा कानपिचक्या दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ज्या अनेक चांगल्या योजना राबविल्या, त्याकडे दुर्लक्ष करून सतत नकारार्थी टीका करत राहिल्याने हाती काही लागणार नाही, असे जयराम रमेश यांचे म्हणणे होते. अशी वक्तव्ये करून पक्ष आपली विश्वासार्हता गमावत आहे, असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. जयराम रमेशच असे बोलले नाहीत, तर त्यांना अभिषेक मनू सिंघवी आणि शशी थरूर या काँग्रेसच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला. काँग्रेसच्या नेत्यांकडून नरेंद्र मोदी यांचे गुणगान करणारी भाषा वापरली गेल्याचे पाहून काँग्रेसचे अनेक नेते अस्वस्थ झाले! "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीत सतत नकारात्मक गोष्टींचा शोध घेऊन काही साधणार नाही," असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. "मोदी सरकारने जी चांगली कामे केली आहेत, त्या कामांचे कौतुकही विरोधकांनी करायला हवे," असे जयराम रमेश म्हणतात. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जयराम रमेश यांनी मोदी सरकारच्या अनेक योजनांचे कौतुक केले. त्या योजनांमुळे जनतेला चांगला लाभ झाल्याचे सांगितले. २०१४ ते २०१९ या दरम्यान वीजक्षेत्रात, उज्ज्वला योजनेत केंद्र सरकारने केलेल्या कार्यामुळे लाखो लोकांना लाभ झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. "नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फक्त वाईट बोलून काही साधणार नाही," असे ते म्हणाले.

 

जयराम रमेश यांच्यापाठोपाठ अभिषेक मनू सिंघवी आणि शशी थरूर यांनीही जयराम रमेश यांच्या मताशी सहमती दर्शविली. मोदी यांची सतत नकारात्मक प्रतिमा रंगविणे चुकीचे असल्याचे अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे. मोदी यांना एकतर्फी केल्या जाणाऱ्या विरोधामुळे त्यांना लाभच होत असल्याचे सिंघवी म्हणतात. सिंघवी यांच्या पाठोपाठ शशी थरूर यांनीही जयराम रमेश यांची री ओढली. मोदी यांच्या चांगल्या कामांचे विरोधकांनी कौतुक केले, तर त्यांची विश्वासार्हता वाढेल, असे थरूर म्हणतात. मोदी यांच्या कृतीकडे मुद्देनिहाय पाहायला हवे, व्यक्तिनिहाय नाही, असेही थरूर यांनी सुनावले. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत हे विसरता कामा नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. मात्र, काँग्रेस पक्षाला या तिघांनी जी मते व्यक्त केली आहेत, ती फारशी पसंत पडलेली दिसत नाहीत. या तिघा नेत्यांच्या मतांचे काँग्रेसने थेट खंडन वा मंडन केले नाही. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता, "या प्रकरणी संबंधित नेतेच योग्यप्रकारे सांगू शकतील," असे सांगून मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. मनीष तिवारी म्हणाले की, "काँग्रेसपुरते बोलायचे झाल्यास, देशामध्ये गंभीर आर्थिक पेचप्रसंग आहे, असे आम्हास वाटते. त्याचा रोजगारावर गंभीर परिणाम होत आहे." त्याचीच आम्हाला चिंता वाटत असल्याचे ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते के. के. तिवारी यांनी रमेश यांच्यावर टीका केली आहे. आपल्याच प्रेमात पडलेल्या काही काँग्रेस नेत्यांनी पक्षाचे 'अपहरण' केले असून पक्षाच्या हिताच्या नसलेल्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. ज्यांनी कधी निवडणुका लढविल्या नाहीत, ज्यांनी राज्यसभेचा आसरा घेतला आहे, अशांनी पक्षाचे 'अपहरण' केले आहे, असे ते म्हणाले. रमेश यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते कपील सिब्बल, आनंद शर्मा, कुमारी सेलजा आदी नेत्यांनीही टीका केली आहे. मोदी, "भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने विरोधकांची विशेषत: नेहरू, सोनिया, राहुल, प्रियांका यांची नकारार्थी प्रतिमा रंगवित आहे. कोणता भाजप नेता अशी नकारार्थी प्रतिमा रंगवू नका, हे सांगण्यासाठी उभा राहिला," असा प्रश्न काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. हे सर्व लक्षात घेता लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा जबरदस्त फटका बसलेल्या विरोधी पक्षातील काही नेत्यांना उशिरा का होईना आपल्या चुका उमगू लागल्या आहेत. पण, सर्वांनाच तशी उपरती झाली तर त्यांची गेलेली विश्वासार्हता पुन्हा परत मिळू शकेल!

@@AUTHORINFO_V1@@