वन्यजीव संरक्षणाच्या पुढाकारात भारताला मोठे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019   
Total Views |



'स्टार कासव'  'पाणमांजरां'च्या आंतराष्ट्रीय तस्करीवर 'सायटीस'ची बंदी


मुंबई ( अक्षय मांडवकर ) - ’संयुक्त राष्ट्र संघा’अंतर्गत काम करणार्‍या ’कनव्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेंजर्ड स्पिसीज ऑफ वाईल्ड फौना अ‍ॅण्ड फ्लोरा’ने (सायटिस)भारतात आढळणारे स्टार कासव आणि पाणमांजराच्या दोन प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय तस्करीवर बंदी आणली आहे. शिवाय या वन्यजीवांना ’धोकाग्रस्त’ प्रजातींच्या यादीत (परिशिष्ट 1) सामील करून घेतले आहे. जिनिव्हा येथे सुरू असलेल्या ’सायटिस’च्या 18 व्या परिषदेत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. जगभरात होणारी या प्राण्यांची तस्करी लक्षात घेता त्यांना उच्चतम संरक्षण देण्यासाठी भारताने ’सायटिस’च्या परिषदेत प्रस्ताव मांडला होता. भारताचा हा प्रस्ताव मान्य झाल्यामुळे स्टार कासव व पाणमांजरांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा मार्ग बंद झाला आहे.
 
 
 
 
नैसर्गिक संपत्तीच्या तस्करीवरील बंदीसंदर्भात बहुपक्षीय करार करणार्‍या ’सायटिस’ने स्टार आणि पाणमांजरांच्या दोन प्रजातींना जगातील सर्वात ’धोकाग्रस्त’ प्रजाती म्हणून घोषित केले आहे. ’स्मूथ कॉटेड’ व ’स्मॉल क्लॉड’ प्रजातीच्या पाणमांजरांचा यामध्ये समावेश आहे. स्टार प्रजातीचे कासव भारतात आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिसा आणि कर्नाटक राज्यात आढळते, तर किनारपट्टीलगत असणार्‍या खाड्यांमध्ये पाणमांजरांच्या तीन प्रजाती आढळून येतात. जगभरात या दोन्ही वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात छुपी तस्करी होते. जॅकेट, पाकीट बनविण्यासाठी पाणमांजराच्या कातडीला मोठी मागणी आहे. तसेच हा प्राणी जपानसारख्या देशांमध्ये पाळला जातो, तर स्टार कासव पाळल्याने आर्थिक भरभराट होते, या अंधश्रद्धेपोटी त्यांची देशात मोठ्या प्रमाणात तस्करी होते. भारतीय ’वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत पाणमांजर व स्टार कासव संरक्षित आहेत. मात्र, तस्करीच्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात या जीवांना मोठी मागणी असल्यामुळे देशातून त्यांची छुप्या मार्गाने तस्करी सुरू आहे. म्हणूनच ’केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालया’ने (एमओइएफ) त्यांच्या तस्करीवर आंतरराष्ट्रीय बंदी आणण्यासंदर्भातील प्रस्ताव ’सायटिस’ समोर मांडला होता. सोमवारी हा प्रस्ताव ’सायटिस’ने मान्य केला.
 

 
या मान्यतेअंतर्गत पाणमांजर व स्टार कासवांना संरक्षणाच्या ’परिशिष्ट २’ मधून ’परिशिष्ट १’ (सर्वात धोकाग्रस्त प्रजात) मध्ये हलविल्याची माहिती ’ट्रॅफिक’ या संस्थेचे भारताचे प्रमुख साकेत बडोला यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. ’ट्रॅफिक’ ही संस्था जगभरात घडणार्‍या वन्यजीव तस्करीच्या घटनांची नोंद करत असून जिनिव्हा येथे सुरू असलेल्या ’सायटिस’च्या परिषदेत बडोला हे भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. 'सायटीस'च्या परिषदेत भारताचा पाणमांजराच्या प्रस्तावाला १०२ देशांनी पाठिंबा दिल्याचे बडोला यांनी सांगितले. ’एमओईएफ’ने भारतातील सहा प्रजातींच्या तस्करीवर आंतरराष्ट्रीय बंदीची मोहोर उमटविण्याचा प्रस्ताव ’सायटिस’ कडे केला होता. त्यामध्ये पाणमांजर व स्टार कासवासह टोकाय गेको, वेज्डफिश आणि इंडियन रोझवूड यांचा समावेश आहे. यामधील टोकाय गेकोला देखील ’सायटिस’ने ’परिशिष्ट २’ मध्ये सामावून घेण्यात आले आहे. भारताने प्रस्तावित केलेल्या चार वन्यजीवांच्या तस्करीवर आंतरराष्ट्रीय बंदी आणल्यामुळे त्यांच्या मागणीत घट होईल. परिणामी, त्यांच्या संरक्षणाला हातभार लागेल, असे बडोला म्हणाले.
 
 
‘सायटिस’ म्हणजे काय ?
 
संयुक्त राष्ट्राच्या ’आययूसीएन’ या परिषदेने १९६३ साली ’सायटिस’ची स्थापना केली. वन्यप्राण्यांसह नैसर्गिक संपत्तीची आंतरराष्ट्रीय तस्करी त्यांच्या अस्तित्वाला धोका उद्भवू नये म्हणून खबरदारीच्या योजना निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले. १९७३ साली ८० देशांनी ’सायटिस’चे वन्यजीवांच्या तस्करीसंदर्भात नियम मान्य करून या परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले. सध्या या परिषदेत १३८ देश सदस्य आहेत.
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@