माझ्या माहेरीचा उंट...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2019
Total Views |

 
चिदम्बरम् यांच्या अटकेच्या निमित्ताने अनेक नवनवे शब्द पुरोगामी शब्दकोशात जमा झालेले आहेत. त्यानुसार कॉंग्रेस वा पुरोगाम्यांनी केलेले कुठलेही कृत्य, हे आपोआप संवैधानिक किंवा घटनात्मक असते आणि तेच कृत्य भाजपा वा संघाच्या कोणीही केलेले असेल, तर आपोआपच घटनाबाह्य असते. तसे नसते तर माजी गृहमंत्री असलेल्या माणसाने कोर्टाचा निकाल ऐकल्यानंतर तब्बल 27 तास बेपत्ता राहून इतका तमाशा केला नसता. दिवसभरापेक्षा अधिक काळ सीबीआय व तपासयंत्रणा चिदम्बरम् यांचा शोध घेत होत्या आणि त्यांचा फोनही लागत नव्हता. पण, इतक्या तासांनंतर कॉंग्रेस मुख्यालयात प्रकटलेले चिदम्बरम्, मोठ्या सोज्ज्वळपणे पत्रकारांना म्हणाले, आपला कायद्यावर संपूर्ण विश्वास आहे.
 
 
आपण कायद्यासमोर नतमस्तक आहोत. म्हणजे कायदा यंत्रणेने संपर्क साधल्यावर फरारी होण्याला चिदम्बरम् कायदा पाळणे समजतात. त्यात तथ्य असेल, तर परदेशी पळून गेलेले विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी महान साधू-संत व कायदेभिरू लोक असायला हवेत ना? कारण त्यांनी चिदम्बरम् यांच्यापेक्षाही मोठा पराक्रम केलेला आहे. कायदा यंत्रणेकडून त्यांना सवाल विचारला जाण्यापूर्वीच त्यांनी देशाच्या सीमा ओलांडून पलायन केलेले होते. दाऊद तर कॉंग्रेससाठी जगातला सर्वात मोठा संतच असला पाहिजे. कारण तो कुठे आहे त्याचा थांगपत्ताही लागू देत नाही. हा कॉंग्रेसी व चिदम्बरम् यांच्या कायदेभिरूतेचा निकष झालेला आहे. कायद्याला वाकुल्या दाखवणे किंवा पळवाटा शोधून न्यायालयाशीही लपंडाव खेळण्याला ही मंडळी घटनात्मक वा कायदेशीरपणा समजतात. एकूणच पुरोगामित्वाचे निकष सामान्य बुद्धीच्या पलीकडले कसे आहेत, त्याचीच आजकाल सतत प्रचीती येत असते. या प्रकरणातही तोच अनुभव येत आहे. कॉंग्रेसचे सामान्य प्रवक्ते वा कायदेपंडितांची वक्तव्ये आपल्या ज्ञानामध्ये सतत भरच घालत असतात. ताज्या प्रकरणात हे कायदेपंडित काय म्हणतात बघा.
 
ज्या आयएनएक्स गुंतवणूक प्रकरणात र्गेंलती झालेल्या आहेत, त्यात चिदम्बरम् यांच्या सुपुत्राचे उद्योग समोर आले आहेतच. पण, ज्या कंपनीला अशा रीतीने बेकायदा परदेशी गुंतवणूक भारतामध्ये आणू दिली, त्यात अर्थमंत्र्याचा दोष काय? संबंधित निर्णयामागे सहा अन्य अधिकारी गुंतलेले आहेत. ज्या प्राधिकरणाकडून परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली जाते, त्यातल्या सहा अधिकार्यांवर तपास यंत्रणांनी कुठली कारवाई केली नाही किंवा त्यांच्यावर खटलाही भरलेला नाही. मग थेट अर्थमंत्र्याला गुन्हेगार कशाला मानावे? किती सुटसुटीत युक्तिवाद आहे ना? खालच्या कनिष्ठ वा वरिष्ठ अधिकार्यांचाही निर्णयात सहभाग असल्याने त्यांनाही यात गुंतवले पाहिजे. हाच नियम वा निकष आहे काय? असेल तर तोच सर्वांना लागू झाला पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा वा पदाचा अधिकारी असो. म्हणजे उद्या कुठल्या राज्यात अखलाख नावाच्या मुस्लिमाची जमावाकडून हत्या झाली, तर त्याला तिथला कुणीतरी पोलिस अधिकारी वा राजकीय नेता जबाबदार धरला पाहिजे. त्याच्यावर खटला भरला पाहिजे. कुठे राजस्थान वा उत्तरप्रदेशात जमावाने कुणाची हत्या केली, तरी जबाबदार स्थानिक कुणी धरला पाहिजे ना? त्यात पंतप्रधानाचा संबंध कुठे येतो? पण, उत्तरप्रदेशात अखलाख नावाच्या मुस्लिमाची जमावाने हत्या केल्यावर हेच एकाहून एक बुद्धिमान कायदेपंडित कुणाला जाब विचारत होते? थेट देशाचा पंतप्रधान किंवा भारत सरकारला गुन्हेगार ठरवून किती तमाशा चाललेला होता? तिथे समाजवादी पक्षाचे राज्य होते. पोलिस व्यवस्था त्याच पक्षाच्या हातात होती आणि भाजपाचाही काडीमात्र संबंध नव्हता.
 
पण, दोषारोप कुणावर चालले होते? जाब मोदींनाच विचारला जात होता ना? तिथे मोदींना जाब विचारणारे आज अर्थखात्यातील गुन्ह्यासाठी अर्थमंत्र्याला आरोपी बनवण्याला मात्र गैरलागू ठरवीत आहेत. हा काय प्रकार आहे? फरक कुठे आहे? मोदी भाजपाचे, तर चिदम्बरम् कॉंग्रेसचे नेते आहेत.
 
 
हा पक्षपात सर्वत्र राजरोस चालू असतो आणि त्यासाठी आपल्यापाशी कुशाग्र पुरोगामी बुद्धी असायला हवी. अन्यथा असले युक्तिवाद शक्य नसतात. तिथे बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला केला वा अन्यत्र कुठे सर्जिकल स्ट्राईक केला, तरी शरद पवारांना त्याचे पुरावे हवे असतात. अन्यथा सरकार खोटे असल्याचा शेरा मारायला पवार सभा घेत फिरू लागतात. काश्मिरात अधिकचे सैन्य तैनात करून मोदी सरकारने 370 कलमाची कटकट संपवली. तिथे काही काळ जमावबंदी लागू केलेली होती. तेव्हा तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेची चिंता शरद पवारांना चिंतित करीत होती. अशा बाबतीत सरकारने खरे सांगावे, असा आग्रह पवारांनी धरलेला होता. हे पवार कोण? मुंबईत 1993 सालात भीषण बॉम्बस्फोट मालिका घडली, तेव्हाचे राज्याचे मुख्यमंत्रीच ना? त्या भीषण घटनाक्रमाने शेकड्यांनी लोकांचा बळी घेतला आणि काही शेकडा लोक कायमचे जायबंदी होऊन गेले. त्या घटनेला काही तास लोटलेले नसताना, शरद पवारांनी किती मोठे सत्य जनतेला तत्काळ सांगण्याचे पुण्यकर्म केले होते? कोणते सत्य त्यांनी मुंबईकर जनतेला सांगिलेले होते?
 
 
मुंबईत तेव्हा फ़क्त अकरा बॉम्बस्फोट झालेले होते आणि सगळेच्या सगळे प्रामुख्याने बिगरमुस्लिम वा हिंदू वस्तीतच घडलेले होते. त्यामागे मुस्लिम घातपाती असावेत, हे सत्य लपवण्यासाठी दूरदर्शनवरून धडधडीत खोटे बोलण्याचा पराक्रम कुणी केलेला होता? शरद पवार यांनीच ते पाप केलेले होते ना? तेव्हा त्यांना कुणी जाब विचारला नाही आणि पुढे एका वाहिनीला मुलाखत देताना पवारांनीच, आपण कशी जनतेची दिशाभूल केली, त्याचे कौतुक कथन केलेले होते. मात्र, आपण जनहितासाठी खोटे बोललो, असा त्यांचा दावा होता. दोन समाजघटकांत वितुष्ट वाढीला हातभार लागू नये, म्हणून मुस्लिम वस्तीतही र्सेंेट झाल्याची लोणकढी थाप पवारांनी मारली होती. पण, ते पुरोगामी असल्याने त्यांचे ते पुण्यकर्म आणि काश्मीर विषयात तीच सवलत मोदी वा भाजपाला मात्र नसते.
कपिल सिब्बलपासून कुठल्याही पुरोगामी बुद्धिमंतापर्यंत आपल्याला याचीच पुनरावृत्ती होताना दिसेल. ते धडधडीत खोटारडेपणा करायला आता सरावलेले आहेत. कुठल्याही विषयावर आणि कुठल्याही वेळी, भाजपाशी संबंधित खोटेपणा करण्याला आजकाल पुरोगामी पुण्यकर्म ठरवले जात असते. साहजिकच तपासाशी असहकार्य करण्याला चिदम्बरम् कायद्याचा सन्मान करणे म्हणतात आणि पुरोगामी शहाणे नंदीबैलासारखी मान हलवून त्याला दाद देत असतात. काश्मीरपासून अर्थकारणापर्यंत कशावरही पांडित्य सांगत फिरणारे हे चिदम्बरम् महाशय, सीबीआयने विचारलेल्या साध्या सरळ प्रश्नांची उत्तरे मात्र देऊ शकत नाहीत. आपल्या सुपुत्राच्या परदेशी बँक खात्यात करोडो रुपये कुठलेही व्यापार-उत्पादन केल्याशिवाय कुठून जमा झाले, त्याचे उत्तर या अर्थशास्त्र्यापाशी नसते.
 
 
पण, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चिंतेने त्याची कायम झोप उडालेली असते. त्यांचीच कशाला, सगळ्या पुरोगामी म्हणवणार्या कलावंत, साहित्यिक वा बुद्धिमंतांची आजकाल तशीच अवस्था झालेली आहे. त्यांच्यातला कुणी एक खून करून मोकळा झाला वा दरोडेखोर म्हणून पकडला गेला, तर विनाविलंब त्याच्या न्याय्य हक्कासाठी हे लोक आकाशपाताळ एक करायला कंबर कसून मैदानात येतात. पण, खरोखरच कुणा सामान्य नागरिकाची हत्या वा लूटमार झाली, तर त्यांची कुंभकर्णी झोप उघडत नाही. अखलाखच्या हत्येने ते विचलित होतात, पण बंगालमध्ये सततच्या हत्याकांडाने भाजपाच्या समर्थकांचे मुडदे पडताना, त्यांना बघताही येत नाही. सामान्य लोकांचे सामुदायिक हत्याकांड घडवणार्या नक्षलींच्या हिंसेत त्यांना मानवतेचा साक्षात्कार होतो. एकूण शब्दकोशच बदलून गेलेला आहे. त्यांच्याशी बोलणेही निरर्थक होऊन गेले आहे. त्यांचे आपले शब्दच भिन्न झालेत. कधीतरी पूर्वी एक गमतीशीर उपरोधिक उखाणा ऐकलेला आठवतो-
 
‘माझ्या माहेरीचा उंट साजिरागोजिरा,
यांच्याकडला ससा बाई, ओबडधोबड!’
@@AUTHORINFO_V1@@