खुळ्याच्या मागे येड्यांची जत्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2019
Total Views |
 
 
आपल्या याच भास-आभासांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी राहुल गांधी व टोळक्याने काश्मीरदर्शनाचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांच्याबरोबर यावेळी गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीताराम येचुरी, डी. राजा, शरद यादव, मनोज झा, माजिद मेमन, दिनेश त्रिवेदी आदी नेतेही होते. मात्र, खुळ्याच्या मागे सुरू झालेली ही वेड्यांची जत्रा श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आली आणि सर्वांची आल्यापावली परत पाठवणीही केली गेली. 
 
 
 
राहुल गांधी यांची ओळख स्वपक्षाची पुरती वासलात लावणारा इसम ही तर आहेच, पण सोबतच बालिश, पप्पूछाप अशीही आहे. विशेष म्हणजे आपल्या अज्ञानाला किंवा अल्पज्ञानालाच महाज्ञान समजून त्यानुसार कृती करण्यालाच ते शहाणपणा समजतात. अर्थात, स्वतःला देशाचे मालक मानणाऱ्यात घराण्याचे कुलदीपक असल्याने त्यांच्या या कृत्यांत गर्विष्ठपणाची झाकही पुरेपूर असतेच असते. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरचा दौरा करण्यासाठी विरोधकांचे लटांबर घेऊन जाण्याची राहुल गांधींना झालेली बुद्धीही त्याच पठडीतील. केंद्र सरकार व भारतीय लष्कराने काश्मिरी जनतेच्या न्याय्य अधिकारांवर अतिक्रमण केल्याचा, त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा, त्यांच्यावर अन्याय-अत्याचार केल्याचा धोशा राहुल गांधींनी गेल्या काही काळापासून लावल्याचे आपण पाहिले. अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, प्रियांका गांधी-वाड्रा वगैरे काँग्रेसी मंडळीही राहुल गांधींच्या या रुदालीगायनात एकमुखाने सामील झाली. भारत सरकार आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी दाखवलेले जम्मू-काश्मीरचे चित्र आपल्या मनासारखे नाही, म्हणून त्यांनी तेही नाकारले आणि विश्वास ठेवला कोणावर तर पाकिस्तानवर, भारतविरोधी आंतरराष्ट्रीय माध्यमांवर! अशा सांगोवांगीच्या, कपोलकल्पित आणि निवडक कहाण्यांवर विसंबून या लोकांनी काश्मीरमध्ये भयानक, क्रूर आणि निर्घृणतेने कळस गाठल्याचे व आपण गेल्याशिवाय तिथल्या जनतेची त्यातून सुटका होऊच शकत नाही, हेही मनाशी पक्के केले. पुढे आपल्या याच भास-आभासांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी राहुल गांधी व टोळक्याने काश्मीरदर्शनाचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांच्याबरोबर यावेळी गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीताराम येचुरी, डी. राजा, शरद यादव, मनोज झा, माजिद मेमन, दिनेश त्रिवेदी आदी नेतेही होते. मात्र, खुळ्याच्या मागे सुरू झालेली ही वेड्यांची जत्रा श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आली आणि सर्वांची आल्यापावली परत पाठवणीही केली गेली.
 
 
आपल्या काश्मीर पर्यटनामागे राहुल गांधींनी तिथल्या जनतेचा कळवळा दाटून आल्याचे दाखवले. खोऱ्यातील सर्वसामान्यांना भोगाव्या लागणाऱ्या कथित यातना-वेदनांनी त्यांचे मन व्यथित, द्रवित झाले. मात्र, हा केवळ त्यांनी आपल्या दौऱ्याला दिलेला मुलामा होता, त्यात सत्यता काडीमात्रही नव्हती. राहुल गांधी तिथे गेले ते आगलावेपणा करायलाच, कलम ३७० चे गाडलेले मढे उकरायलाच आणि फुटीरतावादी तथा पाकिस्तानला पोषक विधाने करायलाच. मोदी सरकारने उचललेल्या या अतिशय महत्त्वाच्या पावलानंतरची राहुल गांधी व कंपूची विधाने, ट्विप्पण्या तपासून पाहिल्या तरी त्यातूनच हे स्पष्ट होते. कलम ३७० च्या जीवावर काँग्रेसने गेली कित्येक वर्षे स्वतःचे आणि त्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांचेच भले केले. परंतु, विद्यमान सरकारच्या एकाच फटक्याने काँग्रेससह सर्वांचेच वेडेवाकडे धंदे बंद झाले, विघातक कारवायांना लगाम बसला, त्यांची असलीयत समोर आली. परिणामी चवताळलेली ही मंडळी फडफडू लागली व त्यांनी सरकारविरोधात पवित्रा घेतला. कसेही करून केंद्र सरकारचा निर्णय हाणून पाडायचा, तो फसल्याचे दाखवायचे, मोदी विरोधासाठी विरोध करायचा, हे त्यांनी ठरवले. देशभरात त्यांचे हे उद्योग सुरूच होते, ते जसेच्या तसे त्यांना जम्मू-काश्मिरातही करायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी खोऱ्याचा रस्ता धरला. मात्र, आज काश्मिरी जनतेच्या प्रेमाची उबळ आलेल्यांनी काश्मिरी हिंदूंना, पंडितांना धर्मांधांनी पिटाळून लावले तेव्हा तोंडातून चकार शब्दही काढला नव्हता. पंडितांच्या मुली-बहिणींवर ठरवून बलात्कार केले गेले, तेव्हा काँग्रेस नेते आणि स्वतःला शोषितांचे तारणहार समजणारे कम्युनिस्ट, मार्क्सवादी लोक पीडितांचे अश्रू पुसायलाही कधी धावले नव्हते. उलट लाखो काश्मिरी पंडितांच्या वाट्याला स्वतःच्याच मायभूमीत निर्वासितांचे जिणे आले, त्यावेळी काँग्रेसी आणि लाल बावटेवाले धर्मनिरपेक्षतेच्या, पुरोगामित्वाच्या वगैरे बिळात लपून बसले होते. म्हणूनच हेच लोक जर आज सर्वसामान्यांच्या चिंतेने व्याकुळ झाल्याचे म्हणत असतील तर त्याला नौटंकीच म्हटले पाहिजे. तीही अशी नौटंकी की, ज्याने देशाच्या एकता व अखंडतेला सुरुंग लागला जावा. पण, त्यांची ही नौटंकी काही फळास आली नाही, कारण देशाचे आणि जम्मू-काश्मीरचेही सारथ्य सक्षम हातात आहे म्हणून.
 
 
दुसऱ्या बाजूला कलम ३७० निष्प्रभ करण्यावरून काँग्रेसमध्येच जुंपल्याचे चित्रही पाहायला मिळाले. त्या पक्षाच्या मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे, जनार्दन द्विवेदी, दिपेंदर हुड्डा, अनिल शास्त्री वगैरे नेत्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे जाहीर समर्थन केले. जम्मू-काश्मीरसंदर्भाने काँग्रेसमध्ये दोन गट तयार झालेले दिसत असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवरूनही त्या पक्षात दुफळी निर्माण झाल्याचे दिसते. नुकतेच ज्येष्ठ काँग्रेसनेते जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्याचा पक्षाला फायदा नसल्याचे व नुकसान झाल्याचे म्हटले. रमेश यांच्या या विधानाला शशी थरुर आणि अभिषेक मनू सिंघवी या काँग्रेसनेत्यांनीही पाठिंबा दिला. मोदींना विरोध केल्यास त्यांचीच लोकप्रियता वाढते, त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली पाहिजे, असे या नेत्यांनी म्हटले. वस्तुतः जयराम रमेश अगदी २०१४ च्या आधीपासूनच नरेंद्र मोदींबद्दल वक्तव्ये करत आले व त्यातून त्यांनी काँग्रेसला इशारे देण्याचे कामही केले. स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेससमोरचे मोदी हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे याच रमेश यांनी सहा वर्षांपूर्वी म्हटलेले. तद्नंतर कालबाह्य मुद्दे व कृती करून टिकता येणार नाही आणि काँग्रेससमोर टिकून राहण्याचे घोर संकट असल्याची कबुलीही त्यांनी दिली होती. ही अर्थातच नरेंद्र मोदींनी नव्या भारताला घातलेली साद आणि त्याला मिळणारा भारतीयांचा प्रतिसाद, त्यांची कार्यशैली, प्रचारपद्धती याला दिलेली दाद तसेच काँग्रेसला सावध करण्याची भूमिका होती. पण म्हणतात ना, विरोधासाठी विरोधाचे व्रत घेतले की, मग उत्कृष्टतेकडेही दुर्लक्षच केले जाते. तसेच काँग्रेसचेही झाले. मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात उत्तमोत्तम योजना राबवूनही काँग्रेसने ते नेहमीच नाकारले. पुरोगामी बुद्धीमंत, विचारवंत, अभ्यासकांनीही मोदीकर्तृत्वाला खोटे ठरवण्याचा उद्योग केला. उल्लेखनीय म्हणजे शेखर गुप्ता नामक संपादक-पत्रकारानेच ही गोष्ट मान्य केली. पण कोंबडा आरवला नाही म्हणून सूर्य उगवायचा थोडीच राहतो, तो उगवतोच. जनतेला मोदींचे काम दिसत होते व त्यावर विश्वास ठेऊनच मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्याच हाती सत्ता सोपवली. आताही रमेश आणि थरुर, सिंघवी यांनी मोदींच्या कामांचे कौतुक केले पाहिजे असे म्हटले, कारण त्यांनाही जनतेच्या डोळ्यातला मोदीमहिमा दिसत आहे. परंतु, त्यातून काँग्रेस हायकमांड काही शिकणार नाहीच, उलट या नेत्यांवरच शिस्तभंगाची कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही. कारण त्यांनी गांधी-नेहरू घराण्याची खुशमस्करी सोडून खऱ्याखुऱ्या कामसू व्यक्तीची प्रशंसा केलीय ना!
 
 
 
काँग्रेसच्या नेतेमंडळींची ही कथा तर त्या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची तर्हान काही औरच! माजी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेसनेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया-आर्थिक अफरातफरीप्रकरणी नुकतीच सीबीआयने नाट्यमय पद्धतीने अटक केली. तेव्हापासून काँग्रेसला लोकशाही, स्वातंत्र्य, हक्क-अधिकार वगैरे मुद्दे तीव्रतेने आठवू लागले. सोनिया गांधींनी याच पार्श्वभूमीवर विधान केले की, “राजीव गांधींनाही पूर्ण बहुमत होते. परंतु, त्यांनी त्याचा वापर भीती पसरविण्यासाठी केला नाही.” मुळात इथे चिदंबरम यांची कोठडीतील रवानगी त्यांच्याच कर्मामुळे झाली आणि तीदेखील न्यायालयीन आदेशानंतरच. त्यात विद्यमान केंद्र सरकारचा वा विरोधकांच्याच शब्दांतल्या ‘पाशवी’ बळाचा हस्तक्षेप नाहीच. तरीही सोनिया गांधी कुठल्या तोंडाने राजीव गांधींच्या बहुमताचा दाखला देऊन मोदी सरकारवर आरोपबाजी करतात? की २००४ ते २०१४ दरम्यान देशाची सत्ता बुजगावण्याकडे सोपवून प्रत्यक्षात स्वतःच सरकारचा सारा कारभार हाकल्याचे त्यांना स्मरते? म्हणूनच जे स्वतः केले, ते आताचे सरकारही करत असल्याचा आरोप त्या करतात? आणि राजीव गांधींचाच विचार करायचा तर धर्मांधांच्या विरोधापुढे त्यांच्या बहुमताने गुडघे टेकले व एका असहाय्य महिलेला वाऱ्यावर सोडून दिले अन् अशा बहुमताचे सोनिया गांधींना कोण कौतुक? सोबतच आज पी. चिदंबरम कारागृहात आहेत, उद्या त्यांनी तोंड उघडले तर आपल्यावरही तशीच गत नाही ना येणार, अशी चिंताही सोनियांना सतावत असेल. म्हणूनच चिदंबरम यांची अटक म्हणजे बदला, सूड, व्यवस्थेचा, संवैधानिक संस्थांचा गैरवापर असा कल्ला केलेला बरा, असे त्यांनी ठरवले असावे. जेणेकरून तपास यंत्रणा आणि कायद्याचे हात आपल्यापर्यंत पोहोचले तरी पुन्हा कांगावा, सहानुभूतीची लाट निर्माण करता येईल. परंतु, आता जनतेलाही सगळ्यांच्या मुखवट्यामागचे खरे चेहरे चांगलेच लक्षात आले आहेत. ही जनता आता भुलणार नाही. उलट देशाला परमवैभवाला नेणाऱ्यांना बहुमत देऊन रसातळाला नेऊ पाहणाऱ्यांच्या हाती भोपळाच देत राहिल.
@@AUTHORINFO_V1@@