अर्थ अरुणास्त!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2019
Total Views |
 
 
अवतार म्णून कुणीच जन्माला येत नाही. मात्र या जन्माचे सार्थक करणारे जीणे कुणी जगत असेल आणि आपल्या कर्तृत्वाची रेखा बुलंद करत असेल तर मग अशांच्या मरणापाशी जग थांबतं, त्यांच्या जगण्याचे सगळेच संदर्भ इतरांना मार्गदर्शक ठरतात. त्यांचा जन्म मग महात्म्याचा अवतार म्हणून पूजला जात असतो... पात्र विशाल झाले की मग त्याच्या उगमाचा शोध घेतला जातो आणि ते पवित्र स्थळ होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गेल्या पाच वर्षांतील नव भारताच्या अर्थनीतीची मांडणी करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या बाबत असेच म्हणता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभामंडळातील कर्तृत्ववान सरदारांचे हे असे अचानक निघून जाणे चटका लावून जाणारेच आहे. अगदी गेल्याच पंधरवड्यात सुषमा स्वराज गेल्या. गोपीनाथ मुंडे, मनोहर पर्रीकर, अनंतकुमार आणि आता अरुण जेटली... मोदींचे हे सगळेच कर्तृत्ववान सहकारी असे बहराच्या काळात बुलंद कामगिरी करत असताना अचानक बाजूला झाले...
 
 
 
हा परिवर्तनाचा काळ आहे. सकल परिवर्तन साधायचे आहे. एखादे लक्ष्य साधायचे असेल तर त्यासाठी साधक लागतात. त्यांची साधना अथक आणि परिपूर्ण अशीच असावी लागते. संघ संस्कारांत असेच साधकच निर्माण केले जातात. त्यांच्या कर्तृत्वाचा पैस ओळखून त्यांच्या कर्माचा मार्ग नक्की केला जातो. जेटलींचा मार्ग हा राजकारणातून राष्ट्रनिर्मितीचा पथ सुकर करणे हाच होता. जागतिक महासत्ता म्हणून विकसित होणार्या कुठल्याही राष्ट्राची पायाभरणी ही त्याच्या अर्थकारणावरच असते. सार्वजनिक जीवनात भौतिकाचा जो लौकिक भाग असतो तो अर्थकारणावरच समृद्ध होत असतो. स्वातंत्र्यानंतर आखलेल्या त्याच मार्गावर आजवर या देशाच्या सर्वच विधा सुरू होत्या. शिक्षणापासूृन आरोग्यापर्यंत आणि मग अर्थनीती, अर्थकारणही त्याच त्या मळलेल्या वाटेने सुरू होते. या सार्यांचीच संपूर्ण पुन:मांडणी करणे अत्यंत आवश्यक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्पनेतला नवभारत हा या ‘रीफोर्र्मेशन’वरच अवलंबून आहे. त्यासाठी अथक, कठोर, निग्रही आणि बुद्धिशूर असेच प्रयत्न करणे गरजचे होते. 2014 मध्ये जनतेने हा परिवर्तनाचा दंड भारतीय जनता पार्टीच्या हाती दिला. या नवमांडणीचे नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांचे हे सारेच बिनीचे शिलेदार. परिवर्तनाची ही घुसळण मोठी आहे. त्याचा ताण सार्यांवरच येतो आहे. अहोरात्र काम करावे लागत आहे आणि ते करावे लागत आहे, या अगतिकतेने केले जात नाही तर निष्ठापूर्ण कर्तव्यभावनेने पूजा म्हणून केले जात आहे. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्याचा ताण सर्वांवरच येतो आहे. कर्करोग हे महत्त्वाचे वरवर दिसणारे कारण, मात्र मनोकायिक ताण हे मूळ कारण. त्या अर्थाने हे बलिदानही ठरते. शरीर झिजते आहे, लय पावते आहे, क्षीण होते आहे हे दिसत असतानाही ही माणसं काम करत राहिली. पर्रिकर असोत, सुषमा स्वराज असोत की मग आता जेटली असोत. सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी जेटलींना उपचारासाठी अमेरिकेत जावे लागले आणि मग त्यांचे अर्थखाते पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आले, मात्र तरीही गंभीर आजारावर उपचार घेतानाही जेटली अर्थ खात्याच्या संदर्भातील काही घडामोडींवर भाष्य करत होते, मार्गदर्शन करत होते. ट्वीटरवर ते सजग होते.
 
 
 
मोदी सरकारचा पहिला कार्यकाळ हा आर्थिक परिवर्तनाचा होता. अद्यापही ते अर्थहोत्र सुरूच आहे. ब्रिटिशांच्या काळापासून सुरू असलेली अर्थनीती आणि विकासाची त्यांची भौतिक संकल्पनाच राबविली जात होती. काही सहज करता येणार्या गोष्टीदेखील केल्या गेल्या नव्हत्या. काही परंपरा काळाच्या ओघात काळवंडतात, क्षीण होतात, निरुपयोगी ठरतात, त्या केवळ परंपरा म्हणून राबवित राहणे हे नुकसानकारक असते. जेटलींच्या नेतृत्वात अर्थकारणातील बदल निक्षून करण्यात आले. अगदी रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प कालबाह्य ठरला आहे, ती पद्धत बदलली पाहिजे आणि हा बदल तसा खूप सायासाने करावा असा नव्हता. तो करण्यात आला. भारतीय आर्थिक वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर असले पाहिजे, ही बाबदेखील थोड्या प्रयत्नाने करता येणारी होती. मुख्य विषय होता तो भ्रष्टाचार आणि काळा पैसा हाच. त्यावर जालिम उपाय करणे अत्यंत आवश्यक होते. करप्रणालीत बदल करणे आणि काळ्या पैशांचा ओघ थांबविण्यासाठी सक्त कारवाई करणे आवश्यक होते. राजकीय हितसंबंध राखण्यासाठी या बाबी होत नव्हत्या. आपल्या कुठल्याही राजकीय नुकसानीची पर्वा न करता मोदींनी काही निर्णय घेतले. त्यात पहिला निर्णय हा नोटाबंदीचा होता. त्याला प्रचंड विरोध झाला. टीकाही झाली.
 
 
 
अद्यापही होते आहे. हा बदल इतका सोपा नव्हता. त्यासाठी सर्वच यंत्रणा अत्यंत वेगाने आणि अथकपणे कामाला लावणे अत्यंत आवश्यक होते. जेटलींनी ते केले. सरकारी योजना आणि अनुदानांचा लाभ थेट ग्राहकाच्या खात्यात जावा आणि ते व्यवहार अधिकृतच असावेत यासाठी बँक खात्यांचा विस्तार होणे आवश्यक होते. गाठण्यात आलेले लक्ष्य सोपे खचितच नव्हते. आता जनधन खात्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. बुडीत कर्जांमुळे खचत चाललेल्या बँकांना सावरणेही आवश्यक होते. 2011 च्या मंदीचा तितका फटका भारताला बसला नव्हता. मात्र त्याचे प्रतिकूल परिणाम काही प्रमाणात जाणवत होते. त्यावरही उपाय करणे गरजेचे होते. ते या सरकारने केले. त्यानंतर एकत्रित करप्रणाली जारी करण्यात आली. सार्या देशांत एकत्रित करप्रणाली लागू करण्याचा क्षणही कलम 370 हटविण्याइतकाच धाडसी होता. या सार्याच आर्थिक साहसांचे नेतृत्व अर्थमंत्री म्हणून जेटलींनी केले.
 
 
 
एक विकसनशील देश म्हणून जगाच्या अर्थकारणात भारताचे महत्त्वाचे स्थान त्यामुळेच प्राप्त होऊ शकले. आज भारताच्या अर्थव्यवस्थेकडे जग पाहात आहे. गेल्या पाच वर्षांत घेण्यात आलेले निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी करणारे जेटली हे जगाच्या दृष्टीने त्यासाठी महत्त्वाचे ठरतात. ते केवळ मग भाजपाचे नेते म्हणून उरत नाहीत. त्यांच्या जाण्याने देशाचे, जगाचे नुकसान झाले, असे जे आता म्हणण्यात येत आहे ते केवळ संवेदना व्यक्त करण्यासाठी अजिबातच नाही. एक लढवय्या नेता म्हणून तरुण वयापासूनच त्यांची ओळख होती, तरीही ते आक्रमक आणि आक्रस्ताळे अजिबात नव्हते. त्यांच्या चेहर्यावर कायम शांत स्मितच झळकत असायचे. एका नामवंत विधिज्ञाचे नेतेपण कसे असावे याचा वस्तुपाठच त्यांची कारकीर्द राहिली आहे. अगदी अटलजींच्या मंत्रिमंडळातील सहकारी ते मोदींचे खंदे सरदार म्हणून त्यांची कारकीर्द ही दमदारच होती. 1973-74 या काळात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून साकार झालेले हे नेतृत्व होते. 22 महिन्यांच्या आणिबाणीच्या काळात ते 19 महिने दिल्लीच्या तिहार जेलमध्ये होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीतून हा तरुण नेता तयार झाला होता. 1980 मध्ये ते भाजपामध्ये कार्यरत झाल्यापासून ज्याच्याकडून आशा ठेवावी, असा हा नेता होता. 2017 साली तरुण भारतने अर्थविषयक विशेष दिवाळी अंक प्रकाशित केला. मोदी सरकारच्या अर्थविषयक कारकीर्दीचा आढावा घेणारा हा अंक जेटलींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला होता... त्यावेळी मराठीतील दिवाळी अंकांची परंपरा भाषक अंगाने मोठीच आहे, असे सांगत त्यांनी अर्थविषयक दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या ‘तभा’च्या निर्णयाचे कौतुक केले होते. त्यांच्या जाण्याने ‘तरुण भारत’ परिवारातील एका ज्येष्ठाच्या वियोगाच्या वेदना आम्हाला होत आहेत. त्यांना विनम्र आदरांजली!
@@AUTHORINFO_V1@@