अरुण जेटली अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्लीः माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली रविवारी अनंतात विलीन झाले. नवी दिल्ली येथील निगम बोध घाट स्मशानभूमीवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
शनिवारी दुपारी जेटली यांचे आजारपणाने निधन झाले. गेल्या आठवड्याभरापासून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. कर्तव्यकठोर राजकारणी, अमोघ वक्ते, प्रखर राष्ट्रभक्त, निष्णात कायदेतज्ञ आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून देशाला परिचित असलेल्या जेटली यांच्या निधनामुळे देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला.
 
अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जेटली यांचे पार्थिव पं. दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भारतीय जनता पक्षाच्या भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी हजारो कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. केंद्रीय मंत्री आणि भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला.जेटलींचे सुपुत्र रोहन यांनी जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. दुपारी दीड वाजल्यापासून जेटली यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. तीनच्या सुमारास निगमबोध घाट येथील स्मशानभूमीत जेटली यांच्या पार्थिवावर वैदिक मंत्रोच्चारात अंतिम संस्कार विधी सुरू झाले. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह भाजपमधील अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@