रत्नागिरीत बिबट्याचा एकाच रात्रीत सात दुचाकीस्वारांवर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019   
Total Views |

 

चार महिन्यात १२ जणांवर हल्ला ; वन विभागाकडून गस्त पथकांचे नियोजन


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारघाटी ते गणेशगुळे दरम्यानच्या महामार्गावर शुक्रवारी रात्री बिबट्याने सात दुचाकीस्वारांवर हल्ला केला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दीड ते दोन वर्ष वयाचा नर बिबट्या या परिसरात वावरत असून तो केवळ दुचाकीस्वारांवर हल्ला करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या हल्ल्यांमध्ये आजतागायत १२ ग्रामस्थ जखमी झाले आहेत. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर वन विभागाने या परिसरात गस्त पथकांचे नियोजन केले आहे.

 

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून गणेशगुळे ते कुंभारघाटी दरम्यानच्या रस्त्यावर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. मे ते जुलै महिन्याच्या दरम्यान याठिकाणी पाच ते सहा जणांवर बिबट्याने हल्ला चढविला होता. त्यानंतर गेल्या सव्वा महिन्यांपासून हे हल्ले थांबले होते. मात्र, शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा बिबट्याने सात दुचाकीस्वारांवर हल्ला केला. विशेष म्हणजे हा बिबट्या रस्त्यावरून चालत जाणाऱ्या लोकांवर हल्ला करत नसून केवळ दुचाकीस्वारांवर हल्ला करत असल्याची माहिती वन्यजीवप्रेमी प्रदीप डिंगणकर यांंनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. हा बिबट्या साधारण दीड ते दोन वर्षांचा असून प्रत्यक्षदर्शींनी याठिकाणी दोन बिबट्यांना पाहिल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री बिबट्याने गणेशगुळ्याचे सरपंच संदीप शिंदे आणि विश्वास सुर्वे यांच्यावर हल्ला केला. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गणेशगुळेला दुचाकीवरुन येताना बिबट्याने मागून धावत येत पाठीवर झडप घातल्याचे शिंदे यांनी सांगितले. बिबट्याने नखांनी ओरबाडल्यामुळे ते जखमी झाले.

 

 
 

या हल्ल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी ग्रामस्थ निखिल साळवी व बळीराम जोशीलकर यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. पुन्हा थोड्या वेळाने मेरवी गावचे रहिवासी निलेश म्हाद्ये यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले. याच मार्गावर पुन्हा काही मिनिटांनी कशेळी येथील ग्रामस्थ नीलेश नाटेकर, मंजुनाथ यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाला. या सर्व जखमींवर पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. हे हल्ले साधारण दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरामध्येच झाले असून या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या गवतामध्ये बिबट्या लपून बसत असल्याचे डिंगणकर यांनी सांगितले. त्यामुळे वाढलेले गवत कापून रस्त्यावर विजेचे दिवे लावल्यास बिबट्या त्याठिकाणी वावरणार नाही, अशी माहिती 'माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा'चे पशुवैद्यक अधिकारी डाॅ. अजय देशमुख यांनी दिली. गणेशगुळे येथे हल्ले करणारा बिबट्या हा दीड ते दोन वर्षाचा असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येते. या वयात बिबट्याचे पिल्लू थोडे अल्लड असते. नव्या गोष्टी शिकत असल्यामुळे केवळ कुतूहलापोटी ते हल्ला करत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात सातत्याने गस्त घातल्यास माणसांचा वावर बिबट्याच्या लक्षात येईल आणि त्याचे हल्ले थांबतील असे त्यांनी अधोरेखित केले.

 


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही गस्त पथकाचे सहा गट तयार केले आहेत. शिवाय कॅमेरा ट्रॅपच्या आधारे बिबट्याचा वावर नेमका कोणत्या क्षेत्रात आहे, याची निश्चित करण्यात येत आहे. दोन पिंजरे देखील लावण्यात आले आहेत. हल्ला झालेले ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले असून त्यांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येईल. - प्रियंका लगड, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@