जेटली राष्ट्राकरिता अनमोल रत्न होते : राज्यपाल विद्यासागर राव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |


 

मुंबई : माजी केंद्रीय अर्थ, माहिती व प्रसारण व वाणिज्यमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अरुण जेटली देशातील एक द्रष्टे मुत्सद्दी, कायदेतज्ज्ञ प्रतिभासंपन्न संसदपटू तसेच उत्कृष्ट केंद्रीय मंत्री होते. अमोघ वक्तृत्वकला लाभलेले जेटली राष्ट्राकरिता अनमोल रत्न होते. केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट, वाणिज्य, उद्योग यांसह इतर अनेक मंत्रालयांचा कारभार सांभाळताना जेटली यांनी आपल्या कामकाजाचे मापदंड निर्माण केले. त्यांनी जनसामान्यांच्या हितासाठी पथदर्शी निर्णय घेताना उद्योग व व्यवसाय यांच्या वाढीसाठीदेखील पूरक निर्णय घेतले. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा आपल्याला बहुमान मिळाला. सोबत काम करणार्‍या सर्वांना ते मार्गदर्शन करीत. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

 

 
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अभ्यासपूर्ण युक्तिवादाने भल्याभल्यांना गारद करण्याची शक्ती अरुण जेटली यांच्याकडे होती. उत्कृष्ट वकिल म्हणून ख्याती मिळविणाऱ्या अटलजी यांनी विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रिपदापर्यंतच्या  प्रवासात त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. देश उभारणीसाठी योगदान देणाऱ्या जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे.

 

 
 
 
अरुण जेटली यांच्या निधनाने एक विद्वान, कर्तबगार आणि राष्ट्रीय विचारांसाठी समर्पित नेता गमावला आहे, अशी प्रतप्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्पण केली. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, अरुण जेटली विद्वान कायदेतज्ज्ञ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये अर्थ आणि संरक्षण खात्यांची जबाबदारी सांभाळताना अरुण जेटली यांच्या कर्तबगारी दिसली. देशात जीएसटी लागू करण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांच्या अर्थमंत्रिपदाच्या कार्यकाळात झाली. जनता पार्टीच्या प्रचारासाठी स्थापन झालेल्या लोकतांत्रिक युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय संयोजक होते. त्यांच्या निधनाने भाजपने महत्त्वाचे विचारधन गमावले आहे.

 

 
 
 
भाजपच्या खासदार आणि भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन यांनीही जेटलींना ट्विटवर श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी त्या म्हणतात, अनेकांचे मार्गदर्शक असणाऱ्या जेटलींचे निधन हा राष्ट्रासाठी, पक्षासाठी आणि माझ्यासाठी एक मोठा तोटा आहे.

 

 
 
 
शिक्षणमंत्री अॅॅड आशिष शेलार यांनीही अरुण जेटलींना श्रद्धांजली अर्पण केली. 'माझे मार्गदर्शक, वडीलधारी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या अरुण जेटली यांच्या निधनामुळे आपल्यातील प्रत्येकाचे वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांचे स्मित हास्य आणि त्यांचे ऐहिक विनोद कायमच आठवणीत राहतील.

 

 
 
 
 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. मनमिळावू, मुत्सदी, प्रचंड विद्वान असे नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरवला आहे. पेशाने वकील असलेले अरूण जेटली हे अतिशय विनम्रअभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे विरोधकही त्यांच्या प्रेमात पडत असत असे. देशात वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्यानिमित्ताने वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्यासमवेत बैठकांमध्ये सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळी त्यांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व जे सर्वांना भारून टाकणारे होते ते पाहायला मिळाले. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीमुळे जीएसटीचे सर्व निर्णय पक्षीय भेद न राहता केवळ एकमताने, एक दिलाने मंजूर झाले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळेच देशात या करप्रणालीची अंमलबजावणी यशस्वी ठरली.
 
 
 
 
 
 
 
मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही जेटलींच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, जेटलींच्या निधनाने देशाने एक विद्वान, एक प्रगल्भ कायदेशीर आणि ज्वलंत नेता गमावला. नवीन भारताच्या जडणघडणीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहयोगी होते, अशा नेत्याचे जाणे हे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. त्याचा मृत्यू मला वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे, कारण, ते माझे मार्गदर्शक होते. भारताच्या प्रगतीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मनापासून शोक आणि जेटली यांना श्रद्धांजली.
 
 
 
 
 
 
 
 
'माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. जेटली राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व होते तसेच ते निष्णात विधिज्ञ होते. संसदेतील त्यांची भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण असायची. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील अभ्यासू व उत्कृष्ट संसदपटू हरपला आहे, अशी भावना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. 
 
 
तसेच अरुण जेटली यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, यशस्वी वकील असलेल्या अरुण जेटली यांनी सक्रिय राजकारणातही चांगले योगदान दिले. खासदार, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते, माहिती व प्रसारण राज्यमंत्री, अर्थमंत्री आदी महत्त्वाच्या जबाबदा-या त्यांनी भूषवल्या. सखोल अभ्यास, विषयाची मुद्देसूद मांडणी करण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते. स्वपक्षातील नेत्यांसोबतच विरोधी पक्षांतील नेत्यांशी त्यांचा उत्तम संवाद होता.अरुण जेटली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून जेटली कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे ही म्हणाले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@