राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी भाग-३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |

 
 

दि. ६ डिसेंबर, १८८१चा केसरीम्हणतो, “कोल्हापूरच्या संबंधाने जे कागदपत्र आमच्या पाहण्यात आले, त्यावरून रा. रा. माधवराव बर्वे यांच्या राक्षसी अंतःकरणाविषयी आमची बालंबाल खात्री झाली आहे. आजरोजी त्यांची काळी कृत्ये उजेडात आणता येत नाहीत, यास आमचा नाईलाज आहे. पण ती इतकी घोर आहेत की, ती ऐकून सहृदय पुरुषांच्या अंत:करणास घरे पडतील व आकाशपाताळ एक होऊन जाईल.” ‘केसरीकारांनी उल्लेख केलेली कागदपत्रे केसरीमराठ्यात छापल्यामुळे त्यांना शिक्षा झाली आणि कोल्हापूर प्रकरणाला विशेष महत्व आले. या प्रकरणात टिळक-आगरकरांना पहिली ठेच बसली खरी, पण संपादकांच्या स्वतःच्या मनाला तळमळ असेल, तरच काही चळवळ होईल हेही सिद्ध झाले.

 

एक शाळा, दोन साप्ताहिके आणि छापखाना अशा तीनही आघाड्यांवर सुरू झालेल्या कार्याचे एकच ध्येय होते ते म्हणजे लोकजागरण!अलीकडच्या काळात वाढलेला तोंडपुजेपणा, जो देशाच्या प्रगतीला अपायकारक आहे तो झटकून केसरीया नावाप्रमाणे सत्याचे प्रकटीकरण करणारे लेखन या पत्रातून होईल, अशी ग्वाही सुरुवातीलाच संपादकांनी दिली होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलचे टिळक-आगरकरांचे संपादकीय लेखन इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत वेगळे आणि सरस ठरते. ब्रिटिश राज्यकारभाराच्या निरीक्षणाबरोबरच आपल्या देशी संस्थानाबद्दलही बरेच लक्ष या दोघांनी दिले. बडोद्यात टी. माधवरावांच्या (बडोद्याचे दिवाण)कारभाराविरुद्ध त्यांच्या लेखणीने हल्ला चढवल्यानंतर आता कोल्हापूर प्रकरणाकडे त्यांचे लक्ष होते. कोल्हापूरचे दत्तक राजपुत्र शिवाजी महाराज यांची मानसिक स्थिती ठीक नाही असे कळून त्यांच्या वागण्यात १८७७ पासून वेडेपणाची चिन्ह दिसू लागली आहेत, अशा बातम्या पसरत होत्या. त्यांना वेड लागण्याच्या मागे काहीतरी कारणं आहेत, याची दाट शक्यता लोकांच्या मनात होती. महाराणीला हाताशी धरून दिवाण माधवराव बर्वेयांनी कोल्हापूरच्या गादीवरून शिवाजीराजांची हकालपट्टी केली आणि त्यांना अटकेत डांबून ठेवले आहे, महाराजांचा प्रचंड छळ केला जात आहे, अशी सगळीकडे चर्चा सुरू होती. दत्तक राजपुत्राला दुसर्याा एखाद्या नवीन पालकाच्या हावी सोपवावे, अशीही मागणी सुरू होती. सगळ्यांनाच महाराजांबद्दल सहानुभूती वाटत असल्यामुळे कोल्हापूरचे प्रकरण हा महत्त्वाचा विषय झाला होता.

 

केसरीआणि मराठ्याने सुरुवातीपासून या प्रकरणात लक्ष घालून टीका केली होती. कोल्हापूर प्रकरणावरील टिळक-आगरकरांचे संपादकीय लेख प्रचंड जहाल असत. केसरीमराठ्याच्या तरुण संपादकांना ही संस्थाने म्हणजे गतकाळातील ऐश्वर्याची साक्ष देणारी स्मारके आहेत, असेच वाटत असावे. कोल्हापूरच्या राजाला त्याच्या नोकराकडून चाबकाचा मार खावा लागतो, ही गोष्ट प्रत्येकालाच संताप आणणारी होती. दि. ११ ऑक्टोबर, १८८१चा केसरीलिहितो, “कोल्हापूर छत्रपती महाराजांची सध्याची अशी स्थिती आहे की पाषाणहृदयाच्यादेखील काळजाला घरे पडतील. महाराजांचे प्राण जाऊन शव हाती आल्यावर लॉर्ड साहेब जागृत होणार काय? कोणत्याही कारणाने छत्रपतींच्या जीवास अपाय झाला तर त्याचा कलंक बादशाही राणीच्या आणि तिच्या प्रतिनिधींच्या कपाळी आल्याखेरीज राहणार नाही.माधवराव बर्वे यांचा कारभार आणि त्यांची महाराजांच्या बद्दल असलेली कारस्थाने यासंबंधात काही पत्रे सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध झाली होती. महाराजांना वेडे ठरवण्याची घाई झालेली युरोपियन वृत्तपत्रे महाराज वेडे आहेत आणि बर्वे निर्दोष आहेतअसेच सांगत. पुण्यातील ज्ञानप्रकाशआणि इतरही काही वृत्तपत्रांनी ही पत्रे छापली. केसरीनेही काही पत्रे अस्सलम्हणून छापली होती. मराठामधून सातत्याने टीका केली जात होतीच आणि दि. ८ जानेवारी, १८८१ रोजी मराठ्यात ही पत्रे छापून आली. तत्पूर्वी मराठ्याने या प्रकरणावर केलेल्या टीकेचा एक अंश डी. व्ही. ताम्हणकरांच्या टिळक चरित्रात आढळतो, 'Maratha' on November २७th the young maharaja is spoken of an Indian Hamlet and Barve the Prime Minister, as a persecuting Claudius while the Maharaja's guards - Green and cox by name - were alleged to be conspiring to prove him mad.'' या प्रकरणाचा सगळीकडे गवगवा झाला आणि माधवराव बर्वे यांना आपली बाजू मांडण्याची गरज वाटू लागली. दि. २४ जानेवारी, १८८२ रोजी मुंबई येथील चीफ प्रेसिडन्सी मॅजिस्ट्रेट समोर कोल्हापूरचे दिवाण बर्वे यांची फिर्याद दाखल झाली. नाना भिडे, केशव बखले, वामन रानडे यांच्यावर तसेच ज्ञानप्रकाश,’ ‘केसरी,’ ‘मराठावृत्तपत्रात पत्रे प्रसिद्ध झाली म्हणून त्या त्या वृत्तपत्राच्या संपादकांवरही अब्रूनुकसानीचा खटला भरला गेला. भिडे बखले आणि रानडे यांचा कोल्हापूरच्या कारभाराशी प्रत्यक्ष संबंध होता. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यावरून टिळक-आगरकरांनी केसरीमराठ्यात बर्वे यांची पत्रे छापली. पण, भिडे, बखले आणि रानडे यांना न्यायालयात दोषी ठरवण्यात आल्यामुळे ज्या पुराव्याच्या आधारावर टिळक-आगरकरांनी ही पत्रे छापली तो पुरावा निरुपयोगी ठरला आणि केसरीमराठ्यातील लेख आणि पत्रे गैरसमजुतीने लिहिली आहेत, हेही स्पष्ट झाले. त्यामुळे जी विधाने सिद्ध करता येत नाहीत ती केल्याबद्दल टिळक-आगरकरांनी माफी मागावी असा सल्ला त्यांना वकिलांच्यामार्फत देण्यात आला आणि टिळक-आगरकरांनी माफी मागितलीसुद्धा! माफीपत्रात ते म्हणतात, “ज्या वेळी आम्ही वर्तमानपत्रात विधाने केली, त्या वेळी ती साधार आहेत, असेच प्रामाणिकपणे आम्हास वाटत होते व म्हणूनच ती आम्ही केली व ज्यांनी आम्हास माहिती पुरवली त्यावर आमचा अविश्वास नव्हता, विश्वासच होता. पण, ती माहिती व ती पत्रे आता भिडे यांच्या खटल्यात खोटी ठरल्यामुळे आमची विधानेही निराधार ठरतात. आम्ही अशा माहितीवर इतका विश्वास टाकला, याबद्दल आम्हाला अत्यंत वाईट वाटते.

 

खरेतर ही माफी टिळक-आगरकरांचा प्रामाणिकपणा आणि सत्य काय ते मांडण्याची तळमळ तसेच काही चुकले, तर माफी मागून ती चूक दुरुस्त करण्याकडे असलेला कल दाखवते. पुढच्या काळातील टिळकांचा निग्रही स्वभाव आणि सुरुवातीच्या काळातील त्यांची ही माफी याची तुलना जे करतात, त्यापैकी अनेकांना टिळकांनी कमीपणा का घेतला, असे वाटत असेल तर या मंडळींच्या नीती-अनीतीच्या, कल्पना किती पोकळ आहेत याची कल्पना येते. माफी मागितली तरीसुद्धा बेसावधपणातून का होईना, या संपादकांकडून गुन्हा घडला होता. दि. १७ जुलै रोजी या दोघांना चार महिन्यांची शिक्षा सुनावली गेली. पुढे त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे शिक्षा कमी करून १०१ दिवसांची झाली. या खटल्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवसया पुस्तकात आगरकरांनी केलेल्या नोंदी फार महत्त्वाच्या ठरतात. आगरकर म्हणतात, “आमच्या समजुतीप्रमाणे देशाच्या बर्या साठी आम्ही आरंभलेले उद्योग, करवीरस्थ प्रभूंचे चांगले व्हावे म्हणून आम्ही लिहिलेले लेख, खटला उभा राहिल्यावर आम्हास व आमच्या मित्रमंडळींस पडलेली दीर्घ यातायात लोकांची आमच्यावर बसलेली प्रीती आणि त्यांच्याशी आमचे वर्तन, आमच्या देशाची स्थिती आणि जगातील न्यायपद्धती वगैरे अनेक विषय झपाट्याने आमच्या डोक्यातून जात आहेत, तो आमच्या गाड्या तुरुंगाच्या दारापाशी येऊन ठेपल्या.” गेल्या चार-पाच वर्षांपासून टिळक-आगरकर लोकहिताच्या योजना आखत होते आणि त्यासाठी झटत होते. तुरुंगातील या दिवसांमध्ये गेल्या काही वर्षांत त्यांना आपण आखलेल्या योजनांचे तटस्थपणे पुनरावलोकन करता आले, या दृष्टीने टिळक-आगरकरांचे डोंगरीच्या तुरुंगातील दिवस फार महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या मनात काय विचार होते, याचे यथार्थ वर्णन करणार्याग आगरकरांच्या या ओळी पाहा, “कित्येकदा तर आम्ही रात्रीच्या रात्री बोलत घालवल्याचे मला आठवते. शाळा आणि छापखाना काढला, त्या वेळी कोणकोणत्या लोकांनी मागे घेतले, आपले मूळ हेतू कोणते व ते कितपत सिद्धीस गेले आहेत. शास्त्री बोवांच्या अकाली मृत्यूने आपल्या उद्योगास केवढा धक्का बसला? आम्ही आरंभलेली कामे आमच्या हयातीत व आमच्या पाठीमागे अप्रतिहत चालली तर आमच्या देशस्थितीवर त्याचा काय परिणाम होईल, या देशावर इंग्रजांचे कोणकोणत्या बाबतीत हित आणि अनहित होत आहे, लोकशिक्षण उत्तरोत्तर जारीने पसरत गेले तर हिंदुस्थानची भावी स्थिती काय होईल, नेटिव्ह संस्थानांची सुधारणा होण्यास काय उपाय करावे, देशभाषा युनिव्हर्सिटीत आणण्याला कोणती युक्ती काढावी, शाळा आणि कॉलेज बांधण्यास पैसे कसे गोळा करावेत, कोल्हापूर प्रकरणात आपली चूक किती आणि आपल्याला भोगावे लागत असलेली शिक्षा कितपत न्याय्य आहे? आपण या तर्हेचने येथे अडकून राहिल्याने लोकांच्या मनावर काय परिणाम होईल व आपल्या शाळेचे आणि छापखान्याचे किती नुकसान होईल, आणीबाणीच्या प्रसंगी आपणास कोण कोण मित्र उपयोगी पडले व पुढे कोणा-कोणाच्या मदतीवर व शब्दावर अवलंबून राहता येईल? आताप्रमाणे फिरून तुरुंगात न येण्यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी ठेवली पाहिजे? फिरून तुरुंगात यावे लागले तर ज्या गोष्टी केल्याच पाहिजेत अशा गोष्टी कोणत्या? वगैरे नाही नाही त्या विषयांवर आमचा एकेक वेळ एवढ्या जोराने वाद चाले की, आसपासचे शिपाई हळू बोला-हळू बोलाअसा इशारा करीत व बोलता बोलता रात्र निघून जाई.

 

आगरकरांनी ठिकठिकाणी आम्हीहा शब्द वापरला आहे तो टिळक आणि आगरकरया दोघांच्या संदर्भात आहे, याची नोंद घ्यायला हवी. देशहिताचे कार्य हाती घेतल्यावर टिळक-आगरकर लोकजागरणाचा विचार किती निरनिराळ्या पद्धतीने करत होते याचा पुरेपूर अंदाज या ओळी वाचताना येतो. टिळक-आगरकर यांचे समांतर विचार, मतैक्य यांचे प्रकटीकरण फार कमी वेळा झाले आहे. टिळक-आगरकर संबंध म्हणजे अनेक दिग्गजांकडून सांगितले जाणारे महाराष्ट्रातील टोकाच्या वैचारिक विरोधाचे लोकप्रिय उदाहरण आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या पार्श्वभूमीवर आगरकरांनी लिहिलेल्या आठवणी म्हणजे ध्येयप्राप्तीच्या दिशेने समांतर जाणारी टिळक-आगरकरांची एकत्रित मतप्रणाली दाखवतात, जी आपल्याकडे फार क्वचित सांगितली जाते. टिळक-आगरकरांच्या मैत्रीपर्वाचा हा सर्वोत्तम काळ असावा. टिळक-आगरकर हा मराठीतील समाहार द्वंद्व समास आहे. समाहार द्वंद्व, म्हणजे अर्थदृष्ट्या दोन्ही समान. सुरुवातीच्या काळातील विचारऐक्य दाखवणारा हा टिळक-आगरकर काळ समाहार द्वंद्वाच्या रूपातच लोकांच्या समोर आला होता, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

 

(क्रमशः)

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@