एसटी महामंडळात महिला बस चालकांना प्रोत्साहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |

'महिला एसटी बस चालक प्रशिक्षणार्थींचा आत्मविश्वास, धाडस सर्वांसाठी प्रेरक' -प्रतिभाताई पाटील 

पुणे: कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतात. महिलांना एसटी चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे पाऊल टाकले असून त्यांचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज केले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्यावतीने महिला चालक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

 
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, अनेक खडतर आव्हानांचा सामना करत एसटी महामंडळाचे काम यशस्वीपणे सुरू आहे. महामंडळाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध योजना समाजासाठी उपयुक्त आहेत. महिलांना एसटी चालकांचे प्रशिक्षण देऊन महामंडळाने त्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे. हे पाऊल अत्यंत धाडसी असून ते यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महामंडळाचा हा उपक्रम देशासमोर नवा आदर्श निर्माण करेल.

 

 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते. यावेळी बोलताना रावते म्हणाले, एसटी महामंडळात सकारात्मकता निर्माण करण्याचे काम केले. महिला टॅक्सीचालक आणि महिलांसाठी अबोली रिक्षा हे प्रयोग केले, महिला सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम परिवहन विभागाच्या माध्यमातून केले. १६३ महिला चालक प्रशिक्षणाचा हा प्रयोग राज्यातील महिला-मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. रोजगार निर्माण करणे हेच परिवहन खात्याचे धोरण आहे, त्यातूनच रिक्षा चालक परवाने देण्याचे काम केले. सध्या महामंडळात 36 हजार बस चालक असून पुढील काही वर्षात किमान १० हजार महिला बस चालक असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 
प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते १५ महिला एसटी चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे संचालक कॅप्टन राजेंद्र सनेल-पाटील, महामंडळाचे सरव्यवस्थापक माधव काळे उपस्थित होते.

 

 
महिला चालकांसाठी नियम शिथील...

एसटी महामंडळात चालक पदासाठी अवजड वाहन चालक परवाना व त्यानंतर तीन वर्षांचा अनुभव या अटी शिथील करून एक वर्ष हलके वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या महिलांना संधी देण्यात येते. तसेच महिलांसाठी किमान उंचीची अट १६० सेंमी वरुन १५३ सेंमीपर्यंत शिथील करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील २१ जिल्ह्यात राबविण्यात आली असून राज्यातील ९३२ महिला उमेदवारांनी या पदाकरिता अर्ज केला होता. त्यापैकी ७४३ महिला उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या व १५१ अंतिम प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@