पंचगंगेतीरी संघशक्ती, जीवनशक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019   
Total Views |



कोल्हापूरला पूर आला. पुराने सारे होत्याचे नव्हते केले, तरीसुद्धा कोल्हापूरवासीय आशादायी होते. माणुसकीवर आणि माणुसकीच्या चिरंतन शाश्वत मूल्यांवर विश्वास ठेवून होते. कारण, इथे रा.स्व.संघ शक्तीच्या रूपात सज्जनशक्ती कोल्हापूरवासीयांच्या सोबत होती. सगळ्या महाराष्ट्रातून संघ स्वयंसेवक इथे पोहोचले होते. कसलीही अपेक्षा नाही, कसलाही लोभ नाही. मदतीबाबत कुणी साधे आभार व्यक्त करायला आले, तरी त्या आभाराचेही धनी होणे टाळणारे हे संघ स्वयंसेवक, राष्ट्र सेविका समितीची ती मातृशक्ती. या सर्वांना समाजासाठी पडेल ते दिव्य करण्याची आंतरिक शक्ती देणारे कोण होते? सगळ्यांशी बोलल्यावर सगळ्यांचे उत्तर होते, आम्ही काय विशेष केले? आपल्या समाजासाठी, आपल्या बांधवांसाठी आपण नाही करणार, तर कोण करणार? त्यात काय विशेष!!!


कोल्हापूरचे हुंदगी गाव पुराच्या पाण्याखाली गेलेले. या गावाची खासियत अशी की, या गावातून जास्तीत जास्त तरुण लष्कराच्या सेवेत रूजू झालेले, तितकेच सेवानिवृत्त झालेले. गावात प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून अन्नधान्य, कपडे वगैरेची मदत पोहोचलेली गावाच्या पारावर गावचे मान्यवर बसलेले. पूर ओसरल्यानंतरचे उग्र वातावरण आणि वास सगळीकडेच. काही अंतरावर गावच्या बाजाराचा कट्टा. तिथे काही युवक हातात फावडे, घमेले, ब्लिचिंग पावडर घेऊन उतरले. निसरड्या चिखलात गेले आणि कट्टा साफ करू लागले. त्यातील काही तरुण गावातल्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये गेले. त्यांनी तिथे सफाईचे काम सुरू केले. न थकता तन्मयतेने अतिशय दुर्गंधीयुक्त चिखल, घाण साफ करणाऱ्या त्या तरुणांना पाहून आया-बाया म्हणाल्या, "कोण गं बया..." तरुण म्हणाले, "अरे संघाची माणसं दिसत्यात." यावर ज्येष्ठ म्हणाले, "व्हय की. लोकांसाठी अशा गू-घाणीत उतरून लोकांना मदत करायला त्येच यीऊ शकतात." बघता बघता पारावरची लोकही बाजार कट्टा, गल्ल्या साफ करण्यासाठी संघ स्वयंसेवकांच्यासोबत आली. हे स्वयंसेवक, महाराष्ट्रभरातून आलेले. कुणी मुंबई, कुणी नाशिक, तर कुणी पुण्याहून. हे सगळे स्वयंसेवक अशा पद्धतीने काम करत होते की, जणू त्यांच्यापुढे एकच प्रश्न आहे, तो म्हणजे त्या गल्ल्यांमधील चिखल आणि घाण साफ करणे. बघता बघता गाव त्यात सहभागी झाले. गाव लख्ख झाले. चिखलाने, घाणीने आणि घामानेही भिजलेले ते स्वयंसेवक मग एकत्र गोळा झाले. त्यांच्याशी बोलण्यासाठी गेले, तर त्यांचे म्हणणे "गाववाल्यांनी काम केले. आम्ही काय सांगणार?" या साऱ्या स्वयंसेवकांनी प्रवीण नावाच्या गावातल्या युवकाला पुढे केले. प्रवीण म्हणाला, "घरातल्या सगळ्या वस्तू पुरामध्ये खराब झाल्या. राव, रंक एकाच तागडीत आले. आम्हाला प्रशासनाकडून स्वयंसेवी संस्थांकडून अन्नधान्य, कपडे आणि काहीबाही मिळाले. पण, घरात घुसलेल्या पुराच्या पाण्याने चिखल, घाण आणली होती. सगळ्यांच्या घरची परिस्थिती तीच. ती कशी साफ करावी? संघाची लोक आली आणि आज घाण साफ झाली. ही खरी मदत आहे. सगळा गाव त्यांचा ऋणी आहे." इतक्यात गावातल्या आयाबायांची लगबग सुरू झाली. काय असेल म्हणून पाहिले, तर त्यांनी या संघ स्वयंसेवकांना राखी बांधायला सुरुवात केली. भावासारखे धावून आलात बघा. असाच सूर सगळ्या जणींचा होता.

 

हेच दृश्य चांदूर गावचेही. पुणे आणि मुंबईच्या तरुणांचा गट इथे सफाईसाठी आलेला. सगळे संघ स्वयंसेवकच. त्यांच्यासोबत भांडूपच्या 'भारत माता सेवा प्रतिष्ठान'चे कार्यकर्तेही होते. त्यात एक भगिनीही होती. 'भारत माता सेवा प्रतिष्ठान'चे अभय जगताप म्हणा किंवा अजय जगताप म्हणा यांची समाजनिष्ठा नेहमीच अनुभवलेली. रा. स्व. संघाने हाक दिली आणि समाजबांधवांना आत्यंतिक त्रास झाला म्हणून पण या संघटनेचे तरुण इथे सेवाकार्यास आले होते. गावाचे जग आता आधुनिक असले, तरी गावाकुसाबाहेरचे जग आजही गावापासून थोडे अंतर राखूनच आहे. या वस्तीमध्ये हा गट काम करायला सरसावलेला. घराघरात पाच फूट ते आठ फूट साचून राहिलेल्या चिखलाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी पूर्वतयारी आणि पूर्वविचार केलेला असावा. कारण, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ते चिखल उपसत होते. काहीजण फावड्याने चिखल काढत होते, तर काहीजण तो चिखल घमेल्यात भरून बाजूला टाकत होते. त्या चिखलामध्ये घरातील भांडीकुंडी अडकलेली. मोठ्या हौसेने घेतलेले फर्निचर बरबाद झालेले. चिखलातील वस्तूंची मोडतोड होऊ नये म्हणून ते संघ स्वयंसेवक अत्यंत हळुवार कुशलतेने चिखल काढत होते. भांडीकुंडी अलगद त्या चिखलातून बाहेर येत होते. पण त्याचवेळी साप, खेकडे आणि कित्येक प्रकारचे जीवजंतूही त्यातून बाहेर येत होते. दुरून पाहतानाही मनाचा थरकाप होण्याचे ते दृश्य. हे सगळेच स्वयंसेवक काही ग्रामीण भागातील नव्हते तरीसुद्धा फावड्यागणीक चिखलासोबत येणाऱ्या साप, किड्यांना सहजतेने बाजूला काढण्याचे कसब त्यांच्यात कुठून आले होते? एक घर साफ करताना चिखलाचा डोंगर रचला गेला. डोळ्यात पाणी आणून त्या चिखलाच्या डोंगराजवळ एक स्त्री उभी होती. तिला स्वयंसेवक म्हणाले, "ताई, त्यात साप-किडे असतील जाऊ नका." तर तिचे उत्तर "माझी भांडीकुंडी हायती बाबा. जीव लावलेला त्यांना." आतापर्यंत करारी चेहऱ्याने आणि निर्भयपणे चिखल काढणाऱ्या स्वयंसेवकांचा चेहऱ्यावर दया, माया, करुणा वगैरे वगैरे सारे भाव क्षणार्धात दाटले. त्यातला एक जण म्हणाला, "थांबा. आम्ही घर सफाई झाली की, अलगद त्यातून भांडीकुंडी काढून देऊ आणि स्वच्छ करू." त्या महिलेला विश्वासच वाटला नाही. ती एकटक त्यांच्याकडे पाहत राहिली. पण स्वयंसेवक जे बोलला ते सगळ्यांनी मिळून शेवटी केले. चिखलात गाडला गेलेला तिचा संसार तिला परत दिसला. एक घर, दोन घर सगळीकडे हेच काम. गावातल्या आयाबायांच्या चेहऱ्यावर हसू होते. देवानेच यांना आपल्यासाठी पाठवले असे त्या म्हणू लागल्या. अर्थात, देवाच्या लेकरांसाठी काम करणाऱ्यांना देवच पाठवतो, हे खरेच आहे. इथे संघ स्वयंसेवक देवाची माणसं बनून आली होती. त्यांच्या कामातील निरलसता गावकऱ्यांच्या मनाला न भिडली तर नवल. त्यामुळे गावातील लोक या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाली. मुस्लीम तरुणही यामध्ये मदतीला सरसावली. आपल्या गावाची, आपल्या वस्तीची सफाई करायला रा. स्व. संघाचे लोक आले. याचे कोणते अप्रुप तेथील अम्मीजान, खालाजान, चाचा-चाचींना झालेले. त्यातील काहीजण म्हणाले, "आम्ही आज प्रत्यक्ष पाहिला की संघ काय आहे?" अर्थात, त्या वस्तीतल्या लोकांना तसे वाटावे म्हणून संघ स्वयंसेवक तिथे गेले नव्हतेच, तर कोल्हापूरचा बांधव आपला देशबांधव संकटात आहे, त्याला साथ द्यावी म्हणून ते तिथे गेले होते. त्याचवेळी कोल्हापूरात राजू शेट्टी, डाव्या चळवळीचे गटही उपस्थित होते. तेही त्यावेळी गावात फिरत होते. चकाचक कपडे घालून बैठका घेण्याचा त्यांनी सपाटा चालावला होता. थोडेफार अन्नधान्य वाटून ते लोकांना सांगत होते, "बघा सरकार फेल झाले. द्या अजून मत त्यांना. आता पुढच्या निवडणुकांमध्ये तरी लक्षात ठेवा." मात्र, नावापुरता तेही फोटो काढण्यापुरता मदत देणाऱ्या आणि सरकारविरोधी गरळ ओकणाऱ्यांना अशा तथाकथित गटांना आणि नेत्यांना स्थानिकांनी भाव दिलाच नाही.

 

 
 

शिरोली, माळवाडी तर पूरस्थितीने हतबल झालेले. पूर ओसरला होता, पण गावात आजार पसरलेले. आयाबाया, त्यांची पोरंटोरं हैराण. इथे रा.स्व.संघाच्या मदतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले. तिथे महिलांशी बोलताना त्या सांगू लागल्या, "बिस्कीट, खाणपिणं खूप मिळालं. कपडेपण मिळाले. पण घाणीला साफ केले ते आरएसएसवाल्या भावांनी. आता पण औषध घेऊन ते आलेत. इथं खालपर्यंत, नदीच्या काठी कुणी आलं नाही. तिथे रस्त्यावरच सगळे मदत वाटतात. पण इथपर्यंत आम्हाला शोधत हेच लोक आले. आम्हाला तपासून, दवागोळ्या दिल्या. यांनाच आम्ही आठवलो. बाकी सगळे तिकडं गावाच्या पुढारपणाला उभे राहून फोटोबिटो काढतात." आयाबायांचा गलका वाढत होता. त्यांना शांत करणे जिकिरीचे काम. पण अत्यंत चिकाटीने महिलांना रांगेत बसवणे, नोंदणी करणे, रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून आलेल्या डॉक्टरांनी तपासून गोळ्या-औषधं दिल्यावर ते त्या महिलांना देणे, त्यांची विचारपूस करणे वगैरे... कामामध्ये ते सगळे व्यस्त. तेथील आयाबायांना वाटले की, ते सगळेच स्वयंसेवक डॉक्टरच. तिथे उपस्थित अनिल दिंडे या स्वयंसेवकाला काही महिलांनी आपल्या आरोग्याच्या तक्रारी सांगण्यास सुरुवात केली. घराची स्वच्छता कशी करावी वगैरे त्या विचारू लागल्या. अनिल दिंडेनी मग घराची स्वच्छता यावर छोटेसे प्रॅक्टिकलच केले. ते पाहून महिलांचे समाधान झाले. "असे करायचे असते व्हय," असे बोलून त्या निश्चिंत झाल्या. दिंडेंना विचारले, "तुम्ही तर व्यावसायिक. तुम्हाला हे कसे माहिती?" यावर ते म्हणाले, "व्यावसायिक आहे, पण मी आधी संघ स्वयंसेवक आहे आलेल्या परिस्थितीमध्ये काय करायला हवे, याची सवय मला शाखेतून मिळाली. त्यामुळे पूर आल्यावर काय काय होते? त्यावर काय काय उपाययोजना कराव्यात, यावर कोल्हापुरातल्या सगळ्या संघ स्वयंसेवकांनी अभ्यासच केला आहे. प्रत्येकाला जे समजले ते सगळ्यांना सांगितले. त्यामुळे मीच नाही, तर कुणीही हे सांगू शकते.

 

कोल्हापूरच्या दैवज्ञ बोर्डिंग हॉलसह विविध मदत केंद्रातून पूरग्रस्तांच्या मदतीचे काम सुरू आहे. आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहीम आदींसह पूरग्रस्त कुटुंबीयांना आवश्यक जीवनपयोगी वस्तूंचे जीवदया किटचे वाटप केले जात आहे. इथे डॉ. सूर्यकिरण वाघ, कोल्हापूर शहर संघचालक, केदार कुलकर्णी, विभाग प्रचारक, केदार जोशी, जिल्हा कार्यवाह, निखिल कुलकर्णी,जिल्हा प्रचारक ,अनिरूद्ध कोल्हापूरे, जिल्हाप्रचार प्रमुख, डॉ.मिलींद सामानगडकर, जनकल्याण समिती, केशव गोवेकर, संपर्क विभाग, अनिल दिंडे, जिल्हा सोशल मिडिया प्रमुख सकट शेकडो स्वयंसेवक तिथे याच मानसिकतेने कोल्हापूर पूरस्थितीतून बाहेर यावे म्हणून काम करत होते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरापासून जवळ असलेल्या दैवज्ञ बोर्डिंगमध्ये घरदार विसरून हे सारे तिथे काम करत बसलेले. पहाट कधी, रात्र कधी होते, याच्याशी त्यांना काही देणेघेणे नाही. पूरग्रस्तांच्या मदतीला धावून येणाऱ्यांची नोंदणी करणे, त्यांना नियोजनबद्धरीत्या गरज असलेल्या गावात मदतीला पाठवणे, मदतीसाठी जे साहित्य आले त्यांची मोजणी करणे, त्या साहित्याचा जीवनदायी किट बनवणे, तो पुन्हा मोजणे, तो गरज असलेल्या गावांमध्ये पाठवणे, गरजूंना मदत होईल यासाठी कटाक्ष पाळणे, शहराबाहेरून आलेल्या मदत करणाऱ्यांंची व्यवस्था करणे, त्यांची निवास आणि जेवण खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, यात सगळे गुंतलेले. इथे ही या सर्वांचा भाव हाच की, याच कामांसाठी त्यांचा जन्म झाला असावा. तसे वर वर ही कामे सोपी वाटतात. पण हजारोंच्या संख्येंने आलेली औषधे, मदतकार्य करू इच्छिणारे शेकडो डॉक्टर्स, स्वयंसेवक यांची व्यवस्था करणे, त्यांना सेवाकार्य देणे हे सोपी गोष्ट नाही.

 

डॉ. सूर्यकिरण वाघांशी बोलले. त्यांचे म्हणणे की पूरग्रस्त परिस्थितीमध्ये नियोजन करून काम करणे गरजेचे होते. त्याची पहिली पायरी म्हणून पुरातून लोकांना बाहेर काढणे, दुसरे त्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करणे, आरोग्य सुविधा पुरवणे, नंतर त्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात पुन्हा आणणे. लोकांच्या मदतीसाठी सगळा महाराष्ट्र धावून आला. शासनानेही पूरग्रस्तांसाठी तात्पुरती निवास शिबिरे भरवली. ३५ शिबिरे आहेत. चारही बाजूंनी अन्नधान्य, कपडेवाटप होऊ लागले. सुरुवातीला एक-दोन दिवस ठीक होते. पण त्यानंतर लोकच अन्नधान्य आणि कपडे परत करू लागले. कारण, त्यांना ती मदत मिळाली होती. शिजवलेल्या अन्नाचे टेम्पो घेऊन लोक यायचे, पण त्यांना परत फिरावे लागायचे. याच वेळी रा. स्व. संघाने सर्वेक्षण केले की, नक्की लोकांची गरज काय आहे? हे सर्वेक्षण करण्यासाठी स्वयंसेवकांचे छोटे-छोटे गट बनवले. त्यातून कळले की, आरोग्य आणि सफाई हे दोन मोठे प्रश्न होते. त्यामुळे रा.स्व.संघातर्फे या दोन विषयांवर काम करायचे, असे ठरवले. त्यातच प्रशासनानेही परिसरातील सगळ्याच स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलवली. मदतीचा महापूर आहे. त्याचे नियोजन कसे करावे आणि खरेच कोणत्या प्रकारची मदत कुणी करावी यासाठीची ती बैठक होती. या बैठकीत प्रशासन आणि सर्वच स्वयंसेवी संस्थांनी एकमुखाने ठरवले की, या परिस्थितीमध्ये आरोग्य समस्येविषयीची सगळी मदत जनकल्याण समिती रा.स्व.संघ करेल. त्यानुसार आपण सगळे इथे सेवाकार्य करत आहोत. डॉ. सूर्यकिरण वाघ माझ्याशी बोलत होते पण त्यांची नजर सर्वत्रच होती. हे पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स त्या वस्तीत घेऊन जा, तिथे कॅम्प लागला ना? तो गट आज येणार होता आला का? याबाबत त्यांची कार्यवाही सुरूच होती.

 

तर दैवज्ञ बोर्डिंगमध्ये सेवेचा कुंभमेळाच भरला होता. रा.स्व.संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील देशप्रेमी, समाजनिष्ठ युवक-युवती आल्या होत्या. परिसरातील शाळा-महाविद्यालयातील तरुण आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आले होते. मदतरूपात आलेल्या वस्तूंचे किट बनवण्यात ते मग्न होते. तिथे एक सेंट्रल किचनही होते. मदतीला आलेल्या लोकांचे अन्न तिथे बनवले जात होते. एखादा गट गावात असेल, तर तिथेपर्यंत अन्न नेण्याची व्यवस्थाही होती. मोठ्या प्रमाणात अन्न बनवले जात होते. राहूल भोसले हे ही व्यवस्था पाहत होते. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय. पण व्यवसाय बंद करून ते इथे केंद्रीय किचनच्या व्यवस्थेमध्ये काम करत होते. शेकडो हात तिथे सेवा कार्यात गुंतलेले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मिक समाधान. कांदे चिरणाऱ्या महाविद्यालयीन मुलास विचारले, "घरी करतोस का कांदे कापण्याचे काम?" यावर तो आणि त्याच्यासोबतचे म्हणाले, "नाही ना. पण आज संधी मिळाली आहे आपल्या माणसांसाठी काहीतरी करायची." त्या तरुणांचे म्हणणे मनाला आनंद देऊन गेले. काम छोटे असो की मोठे समाजहिताचे असते, ही शिकवण त्यांना येथून मिळाली. जिल्हा प्रचार प्रमुख अनिरूद्ध कोल्हापुरे हेसुद्धा तिथे उपस्थित. अतिशय शांतपणे ते तिथे सगळ्यांना माहिती देत होते. कोल्हापुरेंना खरेच धन्यवादच द्यायला हवेत. कारण, इथे कोणत्या गावात काय परिस्थिती आहे आणि त्तिथे काय काम सुरू आहे आणि काय काम करावे लागेल याची अतिशय पद्धतशीर मांडणी त्यांनी केलेली. कोल्हापूरचे साहाय्यक पोलीस आयुक्त अभिनव देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना भेटून शहराची परिस्थिती आणि मदतकार्य जाणून घ्या, असे सांगून त्यांनी त्या भेटीचे नियोजनही केले. त्यांच्यासोबत तिथे गेल्यावर कळले की, संघ काय शक्ती आहे! संघाचा स्वयंसेवक कोल्हापुरे आहेत म्हणून साहाय्यक पोलीस आयुक्त अभिनव देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे दोघांनीही आमच्याशी पूरस्थितीबाबत मनमोकळी चर्चा केली. पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली का? असे विचारल्यावर ते म्हणाले, "आमचे कोल्हापूरवर जीवापाड प्रेम आहे. डोळ्यासमोर शहरात पूर आला असताना शहर पूर्वस्थितीत आणण्यासाठी जे काही करता येईल ते करणे हेच लक्ष्य केले. सगळ्यांची मदत घेतली. सगळ्यांना विश्वासात घेतले. यात प्रशासनाइतकेच स्वयंसेवी संस्थांचाही वाटा खूप मोठा आहे. मदत तर खूप आली आहे. आता पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आवाहन आहे. ते काम यशस्वीरीत्या करायचे आहे." दोघेही अधिकारी हळवे आणि भावूक होऊन बोलत होते. मनात आले कोल्हापूर शहर भाग्यवान आहे, इथे प्रशासनालाही आत्यंतिक मानवी चेहरा आहे.

  
 
 

रा.स्व.संघाचे सफाई अभियान किंवा आरोग्य शिबिरे गावात किंवा गावाकुसाबाहेरच नव्हती, तर आज इथे उद्या तिथे. पाल टाकून राहणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या वस्त्यांमध्येही रा.स्व.संघाने आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले. तावडे हॉटेल कॉर्नरजवळ नदीच्या काठावर, चिखलाच्या राड्यात, दुर्बल आणि अत्यंत हलाखीत जगणारे ते सगळे. तिथे रा.स्व.संघाचे लोक डॉक्टर, औषध, गोळ्या, आणखी जीवनदायी किट घेऊन पोहोचले. तिथे गेल्यावर पुराची भीषणता कळली. कारण, नदीला लागूनच यांची वस्ती. सगळं पाण्यात वाहून गेलेले. दोन-तीन दिवस बाजूच्या गावात भीक मागून त्यांनी गुजराण केलेली. पण आरोग्याच्या भयंकर समस्या निर्माण झालेल्या. या माणसाचे म्हणणे आमच्या खताड्यात(म्हणजे घाणीत) हे चांगले लोक कसे आले? तेथील कार्यकर्ते लाखे यांना लोक विचारू लागली. आपल्याला मदत करायला कोणीतरी आले याचा त्यांना कोण आनंद झालेला. हा आनंद शब्दात सांगूच शकत नाही. हा आनंद रा.स्व.संघाने त्यांना दिला होता. बापट कॅम्पमध्ये तर वेगळीच परिस्थिती. शहरातील कुंभार समाजाचे इथे वर्कशॉप. येथील स्थिती अत्यंत विदारक. येथील कुंभार समाजबांधव गणेशमूर्ती बनवण्यासाठी पतपेढी करून कर्ज घेतात. शहरभर इथूनच गणेशमूर्ती नेल्या जातात. इथे पुरामुळे गणेशमूर्तींचे अतोनात नुकसान झालेले. तुटलेल्या मूर्तींचे खच पडलेले. इथेही रा.स्व.संघाने आरोग्य शिबीर आणि सफाई अभियान करायला सरसावलेला. हजारो मूर्तींची तुटलेले अवयव रस्त्यावर पडलेले, गल्लीत पडलेले, त्यांना बाजूला करताना स्वयंसेवकांच्या डोळ्यात अश्रू आले. पुढे सीए गावातील दृश्य वेगळे. संपन्न गाव. इथेही पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेले. गावात रा.स्व.संघाच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आयोजित केलेले. अभाविपची तरुणाई तिथे मदतीला होती. पूर पाहून घाबरलेल्या बाळ गोपाळांना पूर्वस्थितीत आणण्यासाठी ते खेळ घेत होते. रा.स्व.संघाचे स्वयंसेवक पूरग्रस्त शिबिरामधील लहान मुलांसाठी खेळही घेत होते बरं का? यावर तेथील एका पुरोगामी संस्थेच्या व्यक्तीने विचारले होते, "हे संघाचे खेळ का घेता?" यावर संघ स्वयंसेवक काही म्हणण्याआधीच तेथील पालक म्हणाले होते, "खेळ घेतात. खेळामुळे आज कितीतरी दिवसांनी आमची मुलं हसली खेळली. नुसते अन्न खाऊन पोरबाळं राहू शकत नाहीत.

 

यावरून आठवले की, अशा परिस्थितीमध्येही येशूचे लाडके पूरग्रस्त भागात पूर ओसरल्यावर जाऊन लोकांना सांगत होती की, "प्रार्थना करा, येशूबापाला शरण जा, पुन्हा पूर येणार नाही." त्यांची करणी उर्वरीत कोल्हापूरला कळली तेव्हा सगळा कोल्हापूर त्यांच्या विरोधात उभा होता. या अशा वातावरणात राष्ट्र सेविका समितीचे कार्यही मोठे आहे. शुक्रवार पेठेत समितीची शाखा चालते. तिथे पूर आला होता. पूरग्रस्त महिलांना कपडे, अंतर्वस्त्र, सॅनिटरी पॅडची खूप गरज होती. समितीच्या मेधा जोशी यांनी आणि त्यांच्या सहयोगींनी याबाबत पुढाकार घेतला. या वस्तूंचा किट बनवून तो भगिनींना दिला. कारण, महिला या वस्तू मागणार कोणाकडे? एक महिलाच हे दु:ख ओळखू शकते. कोल्हापूर जिल्हा कार्यवाह केदार जोशी यांनी सांगितले की, "पुराच्या पहिल्याच दिवशी वाताहत झाली. त्या रात्री बैठक आयोजित केली. काही गट केले, आरोग्य, सफाई, मदत वाटप, मदतीसाठी आवाहन कोण करणार याची जबाबदरी वाटून दिली. आमच्यातल्या कित्येकांची घरे पाण्याखाली होती. घरातल्यांना बाहेर काढले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी बैठक घेतली. प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी शिबिरे घेतलेली होती. त्यांचे सर्वेक्षण करणारे गट बनवले. दुसऱ्या दिवशी त्यांनी ते सर्वेक्षण करून अहवाल द्यायचा. एका गटाने प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात फिरायचे. तेथील सर्वेक्षण करायचे अहवाल द्यायचा. दोन तासात हे काम पूर्ण करून पुन्हा सगळे जण जमलो. या अहवालानुसार काय काम करायचे ते निश्चित केले, तशा प्रकारचे नियोजन केले. प्रत्यक्ष महापुरात अडकलेल्या नागरिकांना सोडविण्यासाठी शुक्रवार पेठ, कसबा बावडा, विन्स हॉस्पिटल, नागाळा पार्क, न्यू पॅलेस या ठिकाणी अनेक आपल्या स्वयंसेवकांनी रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे." केदार जोशी शांतपणे सहज बोलत होते. बाजूला निखिल कुलकर्णी कोल्हापूर जिल्हा प्रचारक होते. केदार आणि निखिल दोघेही तरुण. त्यांना विचारले, "हे कसे जमले? तुम्हाला का वाटले हे करावे?" यावर निखिल म्हणाले, संघाच्या शाखेत शिकलो की, स्वयंसेवकांने समाजावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये स्वत:चे मत अभ्यास करायला हवा. समाज आहोत तर आपण आहोत. देश आहे तर आपण आहोत. संघ स्वयंसेवकांच्या या नि:स्वार्थी आणि निरलस वृत्ती पाहून शब्द सुचत नाही. इतकेच वाटते 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!'

@@AUTHORINFO_V1@@