चर्चा विधानसभेची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019   
Total Views |



केंद्रात आणि राज्यात बदललेले सरकार, भुजबळ यांची 'जेल वारी' या काळात आ. पंकज भुजबळ यांची मतदारसंघाशी नाळ तुटली. आगामी विधानसभा निवडणुकीत पंकज हॅटट्रीक साधतात की, राष्ट्रवादीच्या हातातून हाही मतदार संघ निसटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर, नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघात भाजप- शिवसेना या युतीचे उमेदवार विजयी झाले. तसेच, नाशिक शहरात २०१४ च्या विधानसभा निवडणुकांतदेखील भाजपचाच वरचष्मा राहिला. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत नेमके काय होणार, याबाबत सध्या २०१९ च्या लोकसभा आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या अंदाज बांधले जात आहेत. त्यातच धनराज महाले आणि निर्मला गावित यांनी पक्षबदल केल्याने या चर्चांना सध्या जिल्ह्यात उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र पंकज भुजबळ हे अनुक्रमे येवला आणि नांदगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विधानसभा मतदारसंघाचा इतिहास मोडीत काढणाऱ्या छगन भुजबळांसमोर चौथ्यांदा लढताना मात्र गडद संकट असल्याचे सध्या दिसून येत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी सुमारे अडीच वर्ष भुजबळ काका-पुतणे यांना जेलची हवा खावी लागली. त्यानंतर बाहेर आल्यावरदेखील भुजबळ यांना आपल्या येवला मतदारसंघाची कामे हवी तशी करता आलेली नाही. त्यातच येवला येथील शिवसेनेचे दहा वर्ष आमदार असलेले माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी पुन्हा शिवबंधन हाती बांधल्याने छगन भुजबळ यांच्यासमोर यंदा कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. सन २०१४ मध्ये संभाजी पवारांनी भुजबळांना मोठे आव्हान दिले होते. भुजबळांकडून दुखावलेल्या माजी आमदार मारोतराव पवार यांनी आपल्या पुतण्या संभाजी पवार यांना शिवसेनेत पाठवून चांगली मते मिळविली होती. सेनेत त्यावेळी तालुक्यातील ४ नेत्यांपैकी एकटेच मारोतराव होते. आता परिस्थिती याउलट आहे. नरेंद्र व किशोर दराडे हे बंधू सेनेत आले असून ते सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे सेनेचे पारडे आणखी जड झाले आहे. येवला पंचायत समिती व नगर परिषदेची सत्ताही राष्ट्रवादी पार्याने भुजबळांच्या हातातून निसटून शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. शिवसेनेकडून पं. स. उपसभापती रुपचंद भागवत यांनी २ वर्षांपासून जोरात तयारी सुरू केली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणजे भुजबळांना ही निवडणूक जड जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 

तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागासाठी आवश्यक असणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात भुजबळांना अपयश आले. त्यामुळे तालुक्यात शेतीसिंचनाचा पाणीप्रश्न आजही जसा आहे तसाच आहे. दुसरीकडे इगतपुरी विधानसभा मतदार संघावर मागील दहा वर्ष काँग्रेसचा वरचष्मा राहिलेला आहे. येथील आ. निर्मला गावित यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत येथील काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे. मात्र, यावेळी निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथे काँग्रेसच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हा गड आता काँग्रेसच्या हातातून निसटण्याची शक्यताच जास्त निर्माण झाली आहे. हा मतदार संघ आदिवासी आरक्षित मतदार संघ असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतो. त्यातच लोकसभा निवडणुकीत इगतपुरी मतदारसंघात भारिपने मिळविलेली मते काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत तापदायक ठरू शकतात, अशी चिन्हे आहेत. दोनवेळा आमदार राहिलेले शिवराम झोले सध्या भाजपमध्ये आहेत. एक वेळेस आमदार राहिलेले काशीनाथ मेंगाळ शिवसेनेत आहेत. १० वर्षांत या आमदारकीसाठी तिघांभोवतीच तालुक्याचे राजकारण सुरू आहे.

 

आपला बालेकिल्ला टिकविण्यासाठी निर्मला गावित यांनी जोर लावल्याचे येथे दिसून येत आहे. इगतपुरी तालुका पर्जन्यबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तरीही इगतपुरी, घोटीसारख्या शहरी भागासह ग्रामीण भागातील वनवासी वाडी-वस्त्यांवर महिलांना हंड्याने पाणी भरावे लागत आहे. आ. गावित निवडून आल्यानंतर हंडामुक्त तालुक्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, ७ ते ८ जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या आजदेखील गंभीर आहे. तसेच, सलग दोन वेळा निवडून न येण्याची नांदगाव मतदारसंघांची 'परंपरा' छगन भुजबळ यांचे पुत्र आ. पंकज भुजबळ यांनी मोडीत काढली होती. पंकज भुजबळ मागील दहा वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघावर भुजबळांची घट्ट पकड होती. केंद्रात आणि राज्यात बदललेले सरकार, भुजबळ यांची 'जेल वारी' या काळात आ. पंकज भुजबळ यांची मतदारसंघाशी नाळ तुटली. आगामी विधानसभा निवडणुकीत पंकज हॅटट्रीक साधतात की, राष्ट्रवादीच्या हातातून हाही मतदार संघ निसटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनमाड पाणीप्रश्न निकाली लावण्यात भाजपने दिलेले योगदान, मनमाडमध्ये दुष्काळ असतानादेखील मतदार संघाकडे पंकज यांनी फिरवलेली पाठ. कोणतेही दृष्टिक्षेपात येईल असे काम नसणे, वाढलेला जनक्षोभ या बाबी पंकज भुजबळ यांच्यासाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता जास्त आहे. माजी समाजकल्याणमंत्री बबन घोलप यांची आणि त्यानंतर त्यांचे पुत्र योगेश घोलप यांनी देवळाली मतदार संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

 

अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव देवळाली मतदारसंघात शहर आणि ग्रामीण असे दोन्ही परिसर येतात. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रामदास सदाफुले यांनी नेहमीच घोलप यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र जातीय समीकरणामुळे घोलप यांचा नेहमीच विजय होत आला. यंदा मात्र चित्र बदलले आहे. सदाफुले यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपशी नाते जोडले आहे. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप वेगवेगळे लढल्याने यंदा या मतदारसंघात भाजपकडून तिकीट मिळेल, अशी आशा सदाफुलेंसह पक्षातील अनेकांना होती. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा युती झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे घोलप यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. नाशिक शहराचा विचार केला तर, नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम या तीनही मतदारसंघावर २०१४ मध्ये भाजपचे आमदार निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतदेखील युतीच्या उमेदवारास येथून चांगले मतदान झाले. तसेच, आ. भाई जगताप यांच्या नेतृत्वात झालेल्या काँग्रेस उमेदवार मुलाखतीसदेखील अल्प प्रतिसाद लाभल्याने नाशिक शहरातून काँग्रेस हद्दपार झाली की काय अशी चर्चा शहरात रंगली होती. २००९ च्या विधानसभेत मनसेला मत देणाऱ्या सुजाण नागरिकांनी २०१४ मध्ये भाजपला पसंती दिली आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपवरील आपला विश्वास कायम दाखविला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपचाच विजय येथे होण्याची दाट शक्यता आहे. मुकणे धरण परियोजना, स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे, आणि विविध सामाजिक कामे यात भाजप आमदारांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता असून दत्तक नाशिकसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले काम आणि करत असलेले कामदेखील भाजपसाठी शहरात जमेची बाजू आहे. मात्र असे असले तरी, बंद पडलेले उद्योग, गुन्हेगारी, पेलिकन पार्कचा प्रश्न विरोधक प्रचारात मुद्दा म्हणून वापरण्याची शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@