आयुष मंत्रालयाचे काम जगभरात पोहोचविण्याची सुरुवात : श्रीपाद नाईक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |


 


नवी मुंबई : "आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून ५८ देशांत केंद्र, १४ विद्यापीठांमध्ये शिक्षक शिकवत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेत आयुष मंत्रालयाचा प्रतिनिधी उपस्थित आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत शेकडो 'आयुष एक्स्पो'चे कार्यक्रम झाले. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले," असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय चिकित्सा परिषद, सिडको, नवी मुंबई महापालिका, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आदींच्या संयुक्त विद्यमाने आणि आ. प्रशांत ठाकूर व मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 'आयुष' म्हणजेच विविध चिकित्सा पद्धतींविषयी पन्नासहून जास्त कार्यशाळा व दहा परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते.

 

श्रीपाद नाईक म्हणाले, "आयुष मंत्रालय नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आयुष मंत्रालयातर्फे गेल्या पाच वर्षांत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. आयोजकांनी कार्यक्रमाची उंची एका स्तरावर नेऊन ठेवली याबद्दल त्यांचे आभार, भारतीय पारंपरिक औषधशास्त्र आयुर्वेदाच्या माध्यमातून जगासमोर येत असून मुळात लोकांनी त्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे. आयुष मंत्रालयातर्फे विविध सरकारी संस्थांमार्फत अ‍ॅलोपॅथी आणि होमिओपॅथी उपचार एका छताखाली घेतले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य' या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्र्यांसह, सिडको व या संमेलनाचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. मंदा म्हात्रे, आ. गणेश नाईक, नवी मुंबई महापौर जयवंत सुतार, पनवेल महापालिका महापौर डॉ. कविता चौतमल, मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ, जी. डी. पोळ फाऊंडेशनचे सर्वेसर्वा ऋषिकेश पोळ आदींसह वर्ल्ड आयुष एक्स्पोचे राष्ट्रीय समितीतील डॉ. रामकृष्णन, डॉ. श्रीराम सावरीकर, डॉ. धनाजी बागल, ड़ॉ. राजश्री नाईक, डॉ. जुबेर शेख, डॉ. रामचंद्र सुर्वे, डॉ. संतोष नेव, डॉ. रामजी शेख, डॉ. रणजित पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. हरिश नाडकर्णी यांच्या एनएबीएच गाईडलाईन आणि डॉ. प्रियांका पिंगळे आणि डॉ. विष्णू बावणे यांच्या 'रजःस्वला-स्त्रीत्वाच्या पाऊलखुणा' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

 

सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, "आपल्याकडे असलेल्या आयुर्वेदातील ज्ञानातील भांडार जगासमोर मांडण्यासाठी कचरत होतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सुरू झालेल्या वर्ल्ड आयुष एक्स्पोनिमित्त आयुर्वेद, युनानीसारख्या पॅथींना जगासमोर मांडण्याचे एक व्यासपीठ मिळाले आहे. ऋषिकेश पोळ यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आयुष मंत्रालयाचे आभार मानत इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनला संधी दिली, त्याबद्दल आभार मानले. संमेलनाच्या निमित्ताने रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या डॉक्टरांनी जाणून घेत त्यावर तातडीने निदान करण्याचे आवाहन यावेळी केले. देशभरातील आयुष क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन परिसंवादातून मिळणार आहे. मेडिकल टुरिझम, मेडिकल जर्नालिझमसारखे विषय या संमेलनाद्वारे हाताळले जाणार आहेत. डॉ. संजीव यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. भाग्यश्री कश्यप यांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@