चिदंबरी अटकनाट्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |


 


आपल्यावरील जबाबदारी पार पाडत सीबीआयला चिदंबरम यांच्या घराच्या गेटवरून उड्या माराव्या लागल्या व एकेकाळी चिदंबरम यांनीच उद्घाटन केलेल्या सीबीआय मुख्यालयात धरून आणावे लागले. एखादा अतिरेकी जसा कुठल्याशा खोलीत लपतो, स्वतःला सुरक्षित समजतो आणि तपासयंत्रणा मात्र त्याला बरोबर शोधून बाहेर काढतात, त्याप्रकारचे नाट्य यावेळी सर्वांना पाहायला मिळाले.


अटकेपासून पळ काढणारा पाकीटमार, चोर, गुंड-मवाली, खुनी-गुन्हेगार आतापर्यंत भारतीयांनी पडद्यावर आणि प्रत्यक्षातही पाहिला होता. परंतु, देशाच्या माजी गृहमंत्री, अर्थमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार वा ज्येष्ठ विधीज्ञाने कधी तशी पळापळ केल्याचे कोणाला दिसले नव्हते. मात्र, बुधवारी दिल्लीत जो काही नाट्यमय प्रकार घडला, त्यामुळे वर उल्लेख केलेल्या सन्माननीय पदांवरील व्यक्तीच्या आयुष्यातील तसा क्षणही समस्त देशवासीयांना 'याचि देही याचि डोळा' अनुभवता आला. ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्याशी संबंधित हा विषय असून आपल्याला ताब्यात घेतले जाऊ नये, यासाठी त्यांनी परवा दिवसभर जंग जंग पछाडले. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात हेलपाटे मारून आपल्याला खास वागणूक द्यावी, आपली अटक टाळली जावी, अशीही त्यांची इच्छा होती. परंतु, न्यायालयाने तसे काही न करता, तुमच्या याचिकेवरील सुनावणी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच रांगेत होईल, त्यात काहीही खास नसेल, असे सांगितले आणि चिदंबरम यांच्या आशेचा फुगा फुटला. नंतर कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीचे आरोप असलेल्या, परंतु, इतरांनाच शहाजोग सल्ले देण्याचे काम करत आलेल्या या इसमाला अतिशय विचित्रपणे अटक केली गेली आणि आज त्यांची रवानगी पोलिस कोठडीतही करण्यात आली. खरे म्हणजे चिदंबरम यांच्या अटकेचा हा प्रकार त्यांनी याआधी भूषवलेल्या पदांची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारा होता, पण चिदंबरम यांच्यावर ही अशी लाजिरवाणी वेळ आली ती त्यांच्या स्वतःच्याच कर्तृत्वामुळे!

 

तत्पूर्वी पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेत स्वतःला एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणे पेश केले. आपण जणू काही आदर्शांचा, नैतिकतेचा जिवंत पुतळा आहोत आणि आपल्याला अटक करण्यासाठी धावणारी प्रशासकीय यंत्रणाच मुळी दोषी आहे, असाच त्यांचा यावेळचा आविर्भाव होता. पुढे पत्रकार परिषद आटोपून चिदंबरम स्वतःच्या घरी गेले आणि तिथूनच सुरू झाला उंदरा-मांजराचा खेळ. वस्तुतः ईडी आणि सीबीआयची पथके कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच चिदंबरम यांच्या अटकेसाठी आली होती. चिदंबरम यांनी यावेळी कायद्याचा मान राखून, संविधानावर, न्यायालयावर, सरकारी संस्थांवर विश्वास दाखवत सहकार्याचा पवित्रा घ्यायला हवा होता. ते एक आदर्श उदाहरणही ठरले असते. परंतु, चिदंबरम यांनी तसे न करता, घराचा दरवाजा न उघडता तपासपथकांना बाहेरच ताटकळत उभे ठेवले. परिणामी, आपल्यावरील जबाबदारी पार पाडत, कर्तव्य बजावत सीबीआयला चिदंबरम यांच्या घराच्या गेटवरून उड्या माराव्या लागल्या व एकेकाळी चिदंबरम यांनीच उद्घाटन केलेल्या सीबीआय मुख्यालयात धरून आणावे लागले. एखादा अतिरेकी जसा कुठल्याशा इमारतीच्या खोलीत लपून बसतो, तिथे स्वतःला सुरक्षित समजतो आणि तपासयंत्रणा मात्र त्याला बरोबर शोधून बाहेर काढतात, त्याप्रकारचे नाट्य यावेळी सर्वांना पाहायला मिळाले. चिदंबरम जर अटकेपासून बचावाचा हा अर्थहीन उद्योग न करते तर त्यांना अशाप्रकारे ताब्यात घेण्याची वेळच आली नसती. उलट त्यांना सन्मानानेच नेले असते. अर्थात, जे स्वतःला देशाच्या कायदा, संविधान व न्यायालयापेक्षाही सर्वोच्चस्थानी मानतात ते सहजतेने कारवाईला कसे सामोरे जातील? ते मुजोरपणाच करणार!

 

बुधवारी रात्री उशिरा पी. चिदंबरम यांना अटक झाली व काँग्रेसने लगोलग मोदी सरकारवर दोषारोप सुरू केले. केंद्र सरकार सूडाच्या भावनेने सीबीआय आणि ईडीचा वापर करत असल्याचे काँग्रेस प्रवक्त्यांनी म्हटले. काँग्रेसचेही बरोबरच आहे म्हणा, कारण आपण जसे असतो, तसेच आपल्याला जग दिसत असते. म्हणजेच आपल्या सत्ताकाळात सीबीआय आणि ईडीचा द्वेषभावनेने वापर काँग्रेसनेच केला असेल, त्यामुळेच तर त्यांना आता मोदी सरकारही तसेच करत असल्याचे वाटते. विशेष म्हणजे काँग्रेस सरकारच्याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय हा पिंजऱ्यातील पोपट झाल्याचे म्हटले होते. याचाच अर्थ न्यायालयानेदेखील काँग्रेस कशाप्रकारे सीबीआयला वाकवते, पळवते, कामाला लावते, हे मान्य केले होते. आज त्याच काँग्रेसचे बडबडे, मोदी सरकारवर सूडाचा आरोप करतात, हा विनोदच नव्हे काय? दुसरीकडे काँग्रेसच्या आरोपाला पार्श्वभूमी आहे ती अमित शाह यांच्याबाबतच्या प्रकरणाची. कुख्यात दहशतवादी सोहराबुद्दीन याचा एका एन्काऊंटरमध्ये खात्मा केल्याबद्दल नऊ वर्षांपूर्वी सीबीआय गुजरातच्या गृहमंत्र्यांचा-अमित शाह यांचा शोध घेत होती आणि तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार तर पी. चिदंबरम गृहमंत्री होते. मात्र, अमित शाहांनी पी. चिदंबरम यांनी कोठडीतील अंधार टाळण्यासाठी ज्या करामती केल्या, तसे काहीही न करता स्वतःहून सीबीआयसमोर हजर राहणे पसंत केले होते. पण काँग्रेसला हे आठवत नसेल. नंतर अमित शाह या सर्वच आरोपांतून, काँग्रेसने विणलेल्या जाळ्यातून तावूनसुलाखून बाहेर पडले, कारण त्यांच्यावरील आरोपच खोटे होते, हेही देशाने पाहिले. म्हणूनच आज पी. चिदंबरम जर धुतल्या तांदळासारखे असतील तर काँग्रेसने कांगावा करण्याची, भिण्याची काहीही गरज नाही. कारण चौकशीनंतर खरे-खोटे काय ते समोर येईलच की!

 

चिदंबरम यांच्या अटकेवरून काँग्रेसनेते, प्रवक्ते तोंडाची वाफ दवडत असतानाच त्या पक्षाच्या आणखी एका वकीलनेत्याने तोंड उघडत थेट उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर दिलेल्या निकालाच्या 'वेळेवर' कपिल सिब्बल यांनी सवाल उपस्थित केले. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने जाणीवपूर्वक पी. चिदंबरम यांच्या जामिनावर सुनावणी केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. कपिल सिब्बल यांनी उचललेले हे मुद्दे अतिशय गंभीर आहेत, तसेच त्यामागे आपण न्यायालयांनाही जुमानत नसल्याचा उद्दामपणाही आहे. न्यायालयाने आपल्याला लाभ पोहोचेल असा निकाल दिला की, काँग्रेसनेते त्यातून भलतासलता अर्थ काढतात, हे आपण लोकसभा निवडणुकीपूर्वी पाहिले होते. सर्वोच्च न्यायालयाने काहीही म्हटलेले नसताना तसे म्हटल्याचे ठोकून देत राहुल गांधींनी राफेलप्रकरणी मोदींना चोर ठरवले होते. मिळेल त्या मंचावरून राहुल गांधी मोदींबद्दल धादांत खोटी विधाने सर्वोच्च न्यायालयाच्या नावावर खपवत होते. परंतु, नंतर न्यायालयानेच राहुल गांधींच्या बेतालपणाला अटकाव केला व माफीही मागायला लावली. आजचे हे चिदंबरम प्रकरणही न्यायालयानेच हाताळले, मात्र त्यात काँग्रेसला फायदेशीर काही नसल्याने त्यांनी न्यायालयावरच आरोपांना सुरुवात केली. इथेच काँग्रेसवाले न्यायालयाला, व्यवस्थांना सोयीनुसार मान्य करत असल्याचे स्पष्ट होते. हा देशातील संवैधानिक संस्थांवरील अविश्वासाचा आणि त्यातून त्यांना सुरुंग लावण्याचाच प्रकार म्हणायला हवा. यातूनच मोदी सरकार घटनात्मक संस्थांवर अतिक्रमण करते, असा आरोप करणारे स्वतःच व्यवस्था उद्ध्वस्तीकरणासाठी जोमाने काम करत असल्याचे स्पष्ट होते. अर्थात हे सर्व जनतेसमोरच होत आहे आणि जनता या लोकांना लक्षात ठेवेलच. तसेच वेळ आली की पुन्हा पुन्हा अद्दलही घडवत राहिलच!

@@AUTHORINFO_V1@@