एक ‘ट्रिलियन डॉलर’साठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |



मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी सरकारने यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अर्थतज्ज्ञ, विशेषज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन आवश्यक असून त्यादृष्टीने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच वित्त व नियोजन विभागास दिले.

 

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, "सन २०२५ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर म्हणजे ७० लाख कोटी करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केले जाईल. नियोजनपूर्वक योजनांची आणि उपक्रमांची आखणी करणे, १ ट्रिलियन डॉलरची वाटचाल अधिक यशस्वीरित्या आणि वेगाने होण्यासाठी उपाययोजना सूचवणे यासाठी तज्ज्ञांच्या समितीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला,"असे ते म्हणाले.

 

५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र देणार २० टक्क्यांचे योगदान

 

नीती आयोगाच्या बैठकीत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प प्रधानमंत्र्यानी व्यक्त केला असून यात राज्यांना योगदान देण्याचे आवाहन केले आहे. या आर्थिक विकासाच्या आंदोलनात महाराष्ट्र पुर्ण क्षमतेने सहभागी होणार असून यातील २० टक्के हिस्सा महाराष्ट्र उचलणार आहे. यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर इतकी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्याचा विकास दर दुप्पट होण्याची गरज आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या विकासात राज्यातील सर्व व्यापारी -उद्योजक आणि सर्व क्षेत्रातील लोकांनी खुप उत्तम योगदान दिले आहे. प्रगतीची ही गती कायम राखण्यासाठी आर्थिक आंदोलनात सहभागी होऊन यापुढेही राज्यातील जनतेने विकास प्रक्रियेत योगदान वाढवावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी या निमित्ताने केले.

@@AUTHORINFO_V1@@