अग्नीप्रतिबंधक शेळ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019   
Total Views |



पोर्तुगालमधील जंगलांमध्ये गेल्या काही वर्षांपासून आगीचे, वणव्याचे प्रकार होत असून त्यामुळे तो देश चिंतीत आहे. जंगलातील आगीमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी तिथल्या सरकारने कितीतरी उच्चस्तरीय तंत्रज्ञानाचाही प्रयोग केला, पण त्यातून काहीही साध्य झाले नाही व अखेरीस त्या देशाच्या मदतीला आली ती शेळी!


मानव शतकानुशतकांपासून अनेकानेक प्राणी-पक्षी पाळत आला. गाय, बैल, म्हशी, रेडे, याक, कोंबड्या, कबुतर यांसह कुत्रा, मांजर, घोडा, पोपट वगैरे. मानवासाठी उपयुक्त ठरलेल्या या पाळीव प्राण्यांपैकीच एक म्हणजे शेळी आणि त्याच्याच जोडीला मेंढ्या. शेळ्या-मेंढ्यांचे पालनपोषण करत माणसाने त्यापासून दूध, मांस आणि लोकर मिळवली. आजही शेळ्या-मेढ्यांचा वापर मांस आणि लोकर उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. उल्लेखनीय म्हणजे खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांच्या मांसाचे निरनिराळे पदार्थ मांसाहाऱ्यांच्या घरोघरी, हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये शिजवले जातात. शेळ्या-मेंढ्यापालनामुळे आज मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाल्याचेही दिसते. म्हणजेच यातून आर्थिक उत्पन्नही मिळत आहे. परंतु, शेळ्या-मेंढ्यांचा वापर एवढ्यापुरताच मर्यादित आहे का? की यापेक्षाही अधिक वेगळ्या काही कामांसाठी त्यांचा वापर करता येऊ शकतो किंवा होतो? शेळ्या-मेंढ्यांचा उपयोग एखाद्या देशाचे सरकार आपली वनसंपत्ती, जंगले वाचवण्यासाठी करू शकते का? तर नक्कीच या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत आणि शेळ्या-मेंढ्यांचा असा उपयोग करून घेणारा देश आहे-पोर्तुगाल. पोर्तुगालमधील जंगलांमध्ये गेल्या काही वर्षांपासून आगीचे, वणव्याचे प्रकार होत असून त्यामुळे तो देश चिंतीत आहे. जंगलातील आगीमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी तिथल्या सरकारने कितीतरी उच्चस्तरीय तंत्रज्ञानाचाही प्रयोग केला, पण त्यातून काहीही साध्य झाले नाही व अखेरीस त्या देशाच्या मदतीला आली ती शेळी! तत्पूर्वी आगीवर नियंत्रणासाठी ड्रोन तंत्रज्ञान, उपग्रहे आणि विमानांचाही उपयोग करण्यात आला. सोबतच पोर्तुगालमध्ये दीर्घकाळापासून जमीन व्यवस्थापनाचीही मागणी केली जात आहे आणि जंगलातील आगीच्या संकटाने या बहुप्रतिक्षित व्यवस्थेचीही सुरुवात केली. या सर्वच तांत्रिक प्रयोग आणि जमीन व्यवस्थापन पद्धतीनंतर आता देशाच्या प्रशासनाने शेळ्यांचा प्रयोग सुरू केला आहे. दरम्यान, पोर्तुगालच नव्हे तर अन्य अनेक दक्षिण युरोपीय देशांतही जंगलात लागणाऱ्या आगीची समस्या आहेच. जंगलातील आग भडकण्याचे एक कारण गावागावांतील घटती लोकसंख्या हे असल्याचेही सांगितले जाते. देशांतल्या गावांत शेळ्या-मेंढ्यांना पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती, पण मागच्या काही वर्षांत त्यांचेही पलायन होताना पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत जंगलांचा वाढता आकार थेट गावापर्यंत पोहोचतो आणि परिणामी आग लागण्याच्या घटना वेगाने फैलावतात, असे पोर्तुगालचे मत आहे.

 

पोर्तुगाल सरकारने या समस्येवर तोडगा शोधला आणि तो म्हणजे पुन्हा एकदा गावागावांत शेळ्या-मेंढ्यांची संख्या वाढवली पाहिजे. शेळ्या-मेंढ्यांची संख्या वाढवली तर जंगलात लागणाऱ्या आगीला आटोक्यात आणता किंवा मर्यादित करता येईल, असे सरकारला वाटते. ही माहिती इथल्या लियोनल मार्टिस पेरेरिया यांनी दिली असून त्यांनाच या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेच्या प्रमुखपदीही नियुक्त केले जाऊ शकते. कारण पोर्तुगाल सरकारने सुरू केलेल्या पायलट प्रोजेक्टशीही लियोनल जोडलेले आहेत. या कार्यक्रम-उपक्रमामुळे लोकांमध्ये जनजागृती होईल आणि हवामानबदलाबद्दल लोक अधिक सतर्क होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जंगलांवरील आगीवर नियंत्रणात शेळ्या-मेंढ्या नेमकी काय आणि कशी भूमिका बजावतील? हा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर त्याचे उत्तर असे आहेपोर्तुगालच्या दक्षिण भागामध्ये स्ट्रॉबेरीच्या वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कित्येक शेतकरी या स्ट्रॉबेरीची शेतीही करतात. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीची पाने ही आग लागण्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील-ज्वलनशील असतात आणि त्यामुळे ती झपाट्याने आगीच्या लपेट्यातही येतात. परंतु, गावागावांत पुरेशा प्रमाणात शेळ्या-मेंढ्या असतील तर असे होणार नाही. आपल्याला माहितीच आहे की, शेळ्या या अपवाद वगळता जवळपास सर्वच झाडांची, वेलींची पाने-फुले खाऊन टाकतात. त्यांना वर्ज्य असे काहीच नसते. अगदी तिखट मिरच्यांपासून काहीही त्या चवीने खातात! शेळ्यांच्या याच खादाडीचा वापर पोर्तुगाल सरकार करत आहे. शेळ्या स्ट्रॉबेरीची पाने खातील व जंगलातील आग थोपवता येईल, असा पोर्तुगाल सरकारचा होरा आहे. तसेच यासाठी ६ हजार, ७०० एकरच्या विशेष जागेचीही निवड करण्यात आली आहे व आता त्यात १० हजार, ८०० शेळ्यांना ठेवले जात आहे. यावरूनच पोर्तुगाल सरकार शेळ्यांचा आपत्तीतही चांगला वापर करून घेत असल्याचे दिसते.

@@AUTHORINFO_V1@@