प्रभादेवीची ओळख 'आकार'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019   
Total Views |




'आकार'चे देव्हारे आणि मूर्ती निव्वळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. एका विशिष्ट संगमरवरी दगडापासून घडवलेलं मंदिर, देव्हारे आणि मूर्ती ही 'आकार'ची वैशिष्ट्ये. त्याचप्रमाणे लाकडापासूनदेखील मंदिरे तयार केली जातात. या मंदिरावरचे कोरीव काम प्रेक्षणीय असते. 'आकार'चे वरळी, राजस्थान येथे कारखाने आहेत, तर प्रभादेवी येथे शोरूम आहे.


दुपारची वेळ. नयनाने नुकताच शोरूमचा दरवाजा उघडला होता. खरंतर तिचा आज अजिबात मूड नव्हता शोरूम उघडण्याचा. हे शोरूम मुंबईतल्या जुन्या इमारतींपैकी एक असलेल्या इमारतीत होतं. त्यामुळे वास्तू परिरक्षण नियमान्वये तिला अनेकांनी त्रास दिला होता. कायद्याची भीती दाखवली होती. मात्र, मिलिटरी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली नयना कोणतीही गोष्ट नियमानुसारच करायची. त्यामुळे तिला त्रास देणारे थकले. मात्र, ती तावूनसुलाखून निघाली होती. छोटीशी गणेशपूजा आटोपून बाजूच्याच गाळ्यामधून एकेक मूर्ती आणून ती शोरूममध्ये ठेवत होती. इतक्यात एका आलिशान गाडीतून पांढऱ्याशुभ्र साडीतल्या एक साध्वीतुल्य विदुषी उतरल्या. मला साईबाबांची मूर्ती मिळेल का? त्यांचा कोमल स्वर ऐकून नयना शाह वळल्या आणि पाहतात तो काय, दस्तुरखुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर उभ्या होत्या. लतादीदींचं त्यावेळेस येणं जणू काही साक्षात सरस्वती देवीच प्रकटल्याचा भास होता. त्या क्षणापासून नयना शाह यांच्यातली मरगळ निघून गेली आणि नवचैतन्याने त्यांनी परत जोमाने कामास सुरुवात केली. आज ते शोरूम प्रभादेवीची एक ओळख म्हणून सुपरिचित आहे. नयना शाह यांच्या या शोरूमचं नाव आहे 'आकार'.

 

माणिक छेडा आणि मुलवंती छेडा यांची सुकन्या म्हणजे नयना. माणिकभाईंचं कुलाब्याला किराणामालाचं दुकान होतं. नयनाला त्यांनी कुलाब्याच्या मिलिटरी कॉन्व्हेंटमध्ये शिकण्यास धाडलं. या शाळेत देशभरातून सैनिकांची मुले शिकण्यास येत. अत्यंत कडक शिस्तीची अशी ही शाळा. त्यामुळे आपसूकच ही शिस्त नयनाच्या अंगीसुद्धा बाणली. पुढे वाणिज्य शाखेची पदवी तिने एचआर महाविद्यालयातून मिळवली. कालांतराने नयनाचा विवाह सुधीर शाह यांच्याशी झाला. प्रेमजी शाह यांनी १९७९ साली आकार हे फर्निचरचे दुकान सुरू केले. प्रेमजीभाईंना दोन मुले होती. सुधीर त्यांचा मोठा मुलगा. लग्न झाल्यावर जवळच असलेल्या रचना संसदमधून नयना शाह यांनी इंटिरिअर डिझायनरची पदविका मिळवली. त्यासुद्धा व्यवसायात लक्ष देऊ लागल्या. दरम्यान, सुधीर आणि नयना या दाम्पत्याला दोन गोंडस अपत्ये झाली. फर्निचरसाठी जागा अपुरी पडू लागल्याने फर्निचरवरून व्यवसाय देव्हाऱ्याकडे वळला. देव्हारे म्हटलं की देव आलेच. त्यामुळे मूर्त्यांनासुद्धा मागणी वाढू लागली. काही वर्षांतच प्रेमजीभाई व्यवसायातून निवृत्त झाले. त्यांच्या मुलांनी व्यवसाय वाटून घेतले. सुधीर शाह यांच्या वाटेला 'आकार' आले. २००५ साली प्रकृतीअस्वास्थ्यामुळे सुधीर शाह यांनी व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता व्यवसायाचा संपूर्ण भार नयना शाह यांच्या खांद्यावर आला.

 

'आकार'चा व्यावसायिक आकार वाढत होता. राजकारण, उद्योग, चित्रपटसृष्टीतले दिग्गज आकारला भेट देऊन देव्हारे खरेदी करू लागले. मूर्त्यांची मागणी वाढली. नयना यांचा मुलगा समकित आणि मुलगी श्रद्धा दोघेजण व्यवसायात नयनांना मदत करू लागले. समकित याने 'व्हिज्युअल कम्युनिकेशन' या विषयात अमेरिकेतून पदवी संपादन केली, तर श्रद्धाने इंग्लंडमधील बिझनेस स्कूल ऑफ मँचेस्टरमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. समकितचा अभ्यासाचा विषय वेगळा आहे. मूर्तींच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपणे आणि त्याप्रमाणे मूर्ती घडविणे, यात त्याचा हातखंडा आहे. जीर्ण आणि प्राचीन मूर्तींची डागडुजी करण्यात तो वाकबगार आहे. त्याने स्वत:ची कार्यशाळा सुरू केलेली असून तो कलाकारांना प्रशिक्षित करतो. प्राचीन मूर्तींच्या डागडुजी या विषयामध्ये त्याची देश-विदेशात ख्याती आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या गाभाऱ्यात रुक्मिणी, राधिका आणि लक्ष्मीच्या मूर्ती आहेत. यापैकी लक्ष्मीची मूर्ती ३५० वर्षे जुनी आहे. या मूर्तीच्या नाकात नथ घातली जाते. कित्येक वर्षांच्या या परंपरेमुळे मूर्तीची झीज होऊन नाक तुटलं. धर्मशास्त्राप्रमाणे भंजक मूर्ती ठेवली जात नाही. त्याचे पाण्यात विसर्जन केले जाते. लक्ष्मीमातेच्या मूर्तीची भंजक अवस्था हा भावनिक मुद्दा झाला होता. हुबेहूब मूर्ती तयार करणे आवश्यक होते. कुणीतरी 'आकार'चं नाव सुचवलं आणि हुबेहूब मूर्ती घडवण्याचं आव्हान आकारने स्वीकारलं. समकितने आपल्या चमूसह दिवस-रात्र एक करत जीव तोडून काम केलं आणि काही दिवसांतच हुबेहूब मूर्ती घडवली. त्या मूर्तीची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठापना झाली. पंढरपूरच्याच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी हा खूप मोठा सुखद धक्का होता.

 

'आकार'चे देव्हारे आणि मूर्ती निव्वळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. एका विशिष्ट संगमरवरी दगडापासून घडवलेलं मंदिर, देव्हारे आणि मूर्ती ही 'आकार'ची वैशिष्ट्ये. त्याचप्रमाणे लाकडापासूनदेखील मंदिरे तयार केली जातात. या मंदिरावरचे कोरीव काम प्रेक्षणीय असते. 'आकार'चे वरळी, राजस्थान येथे कारखाने आहेत, तर प्रभादेवी येथे शोरूम आहे. "आकार हे निव्वळ माझं एकटीचं यश नसून मुलं आणि माझे कर्मचारी यांच्या अथक परिश्रमांचं ते चीज आहे," असं नम्रपणे नयना शाह कबूल करतात. नवनवीन शिकण्याची आवड असलेल्या नयना शाह यांनी जैन धर्मासह इतर धर्मांचादेखील गाढा अभ्यास केला आहे. सोबतच प्रणिक हिलिंग, वास्तुशास्त्र, योगाभ्यास यांचादेखील त्यांचा सखोल अभ्यास आहे. योगविद्येमध्ये त्यांनी एम. ए. केले असून याच विषयात त्या पीएचडीदेखील करत आहेत. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व चकित करणारं आहे. ३०० वर्षे जुनं असलेलं प्रभादेवीमातेचं मंदिर आणि १२५ वर्षे जुनं सिद्धीविनायकाचं मंदिर ही मंदिरे प्रामुख्याने प्रभादेवीची ओळख आहे. गेल्या ४० वर्षांपासून यात 'आकार'चं नावदेखील समाविष्ट झालं आहे, असं सांगताना नयना शाह यांचे डोळे कौतुकाने चमकून जातात. एकदा आवर्जून भेट द्यावी, असं 'आकार' खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय आहे.

@@AUTHORINFO_V1@@