केवळ ट्विटर हाताळण्यासाठी ६ कोटींची उधळपट्टी! पालिकेचे दररोज ५० ते ६० हजार खर्च होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |




मुंबई : जनसंपर्क विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग आणि माध्यम सल्लागार विभाग असतानाही केवळ माहितीचा जलद स्रोत म्हणून ट्विटर हाताळण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे दिवसाला सुमारे ५० हजार याप्रमाणे तीन वर्षांसाठी सहा कोटी खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची विरोधकांतर्फे मांडण्यात आलेली उपसूचना बहुमताने फेटाळून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलामुंबईकरांना पालिकेच्या विकासकामांची माहिती व तक्रारी ऐकण्यासाठी पालिकेत विविध माध्यमे उपलब्ध असताना पालिकेने याच धर्तीवर आता केंद्रीय सोशल मीडिया विकसित केला आहे.

 

महापालिकेच्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने पालिकेची सर्व माध्यमे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मखाली एकत्र आणली जाणार आहेत. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्यावतीने (महाआयटी) ३५ जणांचे मनुष्यबळ निर्माण करून यासाठी पुढील तीन वर्षांसाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी निविदा मागविण्यात आलेल्या नाहीत.

 

माझी मुंबई, आपली बीएमसी’ हे ट्विटर पेज एमसीजीएसएम २४ बाय ७ हे मोबाईल  अॅप्लिकेशन, तसेच वेब पोर्टल असतानाही आता त्याच धर्तीवर महापालिकेने महापालिकेच्या सर्व विभागांसाठी केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे. मात्र, पालिकेत असलेली माध्यमे सक्षम करण्याऐवजी त्याच धर्तीवर अशाप्रकारे कंत्राट देऊन दिवसाला ५० ते ६० हजार रुपयांची उधळपट्टी थांबवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपसूचनेद्वारे मांडली. सव्वा कोटी लोकसंख्येच्या मुंबईत एक लाख लोक ट्विटर हॅण्डल करतात. त्यासाठी दिवसाला पालिका सुमारे ६० हजार रुपये खर्च करणार आहे. सर्वसामान्यांमध्ये ट्विटर अॅप्लिकेशन वापरणारे किती, त्यांना याचा फायदा काय, असा प्रश्न विचारून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. मात्र राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, आसिफ झकेरिया यांनी पाठिंबा दिला. मात्र, बहुमताने उपसूचना नामंजूर होऊन मूळ प्रस्ताव मंजूर झाला.

 

टीमचे काम

राज्य सरकारच्या नियमानुसार त्यांचे मनुष्यबळ घेतले जात असून फेसबुक आणि ट्विटरवर महापालिकेच्यावतीने जनजागृती तसेच नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यांचे विश्लेषण करणे आदींची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ही टीम आपत्कालीन व्यवस्थापनाच्या टीमसोबत काम करणार आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@