ये क्या हुआ... कैसे हुआ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटात शोभावा असा दिवसभराचा सस्पेन्स, उलटसुलट चर्चा, सायंकाळी अचानक काँग्रेस मुख्यालयात 'प्रकट होणे', त्यानंतर घर गाठणे आणि पाठोपाठ सीबीआय-ईडीच्या पथकानेही घर गाठणे, त्यानंतर घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा अशा दिवसभराच्या हंगाम्यानंतर अखेर आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतले. चिदंबरम यांच्या घराचे दरवाजे बंद ठेवण्यात आल्याने त्यावरून चक्क उड्या मारून सीबीआय पथक घरात शिरल्याने हा साराच प्रकार भलताच 'थरारक' आणि 'रंजक'देखील ठरला.

 

मंगळवारपासून थांगपत्ता नसलेले पी. चिदंबरम अचानकपणे बुधवारी सायंकाळी काँग्रेस मुख्यालयात प्रकटले. यानंतर पत्रकारांसमोर त्यांनी आपले म्हणणे मांडले. आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा कार्ती आरोपी नाही. आमच्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नसून, आम्हाला या घोटाळ्यात गोवले गेले असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला. तसेच, आमच्यावरील सर्व आरोप खोटे असून तपास यंत्रणांनी कायद्याचे पालन करावे, असा उलटा सल्ला त्यांनी यावेळी दिला. "गेले कित्येक तास आपण कुठे होतो, हे सांगताना आपण हा खटला लढण्यासाठी वकिलांसोबत तयारी करत होतो, त्यामुळे तुमच्यासमोर येऊ शकलो नाही," असे कारण चिदंबरम यांनी दिले. "स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशावेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन," असे वक्तव्य करून काँग्रेस कार्यकर्त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नही यावेळी चिदंबरम यांनी केला.

 

या अवघ्या आठ-दहा मिनिटांच्या पत्रकार परिषदेनंतर चिदंबरम आपल्या घरी गेले. ते घरी गेल्याचे कळताच पाठोपाठ सीबीआयच्या पथकानेही दिल्लीतील जोरबाग येथील त्यांचे निवासस्थान गाठले. मात्र, चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गेटवरून उड्या मारून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तब्बल दीड तास चिदंबरम यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते. यावेळी चिदंबरम यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हेही उपस्थित होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे, चिदंबरम यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव एकत्र झाला होता. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता दिल्ली पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या जमावाला पांगवले व त्यानंतर पी. चिदंबरम यांना अखेर २८ तासांच्या या नाट्यानंतर ताब्यात घेण्यात आले.

 

तपास यंत्रणांना धक्काबुक्की

 

दरम्यान, चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर सीबीआय आणि ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सीबीआय-ईडी पथकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचेही उपस्थितांनी सांगितले.

 

चिदंबरम 'वॉन्टेड', काय आहे आयएनएक्स मीडिया घोटाळा?

 

. २००७ साली इंद्राणी व पीटर मुखर्जी यांच्याकडून आयएनएक्स मीडिया कंपनीची स्थापना

. कंपनीत विदेशी गुंतवणूक बोर्डाची परवानगी मिळवून काळा पैसा

. मे, २०१७ आयएनएक्स मीडियाच्या विरोधात सीबीआयचा एफआयआर

. अर्थमंत्रालयाच्या मंजुरीसाठी इंद्राणी मुखर्जीचा कबुलीजबाब, ७१ लाख रुपयांची दिली होती लाच

. पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांच्या मुलाने लाच स्वीकारल्याचा आरोप

. त्याबदल्यात ३०७ कोटी विदेशातून आणण्यास अर्थमंत्रालयाची मंजुरी

. चिदंबरम यांच्या मुलाला अटक, २१ दिवस कोठडीत काढल्यावर जामीन

. फेब्रुवारी, २०१८ मध्ये चिदंबरम यांच्या 'सीए'ला सीबीआयने ठोकल्या बेड्या

. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात स्वतः पी. चिदंबरम आरोपी

१०. २० ऑगस्ट २०१९ : चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला

११. सीबीआय, ईडी अटकेकरिता चिदंबरम यांच्या घरी

१२. चिदंबरम फोन बंद करून फरार

१३. २१ ऑगस्ट, २०१९ : चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

@@AUTHORINFO_V1@@