राण्यांचे बंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019   
Total Views |



तळकोकणच्या विशेषतः त्यावेळच्या गोमंतकांच्या इतिहासातराण्यांचे बंड’ प्रसिद्ध आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजित राणे त्याच बंडखोर राण्यांचे वंशज. महाराष्ट्राच्या राजकारणातील राणेंचा इतिहास मात्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडूनच मांडला गेला. नारायण राणे हे त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत कधीच निवांत राहिले नाहीत. ते कायम अस्वस्थच. या अस्वस्थपणामुळेच त्यांची प्रगतीही झाली. पण, काहीवेळा हाच अस्वस्थपणा त्यांचे वैगुण्यही ठरला. त्यांच्या ’झंझावात’ या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यावेळी केलेल्या त्यांच्या मनोगतातही त्यांचा हाच अस्वस्थपणा प्रकर्षाने जाणवत होता. ’जीव आता सत्तेत रमत नाही’ असाच त्यांच्या भाषणाचा सूर होता. या वयातही ते कुठला तरी मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत असल्याचे स्पष्ट जाणवत होते. त्याला अनुसरूनच त्यानंतर दोनच दिवसांनी सोमवारी राणे यांनी आपण येत्या आठवड्याभरात कोणत्या पक्षात जायचे तो निर्णय घेऊ, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. राणे यांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून राणे आता नेमका कोणता निर्णय घेतात, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इनमिन चार मोठे राजकीय पक्ष आहेत. त्यापैकी जवळपास तीन पक्षांमधून राणेंनी प्रवास केला आहे. राणे सध्या थेट भाजपमध्ये नसले तरी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपच्याच वळचणीला असून ते भाजपचे सहसदस्य आहेत. त्यामुळे आता त्यांच्यासमोर मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. राणेंसारखा आक्रमक नेता आपल्या पक्षात यावा यापेक्षा येऊ नये, अशीच इच्छा बऱ्याच नेत्यांची असण्याची शक्यता आहे. आपण २००५ साली राष्ट्रवादीत येऊ नये, अशीच छगन भुजबळ व आर. आर. पाटील या नेत्यांची इच्छा होती, असेही त्यांनी त्या दिवशी स्पष्ट केले. तसेच शिवसेनेत होणाऱ्या पुनर्प्रवेशाला संजय राऊत आणि सुभाष देसाई या नेत्यांनी आडकाठी घातली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. त्यामुळे यावेळी ते नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

राह कौन सी जाऊँ मैं?

 

चौराहे पर लुटता चीर,

प्यादे से पिट गया वजीर ।

चलूँ आखिरी चाल कि, बाजी छोड़ विरक्ति सजाऊँ?

राह कौन सी जाऊँ मैं?

 

ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता. अगदी तशीच परिस्थिती सध्या कोकणातील ‘लढाऊ नेते’ म्हणवणाऱ्या नारायण राणे यांची झाली आहे. राणे यांना आपल्या आत्मचरित्राचे प्रकाशन खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचे होते. पण, सध्या शिवसेनेशी बऱ्यापैकी सूर जुळले असताना निवडणुकीच्या तोंडावर राणेंमुळे उगाच भाजप-शिवसेनेच्या संबंधांमध्ये मिठाचा खडा नको, म्हणून मुख्यमंत्र्यांनी राणे यांचे आग्रहाचे आमंत्रण शिताफीने टाळले. त्यामुळे राणे काही प्रमाणात नाराज झाल्याचेही बोलले जाते. त्यात त्या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आवर्जून हजेरी लावल्याने वेगळ्याच राजकीय समीकरणाची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीची अवस्था सध्या केविलवाणी झाली आहे. एकामागोमाग एक बलदंड नेते पक्षातून बाहेर पडत आहेत. असे असताना राणे यांना पक्षात घेऊन शरद पवार सनसनाटी घडवून आणू शकतात. याआधीही राज्यातील पहिले सर्वात खळबळजनक पक्षांतरही (भुजबळांचे) पवारांच्याच मार्गदर्शनाखाली झाले होते. त्यामुळे राणे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच ते ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या त्यांच्या छोटेखानी पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीलाही बांधू शकतात. आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून ते काही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढू शकतात. महाराष्ट्रातून वीसच्या आसपास जागा राणेंनी हेरून ठेवल्याचे समजते. त्या ठिकाणी त्यांच्या शिलेदारांची ताकद असून त्या जागा ते राष्ट्रवादीकडे मागू शकतात. काही करून राज्याच्या राजकारणात आपला किमान दबाव गट राहावा, यासाठी येत्या काळात राणे जोरकस प्रयत्न करतील. राष्ट्रवादीच्या कळपात आल्यास पवार त्यांचा उपयोग परिणामकारकरित्या करून घेऊ शकतात. सध्या रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या नेत्यांची विरोधकांकडे कमतरता असल्याने राणे यांना येथे पूर्ण ’स्कोप’ असेल. पण, राणे यांची ही हालचाल सुरू असताना सत्ताधारी भाजप त्यांच्याबाबत कोणती भूमिका घेतो, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@