इथे पार्किंग मिळेल!!! जोगेश्वरीत मोक्याच्या ठिकाणी पार्किंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |



मुंबईत अनेक विभाग असे आहेत की तेथे वस्ती कमी परंतु, वाहनांची वर्दळ जास्त असते. एक तर तो जंक्शन मार्ग तरी असतो किंवा तेथे मोठमोठी कार्यालये तरी असतात. गोरेगावच्या हद्दीत परंतु जोगेश्वरीपासून जवळ असलेले हब मॉल हे असे ठिकाण आहे

 

मुंबई (अरविंद सुर्वे) : मुंबई-अहमदाबाद या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. पूर्वी हा महामार्ग लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी असायचा. मात्र, आता वाढत्या गर्दीमुळे जशा महानगरांच्या सीमा मिटत चालल्या, त्याप्रमाणे वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे एक्सप्रेस रोड, सिटी रोड, बायपास रोड यातील फरकच नष्ट झाला आहे. या महामार्गावरून उपनगरातल्या बसेस, रिक्षा ही सार्वजनिक वाहनेही धावू लागली आहेत. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाचे स्वरूप ‘धीमेगती महामार्ग’ झाले आहे. वांद्य्रापासून अंधेरीपर्यंत १४-२० मिनिटांत येणारी बस पुढे बोरिवलीपर्यंत जाण्यासाठी अनेकदा एक ते दीड तास लागतो. अशावेळी बसप्रवासी कंटाळतात, पण या वाहतूककोंडीत बसचालकाच्या संयमाला सलाम करतात.

 

या महामार्गावर पूर्वी जोगेश्वरी येथे (गोरेगावच्या हद्दीत) निरलॉन ही प्रसिद्ध कंपनी होती. त्या कंपनीच्या बाजूला न्यू स्टॅण्डर्ड ही इंजिनिअरिंग कंपनी होती. या दोन कंपन्यांच्या नावाने हा परिसर ओळखला जायचा. त्यानंतर महानंद दूध डेअरीची स्थापना झाली. पाठोपाठ पशुवैद्यकीय महाविद्यालय, वनराई रहिवासी वसाहत, बिंबिसार नगर म्हाडा कॉलनी आणि त्यानंतर निरलॉन कंपनीच्या जागी हब मॉल आणि न्यू स्टॅण्डर्ड कंपनीच्या जागी मोठमोठ्या प्रोजेक्टचे प्रदर्शन भरू लागले.

 

वनराई रहिवासी वसाहत वगळता इतर वस्ती उच्च मध्यमवर्गीयांची आणि नाट्य-सिने कलाकारांची असल्याने या भागात वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे जागेअभावी अनेकदा वाहने रस्त्यात उभी केली जायची. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी व्हायची. मात्र, महापालिकेने बेकायदा पार्किंगविरोधात दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर वाहनमालकांची पळापळ सुरू झाली. वाहने उभे करायची कुठे, हा प्रश्न आ वासून उभा राहिला. मात्र, महापालिकेने यावर आधीच पर्याय तयार ठेवला होता. त्यामुळे वाहनचालक-मालकांच्या प्रश्नाला त्याच क्षणी उत्तर सापडले.

 

हब मॉलच्या बाजूलाच लोढा फिरेन्झामध्ये महापालिकेने पार्किंग सेंटर उभे केले आहे. या सेंटरमध्ये सुमारे १०२० वाहने पार्क करण्याची क्षमता आहे. सध्या येथे नि:शुल्क पार्किंग सेवा असून ठेकेदार आल्यानंतर शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे रस्त्यात वाहन उभे करून वाहतूककोंडीला कारण ठरण्यापेक्षा वाहनमालकांनी या सेंटरचा लाभ घेणे स्वतःच्या आणि जनतेच्या हिताचे ठरेल.

 

दंड योग्यच

पालिकेने पार्किंगची सोय करूनही येथे वाहने न ठेवता ती बाहेर उभी करणार्यांवर दंडात्मक कारवाई करून उपयोगाचे नाही. वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे. तरच परिस्थितीत सुधारणा होईल.

राजाराम लाड, जोगेश्वरी (पू.)

 

पार्किंग आवश्यकच

हब मॉल परिसर हा रहिवासी वस्तीचा नसला तरी हब मॉल, त्यातील थिएटर, येथे असलेली विविध कार्यालये यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे पार्किंग आवश्यच होते. पालिकेने येथे पार्किंग सेंटर उभारून जनतेची मोठीच सोय केली आहे.

प्रभाकर सूर्यवंशी, गोरेगाव (पू.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@