नाशिक जिल्हा काँग्रेस दयनीय...१५ मतदारसंघांसाठी केवळ ४४ इच्छुक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |
 


नाशिक : नाशिक जिल्हा हा काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार प्राप्त करून देणारा जिल्हा म्हणून ओळखला जात असे. याच नाशिक शहरात डॉ. शोभा बच्छाव यांना शहराचे प्रथम महिला महापौर पद भूषविण्याचे भाग्य मिळाले होते. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुकांच्या रांगा या काँग्रेस कार्यालयात पाहावयास मिळत. मात्र, सध्या काँग्रेसचे ते दिवस गेल्याचे चित्र दिसत आहे. दि. ३१ जुलै रोजी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीस अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघासाठी केवळ ४४ इच्छुकांनी मुलाखतीस हजेरी लावली होती. शहरातील मतदार संघातील इच्छुकांची संख्या जास्त असली तरी, ग्रामीण भागातील मतदारसंघातील इच्छुकांनी मुलाखतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

 

आमदार भाई जगताप यांनी जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघासाठी ४४ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्याचे सांगितले. काँग्रेसच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात आला आहे. दि. ३१ रोजी आ. जगताप व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी जिल्ह्यातील १५ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. शहरातील पश्चिम मतदारसंघातून लक्ष्मण जायभावे, केशव अण्णा पाटील, नाशिक पूर्वमधून विजय राऊत, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आदींच्या मुलाखती यावेळी झाल्या.

 

नाशिक महापालिकेतील गटनेते शाहू खैरे, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे आदींसह ४ इच्छुकांनी यावेळी मुलाखती दिल्याची चर्चा आहे. देवळाली मतदारसंघातून किरण जाधव, नंदकुमार कर्डक यांनी मुलाखत दिली. ऐनवेळी फोन करून इच्छुकांना बोलावले जात होते असेही चित्र दिसले. तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड यांनी मतदारसंघातील १० इच्छुकांच्या उमेदवारांची यादी निरीक्षकांकडे सादर केल्याचे बोलले जात आहे. मात्र, यादीत समाविष्ट इच्छुक हजर नसल्याचे दिसून आले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दावा करण्यात आलेल्या नांदगाव, निफाड, येवला या मतदारसंघातील इच्छुक हजर नसल्याचे दिसून आले. चांदवड-देवळा मतदारसंघातून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संपत वक्ते यांनी मुलाखत दिली.

 

मालेगाव बाह्यमधून जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मुलाखत दिली असून ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघातून तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी मुलाखत दिली. कळवण-सुरगाणा मतदारसंघातून नगराध्यक्ष मयूर बहिरम, रमेश कहांडोळे, काशिनाथ गायकवाड यांनी मुलाखतीस अल्प प्रतिसाद लाभलेला असूनही आमदार जगताप यांनी १५ विधानसभा मतदारसंघासाठी ४४ जणांनी मुलाखती दिल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी उल्हास पाटील, डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, युवक शहराध्यक्ष स्वप्नील पाटील, वत्सला खैरे, हेमलता पाटील, डॉ. सुचेता बच्छाव, दिनेश बच्छाव, दिगंबर गिते आदी उपस्थित होते.माणिकराव कोकाटे काँग्रेसकडून लढणार ?

 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये असलेले आणि शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढलेले अ‍ॅड. माणिकराव कोकाटे हे विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या ते कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीत.

 

काँग्रेस सांगणार सात मतदारसंघांवर दावा!

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १० तर काँग्रेसच्या वाट्याला ५ मतदारसंघ आहेत. मात्र, यावेळी मतदारसंघात अदलाबदल करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तसेच, जागावाटपात ७ मतदारसंघ काँग्रेसला देण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे आमदार भाई जगताप यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नाशिक मध्य, नाशिक पूर्व, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव मध्य, सिन्नर हे मतदारसंघ काँग्रेसकडे होते. आता चांदवड-देवळासह आणखी एका मतदारसंघाची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@