मुख्यमंत्रिपदी फडणवीसच राहणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |


 


अमरावती : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 'करिष्माई' काम केले असून युतीने आगामी निवडणुकीत २२० पेक्षा जास्त हे लक्ष्य न ठेवता २५० पेक्षा जास्त जागा हे लक्ष्य ठेवावे," असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यातील भाजप नेत्यांना उद्देशून सांगितले. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत मराठी जनतेचा विश्वास जिंकला. आता पुढील पाच वर्षांत ते हृदय जिंकतील," असे राजनाथ म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होईल आणि मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. "भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणारा हा कार्यक्षम मुख्यमंत्री आहे," अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

 

"पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी व जनतेचा जनादेश घेण्यासाठी मी जनता जनार्दनासमोर जात आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. ग्रामविकासाचा मंत्र देणार्‍या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीतून गुरुवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला, त्यावेळी झालेल्या उद्घाटन सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार्‍या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'करिष्माई' नेतृत्व असणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीत युतीने २५० पेक्षा जागा मिळवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी येथे दणदणीत भाषण करून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. ते म्हणाले, "संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीच माझ्या मुख्यमंत्रिपदाचा निरोप दिल्लीवरून आणला होता. आता पाच वर्षांनंतर त्यांच्याच उपस्थितीत मी जनतेसमोर पाच वर्षांत केलेल्या कामांचा हिशोब देण्यासाठी चाललो आहे. आमचे दैवत जनता आहे. पाच वर्षे या जनतारूपी दैवताने आशीर्वाद दिला, आम्ही मालक नाही, सेवक आहोत. त्यामुळे आम्ही केलेली कामे व्यवस्थित केली की नाही हे विचारण्यासाठी आलो आहोत. या पवित्र स्थानावरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता दिली. आम्ही हाच संदेश घेऊन महाराष्ट्रातील गावागावांमध्ये जातोय, राज्यातील सगळ्या समस्या संपल्या, असा दावा आम्ही करत नाही. मात्र, गेल्या सरकारने पंधरा वर्षांत जी कामे केली त्यापेक्षा दुप्पट काम आम्ही पाच वर्षांत केली आहेत," असे मुख्यमंत्री म्हणाले. "एवढी कामे केली नसती तर जनतेसमोर जनादेश घ्यायला बाहेर पडलो नसतो," असेही त्यांनी सांगितले.

 

"समृद्धी महामार्गाचे काम आम्ही विक्रमी वेळेत पूर्ण करत आहोत. हा महामार्ग विदर्भाचे भाग्य बदलणार आहे. हा देशातील सर्वात मोठा व सर्वोत्तम महामार्ग असणार आहे. महाराष्ट्रात पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होईल. काँग्रेसच्या काळात कृषीपंपासाठी कनेक्शन मिळू शकले नव्हते. आता दीड लाख शेतकर्‍यांना कृषीपंपांचे कनेक्शन मिळाले आहे. याआधी कामांपेक्षा भ्रष्टाचार होऊन सगळा पैसा सत्ताधार्‍यांकडे जायचा. आम्ही ते सगळे बदलले. सिंचनाची प्रचंड कामे आमच्या सरकारने केली. गोसीखुर्दमध्ये ५० हजार हेक्टरचा सिंचनाचा पहिला टप्पा आहे.

 

पुढील टप्पा १ लाख हेक्टरच्या सिंचनाचा असणार आहे. हे सरकार शेतकर्‍याच्या पूर्णपणे पाठीशी आहे. कर्जमुक्ती, विमा, विविध योजनांचे पैसे, दुष्काळी मदत या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत ५० हजार कोटी शेतकर्यांना मिळाले. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार केले. चार वर्षांत ५० हजार शौचालये बांधून गावे हागणदारीमुक्त केली. २० हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले. शिक्षणात सुधारणा केली. महाराष्ट्राचा शिक्षणात क्रमांक १६ वा होता, केवळ ३ वर्षांत आम्ही राज्याला तिसर्‍या क्रमांकावर आणले. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढण्यात झाला." औद्योगिक गुंतवणुकीत सध्या महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. देशात जी विदेशी गुंतवणूक झाली, त्यापैकी तब्बल पंचवीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

सुखी, सुरक्षित व आनंदी महाराष्ट्रासाठी..

 

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गेल्या पाच वर्षांत राज्यात एकही दंगल झाली नाही. एकही गोळीबार झाला नाही. हे राज्य सुखी, सुरक्षित व आनंदी व्हावे यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत," असे महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. "मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला, धनगर समाजासाठी विविध योजना आमच्या सरकारने सुरू केल्या, ओबीसी समाजासाठी वेगळे मंत्रालय स्थापन केले. अशा प्रकारे सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यावर आमच्या सरकारचा कटाक्ष आहे," असे त्यांनी सांगितले. "आम्ही फक्त वातानुकूलित कक्षातून काम करत नाही. पाच वर्षे लोकांची कामे केल्यानंतर आम्ही आता लोकांसमोर जात आहोत," असे चंद्रकांतदादा म्हणाले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@