कथा ही नरा-वानराची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



पॅथॉलॉजी म्हणजे रोगनिदान करण्याचं शास्त्र म्हणजे तसे इथे वेगवेगळ्या मानवी रोगांवर प्रतिबंधक अशी लस वगैरे शोधण्याचे प्रयोग होणारच होते. पण, खरा 'ग्रँड प्लॅन' होता तो 'वानर-नर' बनवण्याचा...


विज्ञानकथा हा एक लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. सर्वच आधुनिक साहित्य प्रकारांप्रमाणेच विज्ञानकथेचा उगमही पश्चिमेत झाला. असंख्य उत्तमोत्तम विज्ञानकथा तिथे जन्मल्या. आपल्याकडच्या अनेक लेखकांनी त्यांचे सुंदर अनुवाद केलेले आहेत. अनेकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अस्सल भारतीय बाजाच्या विज्ञानकथाही लिहिलेल्या आहेत. काही विज्ञानकथांमध्ये एक मध्यवर्ती कल्पना पुन्हा पुन्हा वापरलेली आढळते. ती म्हणजे मनुष्याचा देह, वानर किंवा अधिक अचूकपणे सांगायचं म्हणजे गोरिलासारखी अफाट ताकद आणि मेंदू मात्र अगदीच सुमार, अशा प्राण्याची कृत्रिम रीतीने उत्पत्ती करवणं, त्याच्याकरवी प्रचंड श्रमशक्तीची कामं करवून घेणं, इत्यादी. ही निव्वळ 'साहित्यिक कल्पना' नाही, तर तिला सत्याचा आधार आहे. आधुनिक विज्ञानयुगाचा प्रारंभ पश्चिम युरोपात झाला. त्याचा वेगवान विकास अमेरिकेत झाला. पण, विज्ञानाला राबवून अचाट नि अफाट कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे मानुष, अमानुष आणि अतिमानुष प्रयत्न झाले, ते मात्र रशियात. म्हणजे 'झार' सम्राटांच्या रशियात नव्हे, श्रमिक आणि कष्टकऱ्यांचे राज्य असणाऱ्या सोव्हिएत रशियात. या साम्यवाद्यांनी मानवी शरीर आणि मानवी मन यांच्या अगदी कानाकोपऱ्यांचा तपास केला. त्यातून त्यांना गवसलेल्या ज्ञानाच्या आधारावर रशियन गुप्तहेर खात्याने माणसांचा मानसिक छळ करण्याच्या, तसेच त्यांची मनं भारून, मोहवून टाकण्याच्या नवनवीन पद्धती शोधून काढल्या. विषप्रयोग करून शत्रूचा काटा काढणं, हा विषय नवीन नव्हता. जगभर सर्व देशांमध्ये त्याच्या विविध पद्धती प्रचलित होत्याच, पण साम्यवाद्यांनी त्या विषयाचा आधुनिक ढंगाने अभ्यास केला आणि तो विषय जवळपास परिपूर्णतेला नेला. देव किंवा तत्सम कोणतीही अदृश्य शक्ती नाकारण्याच्या या साम्यवादी रशियनांनी 'काळी जादू' या विषयाचा प्रचंड अभ्यास केला आणि त्या तंत्राचा आपल्या विरोधकांवर मनसोक्त उपयोगही केला.

 

त्याचप्रमाणे, मानवी शरीरात वानरासारखी शक्ती आणि मंद मेंदू असा प्राणी निर्माण करण्याचे प्रयोगही त्यांनी केले. असे प्राणी विपुल संख्येत तयार करायचे आणि त्यांच्याकरवी रशियाचा अफाट भूप्रदेश मोठमोठ्या उद्योगांनी, कारखान्यांनी भरून टाकायचा, अशी मूळ कल्पना होती. ही कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी १९२७ साली सोव्हिएत संघाच्या जॉर्जिया या प्रजासत्ताकात एक संस्था स्थापन झाली. तिचं नाव 'इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्पेरिमेंटल पॅथॉलॉजी अ‍ॅण्ड थेरपी.' किती सोज्ज्वळ नाव आहे पाहा! पॅथॉलॉजी म्हणजे रोगनिदान करण्याचं शास्त्र म्हणजे तसे इथे वेगवेगळ्या मानवी रोगांवर प्रतिबंधक अशी लस वगैरे शोधण्याचे प्रयोग होणारच होते. पण, खरा 'ग्रँड प्लॅन' होता तो 'वानर-नर' बनवण्याचा. 'काळा समुद्र' आणि 'कास्पियन समुद्र' यांच्या दरम्यान आशिया-युरोप खंडांच्या सरहद्दीवर आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया इ. देश आहेत. पूर्वी हे सगळे सोव्हिएत संघात होते. खुद्द जोसेफ स्टॅलिन आणि त्याचा उजवा हात लॅव्हेंटियो बेरिया हे दोघेही जॉर्जियन होते. बेरिया हा अनेक वर्ष सोव्हिएत गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. स्टॅलिनच्या आदेशानुसार, बेरियाने हजारो-लाखो विरोधकांना ठार मारले. नंतर एक दिवस स्टॅलिनने बेरियालाही ठार केले. १९९१ साली सोव्हिएत संघ कोसळल्यावर अनेक देश भराभर स्वतंत्र झाले. त्यात जॉर्जियाही स्वतंत्र झाला. आजही तो स्वतंत्र देश आहे. पण, रशियाची दक्षिण सीमा नि जॉर्जियाची उत्तर सीमा जिथे भिडतात, तेथील ओसेरिया व अबस्वाझिया या भूभागांवरून १९९२ साली रशिया नि जॉर्जिया यांच्यात लढाई झाली. रशियाच्या प्रचंड ताकदीपुढे चिमुकल्या जॉर्जियाचा पाड लागणं कठीणंच होतं. त्यामुळे रशियाने वरील भूभाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. जॉर्जियन संसदेने रीतसर ठराव करून त्या भूभागाला 'व्याप्त रशियन भूमी,' 'रशिया ऑक्युपाईड टेरिटरी' असं ठरवलं आहे.

 

या भागातच 'सुखुमी' हे काळ्या समुद्रावर वसलेलं शहर आहे नि तिथे अगोदर उल्लेख केलेली 'रोगनिदान संस्था' आहे. 'इल्या इव्हानोव्ह' या प्रख्यात रशियन जीवशास्त्रज्ञाने या संस्थेत विविध प्राण्यांच्या संकरित संततीचे असंख्य प्रयोग केले. 'व्लादिमीर बरकाया' हा १९६१ साली संस्थेत दाखल झाला. आज तो संस्थेचा प्रमुख संचालक आहे. तो सांगतो की, 'इव्हानोव्ह'ने मानवी वीर्य चिंपाझी माद्यांमध्ये टोचण्याचे अनेक प्रयोग करून पाहिले. मात्र, ते यशस्वी झाले नाहीत. परंतु, तो अभिमानाने सांगतो की, असंख्य रोगांवर 'इव्हानोव्ह' आणि त्याच्या सहकारी शास्त्रज्ञांनी यशस्वी प्रयोग केले. 'पोलिओ'वर उपाय ठरलेली लस या संस्थेत शोधून काढण्यात आली. ही गोष्ट खरीच आहे. संस्थेशी जुडलेली आणखीन एक व्यक्ती म्हणजे प्रा. बोरिस लॅपिन. आज ते ८८ वर्षांचे आहेत. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी रणांगणावरही पराक्रम गाजवला. त्यानंतर म्हणजे १९४९ साली ते या संस्थेत दाखल झाले. संस्थेत प्रयोग करण्यासाठी विविध जाती-उपजातींचे वानर, माकडं पाळण्यात आली आहेत. प्रा. लॅपिन यांच्या वानरांवरील प्रयोगांमधून पश्चिमेत अशा बातम्या पसरल्या होत्या की, रशियन शास्त्रज्ञ पहिल्या अंतराळयानात वानरांना पाठवणार आहे. हा १९५०-५१चा काळ होता. अंतराळ संशोधन क्षेत्रात रशिया आणि अमेरिका यांच्यात तीव्र चुरस होती. १९५७ साली तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयझेनहॉवर याच्या वैयक्तिक वैद्यकीय सल्लागारांच्या नेतृत्वाखाली एका अमेरिकन शास्त्रज्ञ मंडळाने रशियाचा दौरा केला. त्यांना आवर्जून 'सुखुमी'ची संस्था दाखवण्यात आली. प्रा. लॅपिन, त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ आणि एकूण संस्थेतील काम पाहून हे अमेरिकन शास्त्रज्ञ अत्यंत प्रभावित झाले. मायदेशी परतल्याबरोबर त्यांनी आयझेनहॉवर यांच्यापाशी जोरदार शिफारस केली की, अशी संस्था आपल्याकडे हवीच. परिणामी, लवकरच अमेरिकेत तशा सात संस्था सुरू करण्यात आल्या. अशा सगळ्या कारणांमुळे अमेरिकन व एकंदरीतच पश्चिमी विज्ञान जगत आणि प्रसारमाध्यमांत 'सुखुमी'च्या संस्थेबद्दल प्रचंड कुतूहल होतं. प्रा. लॅपिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खरोखरच सहा वानरांना अंतराळ सफरीसाठी खास प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. आज ५०-६० वर्षांनंतर आपल्याला हे सगळे तपशील प्राथमिक वाटतात. पण, १९५०च्या त्या दशकात अशा प्रयोगांच्या नुसत्या बातम्यांनी लोकांना वेडं केलं होतं. १९६२ साली खुद्द रशियात 'अ‍ॅडलर' या ठिकाणी अशीच आणखी एक संस्था सुरू झाली. १९९१ साली जॉर्जिया स्वतंत्र झाल्यावर प्रा. लॅपिन यांनी 'सुखुमी'तली संस्था प्रा. व्लादिमीर बरकाया आणि प्रा. व्हायोलेटा अग्रबा या आपल्या जॉर्जियन सहकाऱ्याकडे सोपवली आणि ते 'अ‍ॅडलर'ला निघून गेले. परंतु, आज 'सुखुमी' आणि 'अ‍ॅडलर' दोन्ही ठिकाणच्या संस्था अडचणीत आल्या आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे मिखाईल गोर्बाचेव्ह आणि त्यांची 'ग्लासनोस्त' व 'पेरेस्राईका' ही प्रसिद्ध तत्त्वं. गोर्बाचेव्ह यांचं नेतृत्व आणि त्यांची धोरणं यामुळे सोव्हिएत संघात नवंच वारं खेळू लागलं. सोव्हिएत साम्राज्य कोसळलं. अनेक घटक प्रजासत्ताक स्वतंत्र देश बनले. मुक्त अर्थव्यवस्थेचा डिंडिम पिटला जाऊ लागला. लोकांचा विज्ञान नि वैज्ञानिक प्रयोग यांच्यातला रस आटला. नव्हे, त्यांना असल्या शैक्षणिक गोष्टींत रस घ्यायला वेळच उरला नाही. सगळे जण पैसा, अधिक पैसा झटपट पैसा मिळवण्याच्या मागे धावू लागले. 'अ‍ॅडलर'मधल्या संस्थेला नव्या रशियन शासनाकडून पूर्वीसारखा पैसा मिळेना. 'सुखुमी'तल्या संस्थेची तर पारच दशा झाली. नवजात जॉर्जिया देश टिचभर. त्याचा अर्थसंकल्प तो केवढा. त्यामुळे 'सुखुमी' संस्थेत आर्थिक चणचण सुरू झाली. त्यात भर पडली यादवी युद्धाची.

 

जॉर्जिया स्वतंत्र झाला १९९१ मध्ये नि लगेच १९९२ साली 'ओसेशिया' नि 'अबरवाझिया'तल्या लोकांनी सशस्त्र बंड केलं. त्यांना जॉर्जियातून फुटून निघायचं होतं. 'सुखुमी' शहर नेमकं 'अबरवाझिया' भागात येतं. त्यामुळे अनेकदा संस्थेच्या परिसरात, अगदी आवारातसुद्धा उभय पक्षांमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. कित्येक वानर गोळ्या लागून ठार झाले. संस्थेच्या इमारतींवर अगदी आजही कित्येक ठिकाणी बंदुकीच्या गोळ्यांचे भोसके दिसतात. एक दिवस तर व्हायोलेटा बाई कार्यालयात येऊन पाहतात तो टेबलावर न फुटलेला तोफेचा गोळा. कुठून आला, म्हणून पाहतात तर वरच्या छताला भगदाड पडलेलं. या गोळागोळीमुळे संस्थेची उष्ण हवा खेळती ठेवणारी यंत्रणा निकामी झाली. अनेक वानर संशोधकांच्या डोळ्यांदेखत थंडीने काकडून, गोठून मेले. 'अ‍ॅडलर'मधल्या संस्थेला युद्धाचा धोका नसला, तरी आर्थिक चणचण, लोकांचा निरुत्साह, मुक्या जनावरांच्या हक्कांबद्दल जागृती करणाऱ्या संघटना अशा अडचणी त्यांनाही सतावत आहेतच. प्रा. लॅपिन म्हणतात, "पूर्वी आम्ही एक खास विमान घेऊन नायजेरियात जायचो आणि तेथील वन्य जमातींकडून नाना प्रकारचे वानर सहजपणे खरेदी करायचो. आता तो काळ उरलेला नाही. एकापाठोपाठ एक देश प्राण्यांच्या निर्यातीवर बंदी घालत आहेत. प्राण्यांना क्रूरपणे वागवू नये, हे योग्यच आहे. परंतु, मानवी जीवनासाठी आवश्यक औषधं पडताळून पाहण्यासाठी वानर हाच सर्वात उपयोगी प्राणी आहे." दोन्हीकडच्या संस्थांमध्ये वैज्ञानिक एक तर साठी ओलांडलेले तरी आहेत किंवा मग अगदी विशी-पंचविशीचे आहेत. मधल्या वयाची पिढी गायब आहे. कारण, ते सगळे लोक संशोधनाचं क्षेत्र सोडून 'बिझनेसमन' झाले आहेत. प्रा. व्हयोलेटा सांगतात, "आमच्याकडे मदतनीस म्हणून काम करणाऱ्या मुलीला आम्ही महिना तीन हजार रुबल्स पगार देत होतो. पण, तिने नोकरी सोडली. आता ती बाजारात घोंगड्या विकते नि महिन्याला १५ हजार रुबल्स कमावते. पण, तरीही प्रा. लॅपिन, प्रा. बरकाया आणि प्रा. अग्रबा हे तिघेही ज्येष्ठ शास्त्रज्ञ आशावादी आहेत. लोक निश्चितपणे पुन्हा वैज्ञानिक संशोधनाकडे वळतीलच, असा त्यांना विश्वास आहे.

@@AUTHORINFO_V1@@